
अपेक्षा या शब्दाचे अर्थ संदर्भानुसार वेगवेगळे असू शकतात. परंतु सर्वसाधारणपणे ते भविष्यात काय घडेल याबद्दलचा विश्वास किंवा अपेक्षा दर्शवितात. दैनंदिन भाषेत, सोप्या भाषेत अपेक्षा म्हणजे एखाद्या दिवशी काहीतरी घडेल, अशी आशा किंवा भाकित करता येणे. जसे एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर बैठकीला बोलविले, तेव्हा तुम्ही त्याच्या येण्याची वाट पाहत असता, तुम्ही अपेक्षा करता की तो नियोजित वेळेवर येईल. तुम्ही त्याच्या अपेक्षाशी ते तुमच्या इच्छेशी जोडले जातात. तुम्हाला एखादा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही अशी अपेक्षा करता की चित्रपट चांगला असेल आणि तो तुमच्या इच्छेची पूर्तता करेल.
अपेक्षा ही आपल्याला काय मिळवून देते किंवा इतर आपल्याकडून काय अपेक्षा करू शकतात. समाजात, कुटुंबात अपेक्षांना नियम, कर्तव्ये, जबाबदारीशी जोडता येत नाही. पालकांना अनेकदा आपल्या मुलांच्या यशासाठी अपेक्षा असतात. याचा अर्थ असा की मुलं कर्तव्याचे पालन करतील आणि पालकाची अपेक्षा पूर्ण करतील. वर्तन आणि दृष्टिकोन घडवण्यासाठी अपेक्षा महत्वाची भूमिका बजावते. जर एखाद्या गोष्टीत अपयश येण्याची अपेक्षा असेल तर तर ते प्रयत्नही करणार नाहीत, उलट जर त्यांना यशाची अपेक्षा असेल तर ते अधिक प्रयत्न करण्यास प्रेरित होऊ शकतात. मानसशास्त्रानुसार अपेक्षा सिद्धांत सूचित करतो की एखाद्या व्यक्तीची प्रेरणा त्याच्या कृतीच्या अपेक्षित परिणामावर अवलंबून असते. जर एखाद्या व्यक्तीला त्यांच्या प्रयत्नांना यशस्वी निकाल मिळण्याची अपेक्षा असेल, तर ते अधिक प्रयत्न करण्याची शक्यता जास्त असते. अपेक्षा म्हणजे भविष्यात जे काय घडू शकेल याबद्दलचा विश्वास किंवा गृहितक होय. जी वैयक्तिक अनुभवावर, काही नियमावर, किंवा इच्छावर आधारित असते. हा एक आशावाद असतो. हे इच्छेचे भविष्यकालीन प्रक्षेपण आहे. यामध्ये आपल्याला काहीतरी चांगले मिळेल अशी अपेक्षा असते.
आपल्या आयुष्यात काही परिवर्तन घडवून येण्यासाठी माणूस अपेक्षा करतो, स्वतः हसत राहणारे अनेकजण भेटतील पण, दुःखात पाठीमागे राहून साथ देणारे बोटावर मोजण्या एवढेच भेटतील. हसवणारे फार कमी प्रमाणात भेटतील पण, रडवणारे मात्र जागोजागी भेटतील. म्हणून याची पूर्णपणे जाणीव ठेवून कोणाकडूनही, कशाचीही अपेक्षा ठेवू नये, ते आपले काम करत असतात आपण आपले काम करत रहावे. फरक एवढाच की, प्रत्येकांची काम करण्याची पद्धत जरा वेगवेगळी असते. जीवनात अशाही काही गोष्टीची आवश्यकता असते. त्यांचाही स्वीकार करता आला पाहिजे. अपेक्षा स्वतःकडून ठेवाव्यात. दुसऱ्याकडून ठेवल्यास त्रास होतो. अपेक्षा कधी पूर्ण होतात कधी नाही. अपेक्षा पूर्ण न झाल्यास निराशा येते. जिद्दीने कार्य करावे आणि स्वबळावर ते मिळवावे. तुकाराम महाराज म्हणतात ‘ठेविले अनंत तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ याचा अर्थ असा की आहे त्या प्राप्त परिस्थितीत आनंदाने राहावे, दुसऱ्याशी तुलना करून दुःखी होऊ नये.
