Home ठळक बातम्या ‘टीसी’साठी पैसे मागितल्यास शाळा-कॉलेजवर कारवाई; शिक्षण विभागाचा इशारा

‘टीसी’साठी पैसे मागितल्यास शाळा-कॉलेजवर कारवाई; शिक्षण विभागाचा इशारा

0
51

अमोल जगताप उपसंपादक प्रबोधिनी न्युज, मुंबई – विद्यार्थी आणि पालकांकडून शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) तसेच गुणपत्रिका (मार्कलिस्ट) देण्यासाठी बेकायदेशीरपणे पैसे उकळणाऱ्या शाळा व महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक लूट करणाऱ्या संस्थांविरोधात आता शिक्षण विभागाने कडक भूमिका घेतली आहे.
शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे की, शाळा सोडल्याचा दाखला (टीसी), गुणपत्रिका आणि इतर आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणे नियमबाह्य आहे. तरीही काही शाळा व महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडून प्रति विद्यार्थी तब्बल २०० रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.
पालकांनी ई-मेल तसेच लेखी स्वरूपात केलेल्या तक्रारींनंतर शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांची महत्त्वाची कागदपत्रे अडवून ठेवणे किंवा त्यासाठी अतिरिक्त रक्कम मागणे हा गंभीर प्रकार असून अशा संस्थांवर प्रशासकीय आणि आर्थिक कारवाई करण्यात येईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
पैसे तात्काळ परत करण्याचे आदेश
नियमांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांकडून टीसी किंवा गुणपत्रिकेसाठी घेतलेली रक्कम संबंधित संस्थांनी तात्काळ परत करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. अन्यथा संबंधित शाळा किंवा महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाईसह कठोर प्रशासकीय पावले उचलली जातील, असा इशारा माध्यमिक शिक्षण विभागाने दिला आहे.
दरम्यान, कोणतीही शैक्षणिक संस्था टीसी, गुणपत्रिका किंवा अन्य आवश्यक प्रमाणपत्रांसाठी पैसे मागत असल्यास पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी तात्काळ स्थानिक शिक्षण अधिकारी अथवा शिक्षण संचालनालयाकडे लेखी तक्रार किंवा ई-मेलद्वारे माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला असून, बेकायदेशीर वसुली करणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here