prabodhini news logo
Home कारंजा प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – शिक्षक दिन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – शिक्षक दिन

0
92

माझी आई

आई म्हटले की प्रत्येक आईचे एक वेगळे व्यक्ती महत्व असते, तिच्या कष्टाची श्रमाची एक वेगळी आखून दिलेली सिमा असते तिने लेकरांना कसे घडवावे, कसे संस्कार द्यावेत हे प्रत्येक आईवर अवलंबून असते मग ती गरिबीतील असो किंवा
श्रीमंतीतील असो , ती सुशिक्षित असो किंवा अडाणी शेवटी ती आई असते तीच्या भविष्याचे स्वप्न तीने कसे साकार करावे हे ती मुलाना वाढवताना मनोमन जपत असते, व त्या प्रमाने ती संस्काराची पेरणी करत असते, मुलांच्या निखळ चेहऱ्यावरचा जी आंनद वेचते , स्वतः च्या दु:खात ती लेकरासाठी सुख शोधते ती आई असते. ” आई ” हा शब्द लहान असला तरी तीची महती खुप मोठी आहे हे सांगावयास नको.
सुखदुःखात लेकरांना पदराखाली घेते,पायाला ठेच जरी लागली तर आईच्या डोळ्यात टचकन पाणी येते छोट्या मोठ्या संकटाशी सामना करताना ती लेकरांना चुणूक ही लागू देत नाही ती सर्व लेकरारासाठी सोसते . लेकराना जन्माला घालताना दु:ख यातनेशी सामना करणारी ती आईच असते. जिव्हाळा, प्रेम, वात्सल्याने बहरलेली मायेची उब, व संकटावर मात करायला शिकवणारी, चांगल्या वाईट गोष्टीची पारख करून देणारी फक्त आईच असते. प्रत्येक लेकरांच्या मनाला हुरूप ,जिद्द, चिकाटी, कौशल्य, प्रेरणा, प्रोत्साहन व सातत्याची ओळख करून देणारी पहिली शिक्षिका असते एक आई. निती,नियम, सत्य,शिस्तीचे वलयस्थान असते आई . जिवनात येणाऱ्या नवनव्या विचाराची स्फूर्ती असते आई

उगीचच का ? कुणी म्हटले —
आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी
स्वामी तीन्ही जगाचा, आईविना भिकारी
त्यातीलच एक माझी आई……
घराचं घरपण जपणारी, गरिबीवर मात करणारी प्रामाणिकपणे सुजनपण लेवून गरिबीचा उंबरठा चढून आयुष्यभर परिस्थितीशी झगडणारी माझी आई माझ्या आई विषयी मला इथे लिहीण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी प्रबोधिनी मंच ची ऋणी आहे….
आईला लिहीण्यावाचण्याचे ज्ञान नसले तरी संसाराच्या अडीअडचणीवर कशी मात करायची हे घरप्रपंचाचे सुत्र ती खुप चांगल्या प्रकारे समजून होती. अडीअडचणी वर मात व तडजोडीचे पाढे, व उदरनिर्वाहा साठी कष्ट, मेहनत, श्रम ,सातत्याची बाराखडी तीने नेहमीच अंगिकारली होती.

