
पैसा, पैसा करतोस वेड्या, कुठवर असे हे चालायचे
जीवनाचे मर्म जाणूनी ,सार शोध आयुष्याचे.
जीवनरुपी रंगमंचावर, किती काळ आहे तुझा
बघता बघता सरेल आयुष्य ,नाही ठाव तुला त्याचा.
माणसातील माणूसपण पहा डोकावून एकदा तरी
सापडेल मार्ग तुजला ,आव्हानांना पेलतील करी.
पैसा ठरतो काळ कुणाचा ,स्वार्थाला मिठी मारी
तोडीतसे नातीगोती, कधी येई दडपण मनावरी.
झोप उडवतो सुखाची, लालसा अहंकार उत्पन्न करी
होतो माणूस आंधळा त्यात माणुसकीला दूर धरी.
सारे काही पैशासाठी ,डामडोल दाखवण्या दुजा
पहा विचारून मनास ,राहिलास का तू तुझा?
असावे मनी समाधानी, माझे माझे सोडून दे
कष्टाला जवळ करुनी, माणुसकीला साथ दे.
बदलेल भाग्य तुझे, वीण घट्ट होईल नात्याची
संकटात हात पाठीवर,उमेद मिळे तुज जगण्याची.
सौ. यादव उज्ज्वला राजेंद्र
हडपसर, पुणे.
















खुप छान कविता
(सारे काही पैशासाठी ,डामडोल दाखवण्या दुजा
पहा विचारून मनास ,राहिलास का तू तुझा?)👌