prabodhini news logo
Home कल्याण प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – निसर्ग

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – निसर्ग

0
203

निसर्ग म्हणजे आपल्या सभोवतालचे जग, यामध्ये मानव हस्तक्षेपाशिवाय अस्तित्वात असलेले सर्व काही समाविष्ट असते. पर्वत, जंगले, वाळवंट, नद्या, समुद्रकिनारे, महासागर, ज्वालामुखी, ऋतू, हवा, हवामान, प्राणी, वनस्पती. निसर्ग सुंदर आणि शक्तिशाली दोन्ही आहे. पहाटेची शांतता आहे, आणि ज्वालामुखीचा उद्रेक पण आहे. जगाची उत्क्रांती झाली. कालांतराने जग विकसित झाले. मानवाचे निसर्गाशी नाते फार प्राचीन आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी समृद्ध केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ संसारातील कटकटींनी ग्रासलेल्या तुकाराम महाराजांना घरापासून दूर अरण्यात वृक्षवेलींच्या सहवासात मोकळे वाटत असे. त्या एकांतात ते आपले मन मोकळे करत आणि आत्मसंवाद साधत. निसर्ग आमचा अन्नदाता आहे. निसर्गाच्या कुशीतून आम्हांला अन्न मिळते. निसर्गाने दिलेल्या पाण्यानेच आमची तहान भागते. निसर्ग आम्हांला विविध प्रकारची औषधे देतो. त्यांतूनच आमचा ‘आयुर्वेद’ समृद्ध झाला आहे. निसर्गाने आपल्याला मुक्त अनेक गोष्टी दिल्यात आपण देखील त्यांचा मुक्तपणे उपभोग घेत आहोत. बऱ्याच वेळा तर ओरबाडून घेण्यास देखील आपण मागे पुढे पहात नाही. मात्र याच निसर्गाला आपण काय देतो याचा विचार केल्यास आपण येथे कमी पडतो. त्यात आणखी काही गोष्टी आपण टाकल्यास निसर्गाचा समतोल साधण्यास नक्कीच मदत होईल.
प्रथमतः आपण निसर्गाकडून काय घेतो याचा विचार करुया! माणसाच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा आणि त्याही पुढे जाऊन आरोग्य, शिक्षण, प्रवास, मनोरंजन, संरक्षण तसेच फॅशन व ऐशो आरामाच्या सर्व गरजा भागविण्यासाठी माणूस निसर्गावरच अवलंबून आहे. दगड, माती, लाकूड, वाळू, कपडा, कागद, औषधी, रसायने, कोळसा, नैसर्गीक वायू, काच, लोखंड, सोने यासह सारे धातू, इंधन व प्लास्टीक इत्यादी सर्व गोष्टींचा उपयोग माणसाच्या गरजा भागविण्यासाठी होतो. या सोबतच माणूस समुद्रातून मासे, शिंपल्यांसह इतर जलचर मोती, माणके गोळा करतो. मात्र हे सारं आपल्याला देत असलेल्या निसर्गाला आपण काही परत द्यायला हवं हेच विसरतो.
निसर्ग फार मोठा किमयागार आहे. निसर्गाची किमया कि एवढ्या वनस्पती आहेत पण एक दुसऱ्यासारखी नाही. निसर्ग विविध फुले फुलवतो. निसर्ग हा माणसाचा मित्र सुध्दा आहे. उन्हापासून माणसाला वाचवण्यासाठी वृक्ष सावली देतो. ग्रीष्माच्या दाहकतेपासून माणसाला वाचवण्यासाठी पावसाचा वर्षाव होतो. पर्वतांच्या उंचीमुळे वादळी वाऱ्यापासून रक्षण होते. झाडांची मुळे जमिनीत खोलवर गेल्याने जमिनीची धूप थांबवतात. झाडांच्या श्वसनामुळे अशुद्ध वायू कमी होऊन माणसाला प्राणवायू मिळतो. निसर्गातील विविध प्राणी, पक्षी, कीटक हे देखील जणू काही माणसाच्या सुखाचाच विचार करतात. मधमाश्यांच्या मेहनतीतून माणसाला मधुर मध मिळतो.
