prabodhini news logo
Home कल्याण प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष लेख – बदलते नाते

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष लेख – बदलते नाते

0
193

अतोनात त्रास सहन करून आई मुलाला जन्म देते. हे जग दाखवते आणि बालपणीच्या आठवणी मखमली बनवते. परिस्थिती कितीही गरीब असली तरी बापही आपल्या लेकाला, लेकीला राजकुमार, राजकुमारी सारखं वाढवायचा आटा पिटा करतो. बाप बाहेरच्या जगात आपलं एक अस्तित्व निर्माण व्हावं म्हणून स्वतःचं अस्तित्व विसरून जात असतो. आई बाप वेदना सहन करून त्याची झळ ते आपल्या लेकरांना लागू नये म्हणून त्यांना जीवापाड जपतात. स्वतःचे शौक पूर्ण करण्यापेक्षा त्यांना बाळाची औषधे, खाणे पिणे, जपणे महत्वाचे वाटू लागते. प्रसंगी मन मारून, तारांबळ सहन करूनही चेहऱ्यावर हसू आणणे त्यांना खूप चांगलं जमते. सगळेच आई बाप असे नसतील. काही अपवाद असतीलही. पण ते बोटावर मोजण्याइतकेच असतील. बहुसंख्य आई बाप मात्र आपला मुलगा आपल्यापेक्षा सुखी आणि यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या इच्छा आकांक्षा यांना बांध घालणारे असतात. जणू काही आपले जगणे आता आपल्या मुलांसाठी हेच त्यांनी ठरवलेलं असते, त्यांच्या सुखी संसारात नंतर ही म्हातारी माणसं अडचण ठरतात. त्यांचा अपमान करणं, टाकून बोलणे वाढीस लागते, एक वेळ आईचा मोलकरीण म्हणून पुरेपूर वापर होऊ शकतो. पण बापाला तर आयतं खायला लागतं या नीच विचाराने जास्त छळवाद सुरू होतो, यातील काही स्वाभिमानी वृध्द आई बाप घरातून निघून जातात. वृद्धाश्रमात राहतात. काही तर स्वतः आई बापाला तिथं सोडून येतात, तर काही मुलं समाजात आपली इज्जत जाईल म्हणून त्यांना वृद्धाश्रमातही जाऊ देत नाहीत. त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करतात. माणूस जीवन जगत असतांना काही आभास उराशी बाळगून जगत असतो. ते आभासच मग त्याच्या जगण्याचं कारण होऊन बसतात. कारण तो त्यालाच सत्य समजत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा तरी क्षण येत असेल की त्याने इतक्या काळ उराशी कवटाळून धरलेले आणि खरं मानलेले आभास एका अवचित क्षणी खोटे ठरतात. असे हे आभासी बदलणारे नाते असते.
तसे पाहता ही नाती देखणी असतात. चुकाकडे दुर्लक्ष करून कौतुक करणारी आई, मुलासाठी घोडा बनणारे बाबा, बाळाला मांडीवर घेऊन बसणारी आत्या, न रागावता लाड करणारी मावशी, मुलीला मांडवात घेऊन या असा पुकारा झाल्यावर डोळे भरून येणारे मामा, माहेरवाशिणीच्या गालावरून हात फिरवत भरल्या आवाजात ‘येत जा गं घरी’ म्हणणारी काकू, आणि गाडी वरून फिरवायला नेणारा काका, सगळी गुपितं विश्वासानं शेयर करणारी मैत्रिण. आणि बाकी काही तक्रार नाही हो पण फार कमी जेवते तुमची ‘मुलगी’ असं फोनवर सांगणारी प्रेमळ सासू, वटपौर्णिमेला न चुकता शहाळं आणणारा नवरा आणि ‘आमटी फार छान झालीय गं! माझ्या आईची आठवण करून दिलीस’ अस म्हणणारा सासरा, ऑफीसातून येताना ‘बस घटकाभर’ म्हणत वाफाळता चहा पाजणारे मित्र आपल्या मुलांचा दंगा खपवून वेळेला त्यांना सांभाळणारे शेजारी, चेहरा पाहून नवरोजींचा मूड ओळखणारी पत्नी, मुलांत मूल होऊन क्रिकेट खेळणारे बाबा, आणि सुनेच्या सकाळच्या गडबडीच्या वेळी नातवाला फिरवून आणणारे आप्पा, फेसबुकवर चिडवणारा पण चांगल्या पोस्टला लाईक देणारा मेहुणा इकडे तिकडे पळत हैराण करणाऱ्या नातवाला गरमागरम वरण भात मायेने भरवणारी आजी, या सगळ्या सुख दुःखात सामील होऊन विचारपुस करणारा मित्र परिवार, सुखाचा, आनंदाचा असतो. या सगळ्यांबरोबर होणारा आपला प्रवास असतो, आयुष्य खूप सुंदर आहे आपण हसत हसत जगत असतो.
