prabodhini news logo
Home कल्याण प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – संत तुकडोजी महाराज

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – संत तुकडोजी महाराज

0
92

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील एक आदरणिय आध्यात्मिक संत, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी आध्यात्मिक कृती आणि व्यावहारिक ज्ञान यांची सांगड घातली होती. विसाव्या शतकातील महान कर्मयोगी, मानवतेचे पुजारी, युगप्रवर्तक या विशेषणांनी ज्यांना ओळखले जाते ते संत तुकडोजी महाराज होय. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील यावली (शहीद) या गावी झाला. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ‘राष्ट्रसंत’ या उपाधीने त्यांना गौरविले. त्यांनी समाजासाठी, देशासाठी उद्धारक कार्य केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मुळनाव श्री बंडोजी ऊर्फ नामदेव गणेशपंत इंगळे आहे. त्यांची आई मंजुळादेवी ही तुकारामबुवा वानखडेची कन्या. तुकडोजी महाराजांचे वडील शिवणकाम करीत होते. आई घर काम करीत असे. आई वडील स्वाभिमानी होते. तुकडोजी महाराज त्यांचे एकुलते पुत्र होते. लहानपणी अनेक कष्ट सोशित महाराज चिंतनशील बनले. शाळेत लक्ष नव्हते पण परीक्षेत मात्र पास व्हावयाचे. त्यांना एकांतवास प्रिय होता. कविता कीर्तन हा त्याचा छंद होता. पोहणं, अश्वारोहण, कुस्त्या आदि नव्या कला निर्भयतेनं ते आत्मसात करीत. चांदुरबाजारच्या विमलानंद भारतीकडून छंदगायन, यावलीच्या हणवती बुवाकडून खंजरी, काही महाराजांकडून योगासनं एकतारी वाद्य आदि गोष्टी त्यांनी अवगत केल्या होत्या.
बालपणीच मातेबरोबरच गृहत्याग करण्याची पाळी त्यांच्यावर आली. वरखेडचे नाथपंथी विदेही संत श्री आडकोजी महाराजांच्या सहवास त्यांना लाभला. गुरुच्या आज्ञेनं ते स्वकाव्य गाऊ लागले. आडकोजी महाराजांच्या निधनानंतर ते स्वलिखित काव्य गाऊ लागले. त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि पंढरपूर गाठलं. पंढरपूरवरुन परत आल्यावर यावलीस येऊन शिवणकाम करीत त्यांनी मातेचा सांभाळ केला.
1925 मध्ये सर्व सोडून त्यांनी रामटेकचा रस्ता धरला. तुकडोजी महाराज 1909 मध्ये जन्मलेले महाराष्ट्रातचं नव्हे भारतात, जगात राष्ट्रसंत म्हणून ओळखले जातात. ते एक आदरणीय संत कवी, लेखक, समाजसुधारक होते. त्यांनी आपले जीवन अध्यात्म, सामाजिक समता आणि शिक्षणासाठी समर्पित केले. महाराजांनी समाजातील उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी कार्य केले. निःस्वार्थ आणि करुणेचे महत्त्व सांगीतले. आपल्या कविता आणि शिकवणीद्वारे त्यांनी लाखो लोकांना धार्मिकतेचे आणि सर्व प्राण्यांसाठी प्रेमाचे जीवन जगण्याची प्रेरणा दिली.
संत तुकडोजी महाराज यांनी सन 1909-1968 या काळामध्ये भजन, किर्तन तसेच साहित्य लेखनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये धर्मनिरपेक्षता, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सक्षमीकरण, सामजिक समता प्रस्थापित करण्याच्या हेतूने मोलाचे योगदान दिले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या लेखनातून राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या संबंधीचे त्यांचे चिंतन प्रकट होते. भारत हा खेड्यांनी बनलेला देश आहे. तेव्हा खेड्यांची सुधारणा झाली तरच देशाची प्रगती होईल हे ओळखून त्यांनी ग्रामसुधारणेची मोहीम हाती घेतली. त्यांच्या समग्र साहित्यातील एक साहित्य म्हणजे ग्रामगीता हा ग्रंथ होय. हा ग्रामगीता ग्रंथ तुकडोजी महाराज यांनी ग्रामातील शेतकऱ्याला अर्पण केला.
सद्यस्थितीत संपूर्ण विश्वात अशांतता पसरली आहे. विज्ञानाच्या परमोच्च संशोधनामुळे मानव उन्नतीकडे जाण्याऐवजी विनाशाकडे वाटचाल करीत आहे. विज्ञानाने प्रगती दिसत आहे परंतु माणसातील माणुसकी नष्ट होत आहे. मनावर होणारे आध्यात्मिक ऱ्हास होणे हे विज्ञानालाही घातक ठरणार आहे. या विश्वात शांतता व समृद्धी आणावयाची झाल्यास गाव समृद्ध होणे आवश्यक आहे. यासाठी संत तुकडोजी महाराजांचा ग्रामगीता या ग्रंथाचा अंगीकार करणे एकमेव उपाय आहे. प्रत्येकाने एकमेकांसोबत माणुसकीच्या नात्याने आपले वर्तन केले पाहिजे तेव्हाच ग्राम समृद्ध होईल. गाव हेच देऊळ आहे आणि त्या देवळातील देव म्हणजे गावातील लोक असे त्यांचे मत होते. स्त्री ही अबला किंवा दुर्बल नसून ती एक शक्ती आहे. स्त्रियांनीच महापुरुष, लढवय्ये, थोर संत यांना जन्म दिला आहे असे तुकडोजी महाराज म्हणत असत.