निसर्ग हा एक मोठा दाता आहे. आपल्याकडे जे जे काही आहे ते दुसऱ्याला द्यावे, हा संदेश निसर्ग पावलोपावली देत असतो. उंच कड्यावरून कोसळणारे धबधबे माणसाला नयनसुख देतातच. शिवाय त्यांच्या शक्तीचा उपयोग करून माणूस विद्यूतशक्ती, ऊर्जा निर्माण करतो. बेधुंद वाहणाऱ्या वाऱ्याच्या सामर्थ्यावर माणसेच पवनचक्क्या फिरवतात. सतत खळखळाट करणारा सागर माणसाला आपल्या उदरातून क्षार, शंख, शिंपले, मत्स्यधन देतच असतो. वसुंधरा युगानुयुगे आपल्या अंतरंगातील अमाप संपत्ती माणसांवर उधळत आहे. पण माणूस मात्र आज बेफाम झाला आहे. निसर्गाशी असलेले आपले नाते विसरला आहे. निसर्गांनी युगानुयुगे दिलेले वैभव, सुबत्ता यांची त्याला आठवणही राहिली नाही. क्षुल्लक स्वार्थापायी तो झाडे तोडतो, जंगले उद्ध्वस्त करतो, नदयांचे गोड पाणी अस्वच्छ करतो, सागरात आपला केरकचरा फेकून त्याच्या अथांगतेलालाही अडसर निर्माण करतो. नैसर्गिक टेकड्या, डोंगर, तलाव आपल्या वास्तव्याने दूषित करतो आणि मग मागे केवळ प्रदूषण राहते. आपल्या शिकारीच्या हौसेपोटी माणसाने आज कित्येक निसर्गदत्त पक्षी नष्ट केले आहेत. अरण्ये उजाड केली आहेत. माणसाला निसर्गाशी असले आपल्या नात्याचा विसर पडला आहे. निसर्गात असलेले स्वतःचे स्थान विसरला आहे.
26 जुलै 2005 देशामध्ये अतीवृष्टी झाली होती. मुंबई मध्ये लोकांच्या घरात पणी शिरले होते. कुर्ला येथे दरड कोसळून 80 लोक मरण पावले होते. मी रत्नागिरी जिल्हयात नोकरीला होतो. मी पुर्वी कुर्ला मतदार संघात निवडणुकीची कामे केली असल्याने ती कामे करणारांना अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांचे सर्वेक्षण करण्याकरीता कुर्ला मतदार संघात काम करण्यासाठी मला शासनाकडून आदेश आले होते. अतीवृष्टीमूळे कोकण रेल्वे ठप्प झाली होती. मुबंई गोवा महामार्गावर 22 ठिकाणी दरड कोसळली होती. वाहतुक पुर्णपणे बंद होती. अशावेळी प्रवास कसा करायचा? निसर्गाच्या किमयामुळे हा प्रसंग माझ्यावर आला नव्हता. माझ्या मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तो आणला होता. दोन्ही जिल्ह्याचे नुकसान झाले असतांना एका जिल्हयातून दुसऱ्या जिल्ह्यात बोलाविणे, शासनाचे आदेश येणे योग्य होते कि अयोग्य? कारण तिकडे पण नुकसान झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबईमध्ये बोलाविणे मला योग्य वाटले नाही, हे मात्र सत्य आहे की मुंबईची माहिती मला जास्त होती, हे एका अधिकाऱ्याला माहित होते. म्हणून बोलविले होते असे तो अधिकारी म्हणाला. रेल्वे, बस बंद असल्यावर मी येईल कसा? माझे निसर्गावर प्रेम आहे. माझ्या निसर्गाच्या प्रेमामुळे सर्व ठिक झाले. अख्ख जग एका क्षणात झोपावयाची ताकद निसर्गात आहे. मानव मात्र अहंकाराने एकमेकांना संपवण्याची धारणा ठेवतो कोरोनाने थोडाही जातीभेद वर्णभेद धर्मभेद किंवा प्रांतभेद केला नाही. सगळ्यावर सारखे प्रेम दाखवत घरातच डांबले होते. प्रदुषण कमी करा. निसर्गाच्या नियमाचे पालन करा. निसर्गावर प्रेम करा योग्यवेळी तो इतके भरभरून देईल की मागायचे कामही पडणार नाही.
