
विजयादशमी हा सण असत्यावर सत्याचा विजय या रूपात साजरा केला जातो. अज्ञानावर ज्ञानाने, वैऱ्यावर प्रेमाने पराक्रम गाजवीत विजय प्राप्त करण्याचा हा दिवस अतिशय शुभ समजल्या जातो. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस, विजयादशमी हा दिवस महान बौद्ध सम्राट राजा सम्राट अशोकाच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धर्मांतरासाठी अशोका विजयादशमी हा दिवस अपेक्षित आहे. या दिवशी दहा प्रकारचे अकुशल कर्म सोडण्याची प्रेरणा मिळते. धम्म हा एका व्यक्तीला दुस-या व्यक्तीसोबत उचित व्यवहार करण्याची शिकवण देतो व धमाच्या शिकवणुकीत असलेल्या मानसिक स्वातंत्र्यामुळे व्यक्ती स्वतंत्रपणे विचार करू शकतो.
सम्राट अशोकाने इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात अनेक राज्य काबिज केली होती, आणि अफाट साम्राज्य स्थापन केले. बुद्धाच्या विचाराने प्रेरीत होऊन त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. दहा दिवस चालणाऱ्या या विजय उत्सवाला ‘अशोका विजयादशमी’ म्हणतात. बौद्ध धम्माचा प्रचार करण्यासाठी सम्राट अशोकाने धम्म प्रचारकांना वेगवेगळ्या दिशांना पाठविले, त्याचाच एक भाग म्हणून मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठविले. अनेक वर्षा नंतर प्रतिक्रांती होवुन सम्राट अशोकाचे राज्य नष्ट झाले. बौद्ध धम्म नष्ट झाला होता. इंग्रज या देशात आल्या नंतर एक चिनी प्रवासी ‘ह्वेन त्सांग’ यांनी लिहून ठेवलेल्या प्रवास वर्णनावरून इंग्रजांनी अनेक ठिकाणी उत्खनन करून बौद्ध स्थळांना मान्यता दिली. सतत होणाऱ्या क्रांती प्रतिक्रांती मुळे बौद्ध धम्माचा ऱ्हास झाला. आज विजयादशमी या सणाची जागा दसरा या सणाने घेतली.
भगवान बौद्ध आणि सम्राट अशोक हे दोघेही राजाचे मुले होती. भगवान बुध्दाने आपल्या विचारधारेच्या जोरावर जगाला जिंकले. त्याच विचारधारेचा जगात प्रचार करण्याचे काम सम्राट अशोकाने केले. जर राजा शीलवान, चारित्र्यवान, आदर्श व नीतिमान असला तर त्यांचे मंत्री तसेच असतील शासन, प्रशासन उत्कृष्ट असेल. जनतेत सुख, समाधान, संपन्नता असेल, एकंदरीत समाजात न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता नांदेल. बौद्ध धर्माला समर्पित केल्यावर सम्राट अशोकाने युद्ध कधीही घोषित केले नाही. आपले संपूर्ण आयुष्य धम्मासाठी समर्पित करत त्यांनी आपल्या लोकांना मानवतेचा मार्गही दाखविला, कारण त्यांना माहित होते की, जीवन हे क्षणभंगुर आहे. कलिंग युद्धानंतर जिवनात एक मोठा अनुभव घेतला. या जीवनात सन्मान, हार, जीत सर्व क्षणिक आहे. कामाचा नेहमीच आदर केला जातो.
सम्राट अशोक केवळ माणसांसाठीच नाही तर प्राण्यांसाठीही जगला. सर्वसामान्य ते शेतकरी, व्यापारी, प्रवासी, मजूर आणि इतरांना ते आदर्श राजे होते. हा सम्राट लोकांच्या कल्याणासाठी इतका उत्सुक होता की झोपेत किंवा जेवतांनी असलो तरी लोकांच्या तक्रारीसाठी त्यांनी मला भेटावे असा आदेश काढला. प्रथम धम्मचक्र परिवर्तन भगवान बुध्दाने सारनाथ येथे केले दुसरे धम्म चक्र परिवर्तन सम्राट अशोकाने केले. तिसरे धम्म चक्र परिवर्तन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. भारतात 1956 पासून नवीन बौद्ध धम्मियाची भर पडली आहे. भारतीय इतिहासात भगवान बुद्धा नंतर सम्राट अशोक महानचा जन्म झाला. ज्याचा विश्वव्यापी प्रभाव अनेक शतका पासून कायम आहे. 1500 वर्ष भारत बौद्धमय होता. सत्यधम्माचा नाश हा काल्पनिक आहे. सत्य हे कोणत्याही बळाने दाबता येत नाही. सत्य हे प्रकाशात येतेच. म्हणूनच भारतात बौद्ध धम्माचा नाश होऊन सुध्दा धम्म प्रकाशात आला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 1956 ची धम्मक्रांती होय. भगवान बुद्धा नंतर, बौद्ध सम्राट अशोकानंतर अनेक वर्ष भारतातील बौद्धाचार्य या जगात ज्ञात अज्ञात भागात सत्याचा प्रचार व प्रसार करीत होते. कलिंग देशावरील विजयाच्या 10 व्या दिवशी सम्राट अशोकाने धम्म दीक्षा घेतली. त्या दिवसाला जगाच्या इतिहासामध्ये ‘अशोका विजया दशमी’ म्हटले जाते.
सम्राट अशोकाने संपुर्ण राज्यात तसेच जगात बुद्धविचार पेरण्याचे काम केले. तशाच प्रकारचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना करावयाचे होते म्हणून 14 ऑक्टोबर 1956 हा दिवस धर्मांतरासाठी निवडला. तो दिवस महत्वाचा होता तारीख नाही. दशहरा म्हणता येईल पण दसरा नाही. दशहरा हा सण आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याचा दहावा दिवस म्हणजे विजयादशमी. भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये विजयादशमीच्या पावन पर्वावर हजारों वर्षाच्या हिंदू समाजाच्या गुलामगिरीतून स्वतःची व आपल्या लक्षावधी अस्पृश्य समजल्या गेलेल्या बांधवांची मुक्तता करीत आजच्याच दिवशी विश्वाला शांती, मैत्री आणि करुणेचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या बौद्ध धम्माला शरण जाऊन नागपूरच्या नागभूमीत बुद्ध धम्माची आपल्या लाखो अनुयायांना दीक्षा देऊन ऐतिहासिक धम्मक्रांती केली. संपूर्ण जगाने या क्रांतीची नोंद घेतली. याच धम्मक्रांतीने भारतातील दलित पीडित शोषित सर्वहारा अस्पृश्य समाजाच्या कोट्यावधी बांधवांच्या मातीसम जीवनाचे सोने केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 1956 च्या धम्मक्रांती नंतर आम्हाला आशा आहे की विद्वान व सत्यशोधक लोक पुन्हा याच मार्गाने चालून भारताला वैभवशाली करतील. सम्राट अशोका विजयादशमीचे औचित्य साधुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पशुहिन जीवन जगणाऱ्या माणसाला भगवान बुद्धाच्या धम्माची दिक्षा देवून प्रगतीची नविन दालने उघडुन दिलीत.
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण















