
नवरात्र म्हणजे फक्त विविध रंगांच्या साड्या परिधान करणे फेर धरून गरबा खेळणे एवढेच नसून या प्रकृती, निसर्गापरी नतमस्तक होऊन पर्यावरणाची आराधना ,पंचतत्वाचा जागर करणे होय. नवरात्रीत मांडलेला घट व अखंड ज्योत हे पंचतत्वाचे धोतक होय.हजारो वर्षापासून निसर्ग आपली आई बनून काळजी घेत आलेला आहे पण आपण मात्र या निसर्ग, पर्यावरण ,पंचतत्वे(माती, जल , अग्नी,आप, वायू )त्या सर्वांचा आधार म्हणजेच भूमाता विषयी अजूनही जागरूक नाही आहोत. आज जी ढगफुटी, अतिवृष्टी ,पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे यालाही सर्वस्वी आपण जबाबदार आहोत हे मान्य करायला हवे.
विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात भौतिक विकासाच्या हव्यासापोटी पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात रहास केलेला आहे. आपण स्वतःला बुद्धीवादी म्हणून घेतोय पण या बुद्धिवाद्यांनी साधलेला विकास खरंच पिढ्यानपढ्याची जोपासना करणारा आहे का ?हा प्रश्न मला भडसावतो. माती ,पाणी, आप, (आकाश) वायू ,अग्नी हे आपले खरे पंचतत्वे याचाआपण कायम समतोल राखायला हवा.
बालपणी खेळताना पडलो खरचटलं तर अंगणातील माती जखम भरण्याची काम करायची पण आज मात्र जखमेवर माती लागली की इन्फेक्शन होते म्हणजेच प्रादुर्भाव होतो. कारण काय तर आज त्या मातीत जीवन शक्ती प्राणशक्ती कमी होऊन माती मरणासन्न अवस्थेकडे जात आहे म्हणजेच तिची विष गर्भता वाढत चाललेली आहे जर आपण येणाऱ्या पिढ्यांच्या समृद्ध आयुष्याचा विचार करत असून तर नक्कीच आपण आज या भूमातेची काळजी घ्यायला हवी म्हणजेच आज आपण या भूमातेची आई बनण्याची गरज आहे या निसर्गाची आई बनण्याची गरज आहे असं मला वाटतं. तिचं योग्य पोषण करून विष गर्भता कमी करून प्राणशक्ती वाढवण्याची जबाबदारी आपल्या वरती आज आलेली आहे. वाढती लोकसंख्या गगनचुंबी इमारती बनवताना औद्योगिक विकास साधताना निसर्गातील या पंचतत्त्वांची मोठ्या प्रमाणात आज हानी होत चाललेली आहे त्यावरून आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी मौत का कुवा खोदून ठेवत आहोत असे मला वाटते. आपलं शरीर हे याच पंचतत्वापासून बनलेले आहे आणि त्यातील माती म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या जगण्याचा आधार.
मातीतून जन्मl मातीतच जगणंll
मातीतच विरनI आयुष्य हेll
याच्यापलीकडे आपल्या आयुष्याचा काहीही वेगळा अर्थ नाही कितीही विज्ञान, तंत्रज्ञानात्मक प्रगतीच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या तरी निसर्गा विषयी सज्ञानी असणं अधिक महत्वाचा आहे याचे भान आपल्याला असायला हवे. पंचतत्वांची आपली आपण जोपासना करायला हवी. हेच संस्कार आपण येणाऱ्या पिढ्यांवर करायला हवे. म्हणूनच निसर्गाची आई बनून तिची काळजी घ्यायला हवी. आज जी अतिवृष्टी, पूरग्रस्त परिस्थिती ओढवलेली आहे यालाही सर्वस्वी जबाबदार आपणच आहोत याचे भान आपण ठेवायला हवे. वाढत्या वैश्विक तापमानामुळे ईशान्य मोसमी वारे नैऋत्य मोसमी वारे व हिमालय वितळून निर्माण झालेला गरम हवेच्या दाबाच्या पट्ट्यांमुळे अनेक राज्यात भयावह पूरग्रस्त परिस्थिती ओढवलेली आहेआहे. पंजाब ,महाराष्ट्र, राजस्थान, उत्तराखंड यांची डोळ्यात अश्रू आणणारी परिस्थिती हे मानवनिर्मितच संकट आहे याचे भान आपण ठेवायला हवे. म्हणूनच या नवरात्रीत आपण या पंचतत्वापरी म्हणजेच पर्यावरणा विषयी जागरूक राहून त्याच्या संवर्धनाची, संरक्षणाची जबाबदारी फक्त सांगे वांगे नाही तर आई बनून घ्यायला हवी .म्हणजेच आजपर्यंत हा निसर्ग, हे पर्यावरण आपली जसे आई म्हणून काळजी घेत होते आपले रक्षण करत होते तसेआज या पर्यावरणाची आई बनून आपण रक्षण करण्याची जबाबदारी घेण्याचा संकल्प आपण अखंड मानव जातीने करायला हवा तरच पुढील पिढ्यांना आपण सुंदर जीवन देऊ शकू.
नवरात्रीच्या निमित्ताने या भूमातेस कोटी कोटी प्रणाम…
लेखिका : धनश्री राजकुमार मुसने, चंद्रपूर















