
मुंबई: भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुलुंड, मुंबई येथे ‘बौद्ध समाज संवाद दौरा’ नुकताच संपन्न झाला. बौद्धांच्या न्याय, हक्क आणि राजकीय प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यांवर या संवाद दौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
राजेंद्र पातोडे यांनी केले मार्गदर्शन
वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, महाबोधी महाविहार, बौद्ध लेण्यांचे संरक्षण तसेच बौद्धांना सर्वाधिक राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या न्याय व हक्कासाठी केवळ बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी लढत आहे.
पातोडे यांनी बौद्ध समाजाने आता एकसंघ होण्याची गरज व्यक्त केली. आगामी निवडणुकीत बौद्धांनी वंचित बहुजन आघाडीला एक संधी देऊन, सत्तेत आपले हक्क मिळवणारे आरक्षणवादी आणि संविधानवादी प्रतिनिधी निवडून पाठवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
‘संविधान सन्मान महासभे’चे निमंत्रण
या संवाद दौऱ्यादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 25 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘संविधान सन्मान महासभे’ चे निमंत्रणही मुलुंड येथील बौद्ध अनुयायांना देण्यात आले.
या दौऱ्याला भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि मुलुंड येथील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा संवाद दौरा बौद्धांना त्यांच्या राजकीय आणि सामाजिक हक्कांसाठी एकत्र आणण्याच्या उद्देशाने महत्त्वाचा ठरला.















