Home ठळक बातम्या रुग्णांची लूट रोखण्यासाठी प्रशासनाचे पाऊल; हॉस्पिटल मेडिकलवर नवे नियम

रुग्णांची लूट रोखण्यासाठी प्रशासनाचे पाऊल; हॉस्पिटल मेडिकलवर नवे नियम

0
55

अहिल्यानगर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत मेडिकल स्टोअर्समधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती रुग्णांवर करता येणार नाही. तसेच प्रत्येक हॉस्पिटलमधील मेडिकलच्या दर्शनी भागावर “येथून औषधे खरेदी करण्याची सक्ती नाही” असा स्पष्ट फलक लावण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत.

नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते नितीन भुतारे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे याबाबत तक्रार व मागणी केली होती. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमधील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.

रुग्णांना औषधांवर कोणतीही सवलत मिळत नसल्याने तसेच वापरण्यात आलेल्या औषधांची माहितीही नातेवाईकांना दिली जात नसल्याने आर्थिक शोषण होत असल्याचा मुद्दा भुतारे यांनी उपस्थित केला होता. या तक्रारीची गंभीर दखल घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अहिल्यानगर विभागाचे सहआयुक्त जा. ह. शेख यांना तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.

त्यानुसार जिल्ह्यातील हॉस्पिटलमधील मेडिकल चालक तसेच मेडिकल असोसिएशनला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कोणत्याही रुग्णाला किंवा नातेवाईकांना विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सर्व मेडिकलच्या दर्शनी भागावर सक्ती नसल्याबाबतचा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, एखाद्या हॉस्पिटलमध्ये औषधे खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्यास किंवा सक्ती केली जात असल्यास त्याची तक्रार तात्काळ विभागाकडे करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मेडिकल व संबंधित संस्थांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सहआयुक्त जा. ह. शेख यांनी दिला आहे.

या निर्णयामुळे रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची होणारी आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, या विषयासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांच्या प्रयत्नांचे अहिल्यानगर शहर व जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here