
रोजचीच ती पहाट
मला वाटते नवी नवी
निसर्गाची मूक साद
मला वाटते हवी हवी. (1)
पश्चिमेचा तो चंद्रमा
चांदण्यांचा चंदेरी सडा
पूर्वेच्या क्षितिजी खुलतो
केशरी रंगाचा घडा. (2)
निसर्गातील विनम्र झाडे
जणू योगियांचे योगी
फळाफुलांनी बहरून येता
स्वत: काहीच न भोगी. (3)
मंद मंद वहाणारा वारा
गंधित करतो तनामना
भूपाळी गाऊन पक्षी
झेप घेती रानावना. (4)
नविन उर्जा ,नवी आशा
नवेच स्वप्न नयनात
घेवून येते सकाळ माझी
माझ्या सजणाच्या
संगतीत. (5)
निसर्गाचे रुप पहात
माझी सकाळ सरते
ईशाला वंदन करीता
दिवसाचे सार्थक होते
दिवसाचे सार्थक होते (6)
अंजली गरगटे.(पुणे)