मानवाला जे दिलयं ते अमुल्य आहे. मात्र यापैकी सर्वात महत्वाच्या दोन बाबी आहेत. एक म्हणजे हवा व दुसरं पाणी. यातील पाण्याचा प्रश्न अलिकडे फारच गंभीर झालेला आहे. आपल्याकडे पाऊस भरपूर पडतो. आपला देश नैसर्गिक सुबत्ता लाभलेल्या देशांपैकी एक आहे. पुर्वी आपल्याकडे पावसा संबंधी काही ठोकताळे होते. त्यानुसार नक्षत्रांची आखणी केलेली आहे. कित्येक वर्षे हा नक्षत्रांप्रमाणे पाऊस नियमीत पडे. त्यामुळे पावसाचा अंदाज बांधणे सोपे जाई. मात्र आता पाऊस हा नक्षत्रांप्रमाणे पडेलच असं नाही. तरीही गेल्या काही वर्षांच्या अनुमानानुसार पाऊस जरी अनियमीत पडत असला तरी पाऊस आपली सरासरी पुर्ण करतो हा अनुभव आहे. मात्र असं असुनही अलिकडे आपल्याला मार्च, एप्रिल महिन्यापासुनच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवतं मे महिन्या अखेर व जुनच्या सुरुवातीला प्रचंड पाण्याची टंचाई असते. पावसाळ्यात पावसाचे पडलेलं पाणी जेवढ्या प्रमाणात जमिनीत मुरायला पाहिजे त्या प्रमाणात ते मुरत जिरत नाही. म्हणून पाण्याचा साठा करने महत्वाचे आहे. वाढलेली जनसंख्या व माणसाच्या वाढलेल्या गरजा यामुळे पाणी उपसण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. यांत्रीक पंपाच्या सहाय्याने माणूस 300 ते 500 फुटांच्या खोलीवरुन पाणी सहज उपसू लागला आहे. त्यामुळे काटकसरीने जपून पाणी वापरण्याची सवय कुणाला राहीली नाही.
झाडे तोडल्यामुळे जमिनीची धुप होऊन तळी, सरोवरे, विहीरी गाळाने भरण्याच्या वेगात वाढ झाली. त्याचा पावसाच्या नियमीतपणावरही परिणाम झाला आहे. औद्योगीकरणामुळे कारखाने व वसाहतींसाठी इमारती बांधल्या गेल्या. यासाठी दगड मातीच्या आवश्यकते मुळे डोंगरांमध्ये खाणी काढून खनिजाचे उत्खनन सुरु झाले. डोंगरांच्या सपाटीकरणामुळे पर्जन्यमानावर परिणाम झाला. जंगलांवर दुहेरी अतिक्रमण चालू आहे. एका बाजूने स्थानिक नागरीक सरपणासाठी यांची तोड करतात व मोकळ्या झालेल्या जागेवर शेती करतात. दुसऱ्या बाजूने ही जंगले साफ करून त्यावर भराव टाकून इमारती बांधल्या जात आहेत. अशारितीने ही जंगले नष्ट होत आहेत. तसेच पाण्याच्या प्रदुषणाचा प्रश्नही तेवढाच गंभीर आहे. औद्योगीक वसाहती व शहरांमधून आपण निर्माण करीत असलेल्या सांडपाण्याच्या पूर्णवापराचा विचार झाला पाहिजे. पाणी काटकसरीने वापरण्याची सवय अंगी बाणवून घेणं ही तेवढंच महत्वाचं आहे. फक्त पैशाचीच बचत नको पाण्याची पण बचत झाली पाहिजे.
पाणी फार महत्वाचे आहे. रोहणी नदीच्या पाणी वाटपावरून सिध्दार्थ गौतमाने गृहत्याग केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी महाडचा सत्याग्रह केला होता. शिवाजी महाराजांनी पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेचा अतिशय सुंदर उपयोग केला आहे. आपल्या किल्ल्यांवरील खडकात हौदे खोदून पावसाळ्यात मुरलेलं पाणी पाझरून त्या हौदांमध्ये साठवलं जाईल अशी व्यवस्था त्या काळात करून ठेवली होती. पेयजल हे मर्यादीत आहे अमर्यादित नाही एवढं लक्षात ठेऊन शक्य तेथे पाणी वाचवून, शक्य तेवढे साठवून व शक्य तेवढे पाणी जिरवण्यासाठी प्रयत्न करुन तसेच सांडपाण्याचा पुर्नवापर झाडे जगविण्यासाठी करुन हे निसर्गाचे देणे परत देण्याचे काम आपण केले पाहिजे. मानव स्वतःला अमर बनवण्याच्या प्रयत्नात अनादिकालापासून प्रयत्न करत आहे. पण जिथे निसर्गाला मानवाची एकादी गोष्ट अपायकारक, हानिकारक होते, निसर्गातील संतुलन बिघडते तेव्हा मात्र ते संतुलन पूर्वस्थितीत आणण्यासाठी निसर्ग त्याच्या गतीने त्याच्या नियमाने जे काही करेल ते मानवाला मान्य करावे लागते.

प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here