
सर्व कामकाज मराठीच अनिवार्य — मंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाम इशारा
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
पाबोधिन न्युज नेटवर्क
8104170564
mojissporta@gmail.com
मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात इंग्रजीला प्राधान्य देत मराठी भाषेचा अवमान केला जात असल्याच्या बातमीवर आता राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे.
राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी तात्काळ लक्ष घालत आयुक्तांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की,
महानगरपालिकेतून होणारे सर्व कामकाज, पत्रव्यवहार आणि नागरिक सेवा आता पूर्णपणे मराठीतच होणे बंधनकारक आहे.
सर्व विभागीय पत्रव्यवहार फक्त मराठीतच केला जाईल.
नागरिक सेवा केंद्र, कर, शिक्षण, आरोग्य इत्यादी सर्व विभागांमधील व्यवहार मराठी भाषेतच उपलब्ध केले जातील.
सर्व सार्वजनिक ठिकाणी माहिती फलक आणि नागरिकांशी संवाद मराठीतच साधला जाईल.
मराठी भाषेचा वापर टाळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कडक शिस्तभंगात्मक कारवाई केली जाईल.
मंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाम इशारा :
“मराठी ही आपली मायबोली, अस्मिता आणि महाराष्ट्राची ओळख आहे.
आपल्या भाषेला दुय्यम स्थान देणे सहन केले जाणार नाही.
मराठी राजभाषेच्या सन्मानासाठी शासन ठाम आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिका आता मराठीच्या अंमलबजावणीत आदर्श ठरेल.
नागरिकांना प्रत्येक सेवा मराठीत मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि शासन त्या हक्कासाठी कटिबद्ध आहे.
महाराष्ट्रात मराठीला वावडे नाही – आता हे प्रत्यक्षात उतरवले जाईल!”
मंत्री सरनाईक यांच्या आदेशानंतर मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनात हालचाल सुरू झाली असून, येत्या काही दिवसांत सर्व विभागीय कागदपत्रे आणि सेवा पोर्टल्स मराठीत करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे.















