
ग्रीष्माने तप्त अवनिला
आतुरता वर्षा ऋतूची
कोसळणाऱ्या धारांनी
चिंब चिंब भिजण्याची
डोळे आभाळा भिडलेले
नजरेत वेध पावसाचे
कृष्ण शामल मेघांच्या
बरसत्या आगमनाचे
वादळ वाऱ्यांच्या साथीने
दामिनी लागली हसू
घन ओथंबून आले खाली
जलधारा लागल्या बरसू
थेंब टपोरे गवतावरती
अलगद लागले झुलू
झाडे वेली पाने फुले
वाऱ्यासंगे वेगे डोलू
पहिला पाऊस आला
निसर्गाच्या हिरव्या कुशीत
डोंगर दऱ्या भिजून गेल्या
रानवाटा हसल्या खुशीत
ओलेत्या मातीचा गंध
आसमंती दरवळला
माझ्या मनी माझ्या देही
मोगरा प्रीतीचा फुलला
सौ. वंदना शशिकांत पाटील