नको अती कोणती अपेक्षा
जीवन जगावे समाधानाचे l
सदा प्रेम मैत्री शांती असावी
हेची लक्षण सुखी जीवनाचे l
नको अपेक्षा दुसर्यांकडून
अपेक्षाभंगाने दुःखी न व्हावे l
समाधानाचे मुल्य जाणावे
आपले कर्तव्य करीत जावे l
काम करत राहावे आपले
ठेवू नये कसलीही अपेक्षा l
निराशेचे क्षण येऊन जीवनी
होऊन जाईल तुमची उपेक्षा l
करू नये कुणाची अपेक्षा
आपले कर्म करीत राहावे l
नको मनावर अपेक्षांचे ओझे
सदा सर्वदा समाधानी असावे l
करू नये अपेक्षा जीवनात
पदरी पडेल ती फक्त निराशा l
स्वबळावर मिळवावे सामर्थ्य
स्वावलंबनाची ठेवावी आशा l
तुमच्याकडून अपेक्षा करणारा
तुम्हाला आपला मानत असतो l
सुख दुःखात तटस्थ असणारा
कधी काही अपेक्षा करत नसतो l
एकदा आपली गरज संपली की, आपल्याच ओळखीच्या माणसांकडून बदलेलेले स्वभाव तसेच वेगवेगळ्या प्रकारची मानसिकता बघायला मिळत असते. अशा वेळी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्याने दुःखाची दरी खोलवर तयार होत असते व एकदा त्या दरीत माणूस कोसळला की पुन्हा वर येण्यासाठी कशाचाही आधार मिळत नसतो. म्हणून त्या निर्माण झालेल्या परिस्थितीला बघून त्याच परिस्थितीतून नव्याने जगायला शिकले पाहिजे. दुसऱ्याला जेव्हा आपणाकडून मदतीची गरज असते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो, आणि आपल्याला अडचण पडली की मात्र त्याच व्यक्तीकडे सहकार्य करण्याची अपेक्षा आपण करत असतो. ज्यावेळी आपणच दुसऱ्याला मदत करत नाही तर दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे? म्हणून मदत जरी करता नाही आली तर चालेल पण, त्या प्रसंगी एवढीही पाठ फिरवू नये की, दुसऱ्यांदा मदत मागण्यासाठी जागा नसेल. निःस्वार्थ भावनेने जे इतरांना द्यायला शिकतात त्यांना कोणाकडूनही घेण्याची अपेक्षा मुळातच नसते कारण अपेक्षा ठेवून ते दुःखाचे कारण बनत नाही, आणि शक्य असेल तर आपल्या परीने शेवटच्या क्षणापर्यंत ते देण्यासाठी धडपडतच असतात. आपणही तशाच व्यक्तीकडून थोडं तरी शिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कोणी म्हणतात की अपेक्षा वाढल्या व त्या पूर्ण झाल्या नाही तर वाढत्या अपेक्षांमुळे आपल्यालाच त्रास सहन करावा लागतो. एवढेच नाही तर आपल्याला दुःख सुध्दा होते. म्हणून व्यर्थ दुःखाचे आपण कारण का बनावे? स्वतःला होणारा त्रास सहन का करायचा? त्यासाठी कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपले कार्य सुरू ठेवावे. जीवन जगत असताना निव्वळ सुखाची अपेक्षा करु नये. आपल्यात नम्रता ठेवून दुःखाचे सुद्धा स्वागत करायला शिकले पाहिजे. त्यांच्यासोबत राहून कठीण दिवस सुद्धा हसत हसत काढता आले पाहिजे कारण सुख जसे आनंद देत असते तसेच दुःख सुद्धा आपल्याला अशा सर्वच गोष्टी शिकवत असते.
परिवर्तन निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे, जगातील सर्व वस्तू अनित्य आहेत. जे जन्माला आले ते एक दिवस या जगाचा निरोप घेणार आहेत. म्हणून निसर्ग नियमाचे पालन केले पाहिजे. निसर्गाकडून कोणतीही अपेक्षा करता येणार नाही. काही अपेक्षा शासनाकडून करण्यात येतात. माणूस म्हटल्यावर लहान मोठ्या अपेक्षा ठेवता येतील परंतु त्या अती प्रमाणात नको. त्यामुळे दुःख पदरी पडू शकते. गरिबांच्या अपेक्षा, शेतकऱ्याच्या अपेक्षा, लाडक्या बहिणीच्या अपेक्षा, ज्येष्ठ नागरिकांच्या अपेक्षा, मागासवर्गीयांच्या अपेक्षा, अपंगाच्या अपेक्षा, जनतेच्या रस्त्याच्या, पाण्याच्या, वाहतुकीच्या, पावसाळ्यात खड्डे बुजविण्याच्या, शाळकरी मुलांच्या, मोबाईल टॉवरच्या, नाल्यावर पुल बांधण्याच्या, बेरोजगारांच्या, विज पुरवठ्याच्या या समस्या मात्र लोकांच्या मनात निर्माण होतात. या अपेक्षांची पूर्तता सरकारकडून करण्याची अपेक्षा करण्यात येते. पण अपेक्षा पूर्ण होते का? नाही… त्यासाठी मोर्चे, आंदोलने करावी लागतात. काही लोकांच्या अपेक्षा पैशाने पुर्ण होतात. परंतु तो पैसा अधिक मिळविण्याची त्यांचीही अपेक्षा असते. सर्वात जास्त उपेक्षित शेतकरी वर्ग असतो. तो प्रामाणिकपणे शेतात काम करतो, त्याच्या मालाला भाव नाही. तो जगाचा पोशिंदा असतो, त्यालाही आंदोलन करावे लागते.