आमची परिस्थिती तशी खुप बेताचीच म्हणजेच हातावर आणणे आणि पानावर खाणे अशातील काहीशी घरी जगण्याचे कोणतेही साधन नाही त्यातल्यात्यात आम्ही पाच सहा भावंडे ,वडिलांची आईला फारशी मोलमजुरीत मदत नाही, सर्व लेकरं खाणारी त्यात म्हातारी सासु सासरे व काम करणारी आई एकटी, दोन मोठ्या बहीणीचे लग्न खुप कमी वयात झाले, त्या लग्न होऊन सासरी गेल्या तेव्हा आम्ही चौघे अगदी दहा अकरा वर्षा खालची असेल.
म्हणजे मोठ्या बहीणीच्या लग्नात मी पाच सहा वर्षाची व मोठा भाऊ नव दहा वर्षाचा , सत्तर बहात्तरचा तो काळ….. दुष्काळाचे सावट आणि घर प्रपंच सांभाळताना, कष्ट करून मुलांना पोसताना आईच्या मनाची होणारी घालमेल व तिच्या जिवाची होणारी आबळ मी बालपणापासून जसजसे कळायला लागले . तसतसे अनुभवत होते. आईचा दिवस सकाळी पाच वाजता पासून सुरू व्हायचा तो रात्री दहा अकराला लेकरांना गोधडीत झोपवून , अंथरून पांघरूण लावून स्वता डोळे मिटायची . येणारा दिवस कसा उजाडणार याची मनात चिंता असली तरी कधी खचून गेली नाही . किंवा दोन दिर त्याकाळी मुंबई सारख्या शहरात सरकारी नोकरीवर असून देखील,त्यानी कधी सासु सासऱ्यांना त्यांच्याकडे न्यावे ही अपेक्षा मनात बाळगली नाही.
मला आठवते त्याकाळी मजुराला मजुरी अगदी दोन ते अडीच रूपये रोजंदारी होती सकाळची मजुरी पच्चविस पैशापासून पन्नास पंच्याहत्तर पैशे अशा प्रकारे होती.आई बाराही महीने कबाळ कष्ट करत होती. मजूर सुटले कि घरी येताना गुराढोरासाठी डोक्यावर गवताचा भारा, कधी बकरीसाठीचारा ,तर कधी इंधन काडी,संसाराची तडजोड करताना बाईजातीने राबायचे तरी कीती असे कधी तीच्या मनाला शिवले नाही . घर संसार प्रपंच नात्याच्या गोतवंडाची उतरणच जणू तिच्यावर उभी होती. कष्टाच सातत्य तीने मात्र शेवटपर्यंत टिकवून ठेवलं कष्टाचा क्षिण कधी
तिला जानवला नाही .
लेकरं सासरपण आणि प्रपंचाच्या रहाट गाडग्यात माहेरपण कधीच मागे पडलं होतं. …..
तीनचार लेकरं माहेरी घेऊन जाणे म्हणजे नातेवाईकांना उगाच ताप व सासु सासरे सोडून आपण दोनचार दिवस
चैनीचे माहेरी घालवावे असे तिला कधी पटले नाही .
उन्हाळा ,पावसाळा , हिवाळा सर्व ऋतू सारखे राहणे हेच तिच्या वाट्याला आलेले त्यात हिवाळा पावसाळा मजूरीचे, उन्हाळा म्हटले की कठीणच आता सारखे पुर्वी उन्हाळी लागवड किंवा पिके निघत नव्हते, तरीही आई कधी एका दिवसाला , सणावाराला घरी दिसली नाही .

