
बौध्द परंपरेत विजयादशमीला धम्मचक्र प्रर्वतन दिन म्हणून विशेष महत्त्व दिले आहे. आणि हा दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. 14 ऑक्टोबर 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील दिक्षाभुमीवर लाखो अनुयायांसोबत बौध्द धर्माची दिक्षा घेतली होती. तेव्हापासून भारतीय समाजजीवनात नवा अध्याय सुरू झाला. हा दिवस सामाजिक समतेचा, बंधूभावाचा व मानवतेच्या मुल्यांचा दीपस्तंभ ठरला. आणि तोच दिवस म्हणजे विजयादशमीचा दिवस होता.
बाबासाहेबांनी आयुष्यभर अस्पृश्यता, विषमता आणि अन्याय विरूद्ध लढा दिला. हिंदु धर्मातील जातीव्यवस्था आणि असमानतेतून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी शेवटी बौध्द धर्म स्वीकारला. बौध्द धर्मात समता, करूणा, मैत्री आणि प्रज्ञेचा सुंदर संदेश आहे. “मानवाने मानवाशी समता राखली पाहिजे” ही बाबासाहेबांची ठाम धारणा होती. त्यांच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा केवळ धार्मिक स्वीकार नव्हता, तर तो सामाजिक न्यायाचा आणि विचारस्वातंत्र्याचा मार्ग होता.
धम्मचक्र प्रर्वतन दिनाच्या दिवशी दरवर्षी लाखो अनुयायी दिक्षाभुमीवर एकत्र येतात. त्या दिवशी केवळ बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव होत नाही, तर बौध्द धर्माच्या मुल्यांची आठवण करून देत नवी प्रेरणा मिळते. समाजात बंधूभाव, प्रामाणिकपणा, कष्टाची गोडी आणि एकतेची भावना जागवण्याचे काम हा दिवस करतो. दिक्षाभुमीवर उभे राहून लाखो लोक बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करतात आणि आपल्या कृतींनी त्या विचारांना जिवंत ठेवण्याचा संकल्प करतात.आजच्या काळातही विषमता, अन्याय, भेदभाव यांचे आव्हान समाजासमोर उभे आहे. विज्ञान, पैसा, तंत्रज्ञान यांची झपाट्याने वाढ झाली आहे; पण माणसामाणसातील दरी अजूनही संपलेली नाही. अशा परिस्थितीत धम्मचक्र प्रर्वतन दिन आपल्या स्मरण करून देतो की खरी प्रगती फक्त साधनसंपत्ती आणि यंत्रांच्या वेगाने होत नाही, तर ती समता, बंधुता आणि न्याय यांच्या आधारावर घडते.
जर बाबासाहेब आजच्या घडीला आपल्यासमोर असते, तर त्यांनी नक्कीच धम्मकृतीची नवी दिशा दाखवली असती. ते सांगितले असते की बुद्धाचे धम्म केवळ ग्रंथात किंवा यत्रांमध्ये शोधायचा नाही, तर तो आपल्या कृतींमध्ये उतरवायचा आहे. पर्यावरण रक्षण, स्त्री-पुरुष समता, आर्थिक असमानतेविरुद्ध लढा, शिक्षणातील समान संधी, तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून मानवी विकास—या सर्वच क्षेत्रात धम्मकृती घडवणे आजची खरी गरज आहे. “समानतेवर आधारलेला समाज उभारल्याशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण राहते” हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रखर आहे.
धम्मकृती म्हणजे केवळ उपदेश नव्हे; ती म्हणजे दररोजच्या आचारात, नात्यांमध्ये, कामधंद्यात समतेचा आणि करुणेचा प्रकाश पेरणे होय. बाबासाहेबांचा संदेश आपल्याला आवाहन करतो की जातीभेद, धर्मांधता आणि अन्यायाविरुद्ध लढा देताना आपण रागाने नव्हे तर प्रज्ञा, मैत्री आणि करुणेच्या भावनेने उभे राहावे. डिजिटल युगातील विषमता—शिक्षण, रोजगार, माहिती यामधील दरी—ही सुद्धा त्यांच्यासाठी लढ्याची नवीन भूमी असती.धम्मचक्र प्रर्वतन दिन हा केवळ एका धर्माचा दिवस नसून तो सामाजिक क्रांतीचा प्रारंभबिंदू आहे. सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा ऐतिहासिक दिवस आहे. बाबासाहेबांचे विचार आठवून आपण प्रत्येकाने मानवतेच्या मुल्यांवर चालत राहावे, हीच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी आणि त्यांच्या कार्याला पुढे नेणारी खरी कृती ठरेल. धम्मकृतीच्या या प्रवासात प्रत्येकाची जबाबदारी आहे—आपण कुठल्याही पदावर, कुठल्याही स्तरावर असलो तरी समतेच्या बिजांची पेरणी करणे हेच खरे धम्मकार्य ठरेल.
संगीता बोरकर-बांबोळे
गोंडपिपरी,चंद्रपूर