कुटुंबातील बदलत्या नातेसंबंधांचा अर्थ वय, संस्कृती, तंत्रज्ञान, काम, शिक्षण, सामाजिक बदल यासारख्या विविध घटकामुळे कुटुंबातील सदस्यांमधील भूमिका, जबाबदाऱ्या आणि भावनिक संबंध कालांतराने विकसित होतात. भावनिक संबंध म्हणजे दोन व्यक्ती मधील भावना, विचार आणि अनुभव शेअर करण्याची एक खोल जवळीक आणि विश्वास असलेले नातेसंबध होय. यात बोलणे नव्हे तर एकमेकांना समजून घेणे, एकमेकांची काळजी घेणे आणि सुरक्षिततेची भावना अनुभवणे यांचा समावेश होतो.
कुटुंबातील नातेसंबंध बदलण्याचे प्रमुख मार्ग:-
मुलांची वाढ
मुलांची वाढ होतांना पालक व मुलाचे नाते एक दुसऱ्यावर अवलंबून असते, ते अवलंबित्वापासून पुढे स्वातंत्र्याकडे वळते. किशोरवयीन मुले अनेकदा अधिक स्वातंत्र्य आणि वैयक्तिक जग शोधतात ज्यामुळे संघर्ष होतो, वाटाघाटी होतात. काही प्रौढ मुले पालकांसाठी काळजीवाहू भूमिका घेऊ शकतात.
विवाह आणि भागीदारी
नवीन नातेसंबध लग्नानंतर पती पत्नी कुटुंबात नवीन गतिशीलता आणतात. सासू सासरे आणि काही वेळा कुटुंबात सावत्र कुटुंबेही असतात तेही विस्तारित कुटुंबाचा भाग बनतात. त्यांच्या भूमिका आणि अपेक्षा बदलू शकतात. आर्थिक जबाबदाऱ्या वाढतात. तसेच ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात.
वेगळे होणे, घटस्फोट, पुनर्विवाह
वेगळे होणे, घटस्फोट, पुनर्विवाह यामुळे एकल पालक कुटुंबे, सहपालक व्यवस्था किंवा मिश्र कुटुंबे निर्माण होऊ शकतात. मुलांना नवीन दिनचर्या, नवीन पालकत्वाशी जुळवून घेण्याची आवश्यकता वाटते. अशा परिस्थितीत संक्रमणादरम्यान भावनिक समायोजन सामान्य असणे आवश्यक आहे. संक्रमण म्हणजे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत होणारा बदल, याचाच अर्थ नोकरी बदलणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे होय. समायोजन म्हणजे एखाद्या गोष्टीला अधिक अचूक, कार्यक्षम किंवा योग्य बनविण्यासाठी बदल करावा लागतो. त्यासाठी परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. त्यासाठी स्थानांतर करावे लागते.
काम आणि करिअर
कामाच्या ठिकाणी जास्तीचे कामाचे तास, दूरवरच्या नोकऱ्या किंवा वारंवार प्रवास यामुळे नातेसंबंध कमी होऊ शकतात कधी कधी पालक आई व वडील दोघेही नोकरी करतात त्यांना सामायिक पालकत्वाची किंवा बाह्य मदतीची आवश्यकता असते. सामायिक प्रेमात दोन व्यक्तींमध्ये प्रेम, काळजी आणि आपुलकीची भावना वाटून घेतली असते. हे प्रेम भावनिक नसते. त्या प्रेमात एकदुसऱ्याच्या कल्याणासाठी प्रयत्न केले जातात
माहिती तंत्रज्ञान
तंत्रज्ञानामुळे कुटुंबे आता प्रत्यक्ष भेटी न घेता सोशल मीडियाद्वारे, मोबाईल फोनद्वारे संवाद साधतात आणि एकमेकाशी जोडली जातात. कुटुंबातील सदस्य समोरासमोर संभाषण करण्याऐवजी मेसेज करतात, यात जास्त मोबाईलवर वेळ दिल्याने भावनिक जवळीक प्रभावित होऊ शकते. परंतु प्रत्यक्ष संपर्काचा अभाव असतो.
सांस्कृतिक आणि सामाजिक बदल
यामध्ये बालसंगोपन घरकामात अधिक जबाबदाऱ्या वाढतात. आजकाल समलिंगी जोडपी पण पाहायला मिळतात. विविध कुटुंब संरचना अधिक स्वीकारल्या जात आहेत. जागतिकीकरणामुळे कुटुंबे वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या देशात राहतात, ज्यामुळे भावनिक जवळीक प्रभावित होते, पण नात्यातील संबंधावर परिणाम होतो. एखाद्या वस्तूवर, व्यक्तीवर विशिष्ट परिस्थितीत दुसऱ्या गोष्टीचा प्रभाव पडतो.
