
पूर्व दिशा पसरे लाली
जाग रानास आली
डोळे हळूच उघडून
रानाची पाखरं जागली
किलबिल घरट्यात
नाद मंजुळ ये कानी
फांद्या फांद्यात चैतन्य
हिरवाई मोहरली वनी
रानवाटा जाग्या झाल्या
दाही दिशा उजळल्या
रानफुलांच्या सुवासाने
वनदेवी प्रसन्न झाल्या
रवी किरणांचे तेज
पसरले रानावरी
वनचरे आनंदाने
बागडती तालावरी
सूर्यदेव आले अंबरी
सोनसळी प्रकाशात
पाखरांची शाळा भरली
सृष्टीच्या खुल्या अंगणात
सौ .वंदना शशिकांत पाटील