वडिल मोठा लेक म्हणून लाडाचा त्यामुळे शेतीची फारशी कामे जमत नव्हते, परंतु उन्हाळ्यात दुसऱ्या कडून आंब्याचे झाडं विकत घ्यायचे तवढे सिजन मन लावून करायचे, आई शेतातील पराट्या ,खुंट, फणं वेचायची व आम्ही आंबे राखायचो.मे महीना टेंभुर्णीचे ( बिड्याच्या पानाचे )पुडे बांधणे व आंबे त्यातून बऱ्यापैकी पैसा आई गाठीशी राखून ठेवायची, त्यातूनच आमचा घरखर्च शिक्षणखर्च भागायचा , ती आईवडीलाकडे चांगल्या खात्यापित्या बऱ्यापैकी घरातील,पण काम करण्यास तिला कधी कमी पणा जाणवला नाही. किंवा कुणाचा हेवादावा केला नाही. हेच तिच्या मनाच्या मोठेपणाचे वैशिष्ट्य होते.
त्यावेळी अगदी तुटपुंज्या मजूरीतून तीने इतक्या मुलांची लग्ने सुखदुःख व प्रपंचाचा गाढा कसा चालवला असेल बरं….?
हा प्रश्न आजही मनाला कधी कधी छेडून जाते व विचार करण्यास भाग पाडते. जसजसे आम्ही मोठे होत गेलो तसा तसा आम्ही मोलमजुरी पासून तर घरच्या कामात शिक्षण करतानाही हातभार लावत गेलो , तिन दिवस शाळा व चार दिवस शेतमजुरी अशाप्रकारे गावातील सातवीपर्यंत शिक्षकांच्या मर्जीवर पास होत गेलो गावातील सर्व शिक्षक परिस्थिती जाणून त्यामुळे मुलांना रोजच शाळेत पाठवत जा असा कधी शिक्षकाचा अट्टाहास नव्हता. मुलीचे शाळेत नाव आहे ना? यावर शिक्षक समाधानी होते. ओळखीचे शिक्षक म्हणायचे ” बाई तु फक्त मुलीचे नाव शाळेत घाल ” नंतर पाहू काय ते , फक्त मुलीना शिकू दे पास, वरपास का होईना मुलींना गावात शाळा आहे तोवर शिकव. आईचे कष्ट श्रम जिद्द व सातत्यपूर्ण
जीवनशैली तर एकीकडे वडीलाचे विनाकामाने जुगार वरलीमटका याची येणारी लत त्यामुळे खेळणे,बागडणे, बालपण, शाळेची ओढ बरीच मागे पडली, तरीही त्यावेळच्या मानाने व खेड्यातील अनुभवानुसार,अडाणी आईचे संस्कार कळत नकळत खुप काही जगण्याचे सार शिकवून गेले कधी हातात लेखणी घेवून शब्द गिरवायला तिला वेळ मिळाला नाही किंवा पुस्तक हातात देवून वाचन कर असे म्हटले नाही, शेतातून आली की घरच्या कामात व्यस्त व्हायची , वर्ष दोन वर्षा काठी दिर ननंद यायचे दिराचे लग्न,आई लग्न करून आल्यावर काही वर्षाने तिच्या हातूनच झाले असले तरी तीने कधी स्वताचा गवगवा करून मोठेपणा मिरवला नाही.आजीच्या अट्टाहासामुळे मोठ्या दोन बहिणी असून नातवाला दुसरा नातू सोबत हवा म्हणून मुलाची वाट पाहता आम्ही तिघ्या बहिणी झालो.
आईने कुणालाही न सांगता तिसऱ्या मुलीच्या वेळी महीणाभराच्या मुलीला सोबत घेवून सरकारी दवाखाना गाठला कुणाला न सांगता व कुटुंब नियोजन करून आली .
घरी आल्यावर आजीचा एकच नाद तुला ऑपरेशन करायला कोणी सांगितले. आठ दिवस चुल पेटली नव्हती
अशी आई सांगायची. उन्हाळ्यात मे महिना पुडे बांधनिचा टेंभुर्णीचे पुडे बांधायला बसलो की आई तिच्या भावना आमच्या जवळ व्यक्त करायची . तेवढा एकच महिना भरभरुन आई आमच्याशी गोष्टी गप्पा आईच माहेरपण, बालपण आठवणी,लग्नाचा प्रसंग सर्व काही सांगायची. आई शाळेची पायरी कधी चढली नाही. म्हणून लिहिण्यावाचण्याशी संबध नव्हता. पण मोलमजुरीचा हिशोब पैशाची रोखठोक तिच्या तोंडी असायचा इकडचा पैसा कधी तिकडे जात नव्हता, कधी लेकरांच्या शिक्षणासाठी किंवा संसारासाठी व्याजाने पैसे काढले तर हिशोब पक्का असायचा. कितीही कठीण परिस्थिती आली तरी तिने हार मानली नाही. किंवा खचून गेली नाही.
पाहुण्यांची नेहमीच घरी वर्दळ त्यात भावाचा मित्र आईच्या भाचीचा मुलगा दोन तीन वर्षासाठी शिक्षणाला,येते जाते पाहूणे बहिणीची रस दिवाळी , पाहुण्यांना आहूनचार पाहूनचार होत नसला तरी चार घास पोटात घातल्याशिवाय कुणालाही घराबाहेर पडू द्यायचे नाही असा आईचा अट्टाहास , खुप काही आमच्या मनात बिंबवून गेली. जगताना स्वतःसाठी जगणे कामाच्या व्यापात कधीच विसरून गेली. भावनेचा जरी कोंडमारा होत असला तरी, डोईवरचा पदर व तिच्या नवनारी लुगड्यातील तिच्या मनातील सात्विक आणि सोज्वळपण कामाच्या व्यापात ही भरभरून वाहणारा वात्सल्य,
जिव्हाळ्याचा निरागस झरा भल्या भल्याना प्रभावित करणारा व प्रेरणा देणारा निश्चितच होता. आईचा जिवन प्रवास खुप खडतर व अवघड असला तरी तीने ज्या प्रकारे संसाराचा भार एक कर्तव्य दक्ष स्त्री, एक आई ,नात्याच्या बंधनात अडकलेली एक गृहिणी म्हणून वैचारिक बांधिलकीने बांधून तीने स्वताला,नात्याला, आपुलकी व भावानुबंध निश्चितच जपले होते. ती आज नसली तरी आमच्याघरात नातेवाईकात व शेजारी , वैचारिकतेची नाड व नात्याची जोडलेली बांधिलकी तीने पुरेपुर जपण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या स्मरणातील आईच्या स्मृती पुन्हा नव्याने प्रबोधिनी मंच निमीत्ताने जागृत झाल्या, तिच्या उध्दार व्यक्तीमत्वाबद्ल लिहिण्याची संधी मिळाली आजही तिचं निरागस उध्दार व्यक्तीमत्व डोळ्यासमोर आलं की मनात विचाराचा काहूर माजते. व स्त्री जिवनाचा एक एक पैलू उलगडत जाते.आईचं दातृत्व, कर्तृत्व मातृत्व काय असते हे आईच्याच विश्वात अनुभवायला मिळते . आईपण व बाईपण कसं असतं हे नव्याने
सांगण्याची गरज भासत नाही.
आईवर लिहिण्यासारखे तर खुप आहे, परंतु काही बंधने असल्याने मी आटोपते घेते व आईच्या स्मृतीस अभिवादन करते……
आई म्हणजे सागरातील शांत लाटेचा प्रभावी किणारा…
आई म्हणजे संथ प्रवाही निखळ झरा…
आई म्हणजे विश्वासाने जगण्याचे सार….
आई म्हणजे विचार क्षमतेची तेजस्वी धार……
आईच्या स्मृतीना उजाळा …….

नंदा भगत कारंजा लाड
जि.वाशिम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here