
धरित्रिचे नानाविध रंग लावी जिवाला लळा
तिच्याच वात्सल्यापोटी पसारा वाढला एवढा
ती पुत्रवती नवनव्या अंकूरास जन्म देते
रंगवती होवून फळा फुलाचे पोषण करते
रंग गंधाच हिरवं लेणं, ओटीत सुजनाच महादान
ओतप्रोत गर्भात अंकूर, तिच्या जगण्याला चैतन्य
जिवाचे पोषण करते ,पिकाला मांडीवर खेळवते
निसर्ग हिरवा राखण्याच, चैतन्य सदा तेच देते
सत्व परिक्षा तिची ,संपत्तीचा मानवी छळ
पशूपक्ष्या मानवा जगण्या, आयुष्य गुपित गुढ
माती घडते घडविते, वृक्षासवे खेळते वाढविते
सहानुभवाची बाग सदा, वसुंधरा उमलत ठेवते
आभाळ अन तुझे, वर्षानुवर्षे ऋणानुबंध कसे
ढग मोहून तुझ्यावर, पावसाळे भेटण्यास वेडेपिसे
ऋतुचक्राची जातकुळी एकच,बाई अन् मातीची
मातीच्या कुशी वृक्ष धनधान्य, जिव बाईच्या कुशी
नंदा भगत/ कारंजा लाड
जि. वाशिम















