
लातूर : विद्यार्थ्यांना शाळेतून टी.सी. (Transfer Certificate) देण्यासाठी पैसे मागणे अथवा टी.सी. देण्यास टाळाटाळ करणे हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवर घाला असून अशा शाळांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव युवराज कांडगिरे यांनी दिला आहे.
लातूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी व पालकांकडून टी.सी. देण्यासाठी अवैधरित्या पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. काही शाळांकडून विद्यार्थ्यांना विविध कारणे सांगून टी.सी. देण्यास नकार दिला जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे कांडगिरे यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील कोणत्याही शाळेने टी.सी. देण्यासाठी पैसे मागितल्यास किंवा टी.सी. देण्यास नकार दिल्यास विद्यार्थी व पालकांनी तात्काळ संबंधित शाळेचे नाव, मुख्याध्यापकांचे नाव व संपूर्ण माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या हेल्पलाईन क्रमांक 8208975468 वर पाठवावी. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत संबंधित शाळांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल.
विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कायम लढत राहील. कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक व नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन अशा गैरप्रकारांची माहिती द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव युवराज कांडगिरे यांनी केले आहे.