वृद्धत्व आणि जीवनाचे टप्पे
पालकांचे वय वाढत असतांना मुलेही काळजीवाहू बनत असतात. तसे ते कुटुंबातील सदस्यांचे नुकसान नातेसंबंध आणि भावनिक बंधाना पुन्हा आकार देऊ शकतात. त्यांच्यात स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांना ओळखण्याची, समजून घेण्याची आणि व्यवस्थापित करण्याची क्षमता असते. या क्षमतेमुळे ताण कमी करणे, प्रभावी संवाद साधणे आणि कौटुंबिक, सामाजिक संबंध सुधारणे शक्य होते.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दोन प्रकारची नाती असतात. पहिला प्रकार म्हणजे मनुष्य जन्माला आल्यावर जी नाती कायमस्वरूपी आपल्याला जन्मतः प्राप्त होतात. दुसरा प्रकार म्हणजे आपली जसजशी शारीरिक आणि मानसिक वाढ होत असते, तसतशी आपण वेगवेगळ्या टप्प्यावर स्वतः निर्माण केलेली किंवा जाणीवपूर्वक स्वीकारलेली नाती असतात. यातील जन्मतः प्राप्त झालेली नाती आपल्याला आयुष्यभर चिकटून राहतात. तुमची इच्छा असो किंवा नसो, ती त्याचं अस्तित्व कायम टिकवून असतात. आईवडील, भाऊबहीन, काकाकाकू, मावशी, आत्या, इत्यादी, या सर्वांची अपत्य ही पहिल्या प्रकारातील नातेसंबंधात मोडतात. ही नाती नको असली तर जास्तीत जास्त संबंध तोडणे, अबोला धरणे, संपर्क न ठेवणे एवढेच करता येते, मात्र या नात्याची ओळख पूर्णतः पुसणे भारतीय समाज व्यवस्थेत शक्य नाही. या नात्याला एका दृष्टिने आपण संपवतो म्हटले तरी जोपर्यंत आपले अस्तित्व कायम आहे तोपर्यंत ही नाती अनेक ठिकाणी आडवी येण्याची शक्यता असते. आपले शेजारी, मित्र मैत्रिणी, शिक्षण, व्यवसाय किंवा अन्य कारणामुळे आपल्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्ती मग त्या वय, शरीरयष्टी, स्वभाव, रहिवास, सामाजिक स्थिती अशाप्रकारे सर्वांगाने वेगळ्या असूनही त्यांच्याशी आपले बंध जुळतात, आणि नाती आकाराला येतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मैत्री. मैत्रीचे नाते हे अनेकदा प्रेमात रूपांतर होते. पुढे जाऊन पती पत्नीच्या नात्यात रुपांतर होण्याची शक्यता असते. अशा प्रकारची बहुतांश नाती स्वीकारणे किंवा नाकारणे हे पूर्णतः आपल्या आवडी निवडीवर अवलंबून असते. जन्मतः आपल्याला इतकी नाती प्राप्त झालेली असतांना सुद्धा आपण वेगळी अशी नाती निर्माण करतो. जन्मतः निर्माण झालेल्या नात्यात अशी संधी नसते. बरेच नात्यात जेष्ठ कनिष्ठ असा फरक असतो, असे हे बंधन बरेचदा जाचक वाटत असते. त्यामुळे आपण मनातल्या भावना व्यक्त करू शकत नाही. अशा कारणामुळे वेगळ्या स्वनिर्मित नविन नाते आपण निर्माण करत असतो.
बदल हा निसर्गाचा नियम आहे. आजकाल कोणत्याही नात्यात प्रेम, आपुलकी, विश्वास, आपलेपणा, जपणूक, आदर कुठेच दिसून येत नाही. मग ते नाते कोणतेही असो. जो तो नात्याचा वापर शिडीप्रमाणे करून घेत पुढे जात आहे. स्वार्थी हेतू ठेवून नाते वापरण्यात येते. पण ज्या नात्याच्या आधारे आपण जगतो, त्यांना आपले मानतो, अशीच नाती जर स्वार्थी असतील तर मग आयुष्य जगायचे तरी कसे, पुढील संपूर्ण आयुष्य काढायचे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होतो. पुर्वी नात्यात प्रेम होते, आदर होता, मान होता. घरातील मोठी माणसे मुला मुलीचे लग्नाचा निर्णय स्वतःच घेत असत, तरी दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांच्या सोबत संपूर्ण आयुष्य घालवीत. नाते शेवटपर्यंत टिकत असे. नात्यात गोडवा असायचा पुर्वी समाजाचा विचार करण्यात येत असे, मोठ्या माणसाचा सन्मान होता, धाक होता. नात्यात प्रेम, आदर, मान सन्मान होता. पुर्वी विशेष म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती. आजी आजोबांचा कायम आधार होता. आई वडील वृद्धाश्रमात नसत. आता तसे राहिले नाही, एकलकोंडी स्वभाव बनत आहे. आता काळानुसार लोकांच्या नात्यामध्ये बदल होत आहे. व्यक्तीच्या गरजा, वाढत्या अपेक्षा, चैनीच्या वस्तू यामुळेही नात्यात कटुता येते. लोकांचे स्वभाव, दृष्टिकोन, गरजा वेळेनुसार बदलतात. हे बदल कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक असू शकतात. सर्वच नाती कायम टिकत नाहीत. काही नाती ओळखीच्या रूपात उरतात. काही नाती कालांतराने घट्ट होतात.

प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here