prabodhini news logo
Home भंडारा प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – घर

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – घर

0
154

घराची गरज सर्वच प्राणीमात्रांना असते. अगदी लहान पक्षीसुद्धा मेहनत करून आपले स्वतःचे घरटे तयार करतात. घर ही मानवाच्या तीन प्रमुख गरजांपैकी एक अत्यंत महत्त्वाची अशी गरज आहे. सर्वप्रथम घराची आवश्यकता संरक्षणाच्या दृष्टिकोनातून पुढे आली. ऊन,वारा, थंडी, पाऊस यासारख्या नैसर्गिक गोष्टीपासून तसेच जंगली श्वापदे व इतर मानवी शत्रू यांच्याकडून संरक्षण मिळविण्यासाठी घराची आवश्यकता प्रथम भासली. या सर्व गोष्टी पासून संरक्षण मानवाला घरामुळे मिळाले.
सर्वप्रथम घराचे स्वरूप गुहेप्रमाणे होते. पुढे घरासाठी तंबूचा उपयोग केला गेला. हळूहळू घरबांधणीच्या पद्धतीत सुधारणा होऊन दगड, माती,चुना,लाकूड यांचा उपयोग करून घरे बांधली गेली.त्यानंतर झालेल्या तांत्रिक व औद्योगिक प्रगतीमुळे सिमेंट,लोखंड ,विटा इत्यादी बांधकाम साहित्य तयार करून त्याचा उपयोग घराच्या बांधकामात केला गेला. या सुधारणेमुळे घर बांधण्याच्या सामग्रीतच फक्त बदल झाला नाही तर घराचे नियोजन,घराची रचना, यात सुद्धा बदल झाला. घराच्या स्वरूपात होणारा बदल हा जसा वैज्ञानिक आणि औद्योगिक प्रगतीमुळे झाला तसाच सामाजिक व आर्थिक परिवर्तनामुळेसुद्धा झाला.पूर्वी शेतीचा व्यवसाय करणारी मोठी कुटुंब होती. संयुक्त कुटुंब पद्धती तेव्हा अस्तित्वात होती. त्यामुळे मोठी वाड्यांसारखी बऱ्याच खोल्या असलेली घरे होती. पुढे वेगवेगळ्या कारणामुळे विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली व जरुरीप्रमाणे लहान कमी खोल्यांची घरे तयार होऊ लागली.वाढती लोकसंख्या,जागेची कमतरता, वाढती महागाई यामुळे कमी जागेत उंच जास्त मजल्यांच्या इमारती म्हणजेच सदनिकांची पद्धत शहरात रूढ होऊ लागली आहे.
मानवाला त्याच्या तीन प्रमुख गरजांपैकी निवासावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागते. कारण अन्नाची गरज रोजच उद्भवत असते व ती रोजच पूर्ण केली जाते.तसेच वस्त्राच्या गरजेचा विचार सुद्धा पुढेमागे करता येतो. परंतु घराच्या बाबतीत मात्र तसे होत नाही. घर हे व्यक्ती जीवनात एकदा किंवा जास्तीत जास्त दोन वेळाच बांधत असते. घर बांधणीसाठी व्यक्ती आपली जीवनभराची पुंजी खर्ची घालत असते. त्यामुळे घराचा प्रश्न फार विचारपूर्वक सोडवावा लागतो घर म्हणजे केवळ चार भिंती व त्यावर छप्पर नसून त्यात राहणाऱ्या व्यक्तीची आवड,निवड,दर्जा,आर्थिक परिस्थितीनुसार केलेल्या वेगवेगळ्या सोयींचा,आवश्यकतांचा,गरजांचा समावेश असतो. घरात माणसाच्या सर्व शारीरिक व मानसिक गरजा पूर्ण होणे आवश्यक असते.

डॉ.स्मिता गजभिये/तिरपुडे
लाखनी,जिल्हा.भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here