विविध गोष्टीतून अपेक्षा निर्माण होतात. त्यात वैयक्तिक अनुभवातून भविष्याचा अंदाज बांधण्यात येतो. समाज सुद्धा एखाद्या व्यक्तीची अपेक्षा पूर्ण करते. व्यक्तीच्या मनात असलेल्या इच्छा आणि ध्येयामुळे भविष्यात काय घडेल अशी अपेक्षा निर्माण होते. व्यक्तीची मानसिक स्थिती आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावरही अपेक्षा अवलंबून असते. अपेक्षा कमी ठेवल्यास निराश होण्याची शक्यता कमी होते. उच्च अपेक्षामुळे काहीतरी चांगले घडेल अशी भावना असते. अपेक्षांचे योग्य संतुलन साधले गेले पाहिजे. ज्याच्या मनात विकल्प किंवा नकारात्मक विचार अधिक येतात, त्याच्या मनात अपेक्षा अधिक असतात. ज्याच्या स्वभावात मीपणा, अहंभाव, त्यांच्या अपेक्षा तीव्र असतात. त्यांना चुकांची जाणीव होत नाही. यात आवडी निवडीचा भाग असतो, यात जवळच्या व्यक्तीकडून जास्त अपेक्षा असतात. कौटुंबिक नाते, आईवडिलांचे नाते, कार्यालयातील अधिकारी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांकडून अधिक कामाची अपेक्षा करतात. कार्यालयात अधिक काम करू नये अशी कर्मचाऱ्याची अपेक्षा असते. अपेक्षांची पूर्ती न झाल्यास व्यक्ती आतल्या आत रागाने धुमसत असतो. त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो. याचे प्रमाण पती पत्नीत अधिक असते. अपेक्षा गोंधळात पण टाकू शकते. अयोग्य अपेक्षा केल्याने हानी पण होऊ शकते. अपेक्षा पूर्ण न झाल्यास मनात अपेक्षांची गर्दी होऊन ऊर्जा आणि वेळ वाया जाऊ शकते. अनेकदा माणूस स्वतः काहीच करत नाही परंतु इतरांकडून अपेक्षा करत असतो. आळशी माणूस जास्त अपेक्षा करतो. परिस्थितीवर मात करता न आल्यास अपेक्षाचे प्रमाण वाढते.
कर्तृत्ववान माणूस साहाय्याची अपेक्षा न करता स्वतःच कृती करून फलनिष्पत्ती वाढवतो. साहजिकच तो इतरांकडून अपेक्षा करण्याचे टाळतो. अपेक्षायुक्त मन अकार्यक्षम असते. अपेक्षा करणे टाळल्यास मनाच्या ऊर्जेची बचत होईल. ज्यापासून काही लाभ होणार नाही अशा अपेक्षा सोडून द्यावे. असे विचार मनात येऊ देऊ नये हाच सर्वोत्तम उपाय आहे. जीवनात द्या व घ्या ( Give and Take ) ही भूमिका स्वीकारावी, कारण जग दिल्या घेतल्याचे आहे. दुसऱ्यांनी गोड बोलावे, सहकार्य करावे, मदत करावी, अशा अनेक अपेक्षा आपण दुसऱ्याकडून करतो. ज्या गोष्टी आपल्याला समोरच्याने करावे असे वाटते त्याची सुरुवात स्वतःपासून करावी. आपण ज्या गोष्टीची अपेक्षा दुसऱ्याकडून करतो तसे आपण वागत नाही. Give and Take द्या व घ्या सुरुवात स्वतःपासून करा, वेळ, मदत, सल्ला अशा स्वरूपात आपल्याला जमेल तसे देत राहा, अनुभव घ्या, तशी मदत, सहकार्य झाल्यास नक्कीच मनाला समाधान मिळेल. निरपेक्षपणे स्वतःत आनंद शोधा.
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण