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मुल्यांचा पुरस्कार करत मानवतावादी भूमिका त्यांनी घेतली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे शिक्षणतज्ञ होते. शिक्षणाद्वारे माणसांच्या मनातील न्यूनगंड दूर झाला पाहिजे, समाजशिक्षण हा प्रचलित प्रौढ शिक्षणासाठी वापरलेला राष्ट्रसंतांचा शब्द आहे. विज्ञान शिक्षण शेतीसाठी आवश्यक आहे अशी त्यांची धारणा होती. शिक्षणासोबतच श्रमप्रतिष्ठा महत्वाची आहे तसेच स्वच्छता महत्वाची आहे. अस्पृश्यता निवारण करण्यासाठी मंदिरे अस्पृश्यासाठी खुली झाली पाहिजेत, मंदिरे म्हणजे खाजगी मालमत्ता नव्हे. देवळावर कोणा एका विशिष्ट जातीचा हक्क नाही असे तुकडोजी महाराज म्हणत. आर्थिक समता प्रस्थापित होऊन शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा असे राष्ट्रसंतांना वाटे. पंढरपूरचे विठोबाचे मंदिर अस्पृश्यांना खुले व्हावे यासाठी साने गुरुजींनी आमरण उपोषण सुरू केले तेव्हा तुकडोजी महाराजांनी त्यांना पाठिंबा दिला. केवळ एका महिन्यात विदर्भातील 52 मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली होती.
संतपुरुष हा त्या त्या युगाचा प्रवर्तक असतो. 11 नोव्हेंबर 1943 रोजी तुकडोजी महाराजांनी श्रीगुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. त्यांनी सर्वांगीण मानवधर्माची शिकवण स्थायी करण्यासाठी 1943 मध्ये ‘श्रीगुरुदेव’ मासिक सुरू केले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत तुकडोजी महाराज त्यांच्या कार्याचे स्मरण करणे गरजेचे ठरते. 1941- 42 ला त्यांचा ‘चलेजाव आंदोलनातला सहभाग फार महत्वाचा ठरला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या कामाची दिशा ग्रामविकास या उद्दिष्टाकडे वळवली. गावागावातल्या स्वच्छतेपासून ते साक्षरतेपर्यंतच्या अनेक मुद्यांना त्यांनी वाहून घेतले. जवळपास 1955 ते 68 पर्यंतचा काळ हा ग्रामविकास चळवळीचा काळ ठरला. विशेषतः स्वतंत्र मिळाल्यानंतर खेड्यांकडे दुर्लक्ष होऊ नये आणि गावातच विविध प्रकारचे उपक्रम किंवा उद्योग सुरु करून स्थानिक रोजगार निर्माण व्हावा. त्यातून आपले गाव स्वयंपूर्ण व्हावे असा आग्रह संत तुकडोजी महारांजांनी धरला होता. अशा ग्रामविकास चळवळीवर आधारित त्यांनी अभंगही लिहिले. त्यांनी त्यावेळी जे काही विचार त्यांनी व्यक्त केले त्या सर्व विचाराचे संकलित स्वरूप त्या काळामध्ये त्यांची ग्रामगीता या ग्रंथात नमूद केले.
1945 चा बंगालमधला दुष्काळ पाहिल्यानंतर महाराष्ट्रातला हा संत तिथे धावून गेला. एवढेच नव्हे तर 1962 च्या चीन बरोबरच्या युद्धाच्या काळातही संत तुकडोजी महाराजांनी मोठा लोकजागर घडवला आणि आवश्यकता पडेल ते काम करण्याची स्वतःबरोबर लोकांकडून तयारी करवून घेतली. फारसे शिक्षण नसताना तुकडोजी महाराजांनी ग्रामविकासाची नवी दिशा दाखविण्याचे काम करावे हा नक्कीच आश्चर्याचा भाग ठरतो आणि म्हणूनच त्यांच्या या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याची उंची फार मोठी ठरते. त्यांच्या कार्याची दखल घेवून शासनाने नागपुर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ असे नाव दिले.
तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी 1935 साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. एवढेच नव्हे तर जापानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजी महाराजांच्या आयुष्यातील लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने, कविता लिहिल्या. त्यांच्या कवितेतील एक कडवे:
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या l
भगवान बुध्दांची 2500 वी जयंती साजरी करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भगवान बुद्धांविषयी लिहितात.
हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर
त्यासी कारण एक प्रचार प्रभावशाली l
ते त्यांचे साधे जीवन आणि निस्वार्थ सेवेसाठी नेहमी स्मरणात राहतील. 11 ऑक्टोबर 1968 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या मागे आध्यातिक आणि सामाजिक कार्याचा समृद्ध वारसा मागे सोडला आहे. त्यांचा वारसा जगाला दयाळूपणा आणि मानवतेच्या तत्त्वावर बांधलेल्या सुसंवादी समाजासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देत आहे. आजही समाजातील पाखंड, ढोंग, बुवाबाजी, अंधश्रद्धा निर्मुलनासाठी, जातीभेद नष्ट करण्यासाठी त्यांच्या भजनांचा कीर्तनाचा प्रभावीपणे वापर होत आहे.

प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here