prabodhini news logo
Home कोकण मीरा-भाईंदरला मोठा दिलासा! — सार्वजनिक शौचालयांसाठी ५० कोटींचा निधी मंजूर

मीरा-भाईंदरला मोठा दिलासा! — सार्वजनिक शौचालयांसाठी ५० कोटींचा निधी मंजूर

0
102

मंत्री प्रताप सरनाईक यांचा पुढाकार

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
8104170564
mojissports@gmail.com

मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या तुटवड्याचा प्रश्न अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत नागरी सुविधांमध्ये शौचालय हा अत्यावश्यक घटक असून, महानगरपालिकेच्या आर्थिक अडचणींमुळे या दिशेने विकास होऊ शकत नव्हता.

मात्र, या गंभीर प्रश्नावर महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मीरा-भाईंदरचे स्थानिक आमदार मा. ना. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी सातत्याने पाठपुरावा करून राज्य शासनाकडून तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.

हा निधी मीरा-भाईंदरमधील नवीन सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामासाठी तसेच जुन्या शौचालयांच्या दुरुस्तीसाठी वापरला जाणार आहे.
महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशाप्रकारचा निधी मंजूर झाला असून, आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
सध्या ३६ ठिकाणी नवीन शौचालय बांधकाम आणि दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करण्यात आली आहेत.

“मीरा-भाईंदरमधील सर्वसामान्य नागरिक, विशेषतः झोपडपट्टीतील जनता, आजही शौचालयाच्या अभावामुळे त्रस्त आहे.
त्यांना ही सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे.
या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही माझी जबाबदारी आहे.
म्हणूनच राज्य शासनाकडून ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.”
तसेच त्यांनी सांगितले की, महानगरपालिका निर्मितीनंतर अनेक शौचालये खारभूमी आणि वनखात्याच्या जमिनीवर बांधलेली असल्याने त्यांची दुरुस्ती अडकली होती.
या संदर्भात पुढील आठवड्यात संबंधित विभागांसोबत बैठक घेऊन या अडचणी दूर करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

घराघरात शौचालय – शहर स्वच्छतेकडे वाटचाल

मंत्री सरनाईक यांनी पुढे सांगितले की,

“१४६ मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्या आमदार निधीतून अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकून जिथे शक्य आहे तिथे घराघरात शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे.
मीरा-भाईंदर आता सार्वजनिक शौचालयांच्या समस्येमधून मुक्त होणार आहे.”

‘स्वच्छ मीरा-भाईंदर’ मोहिमेला बळ

या निर्णयामुळे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ मीरा-भाईंदर’ उपक्रमाला मोठा वेग मिळणार असून, नागरिकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here