
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन म्हणजे त्यांच्या 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी आदरांजली अर्पण करणे. भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार, महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. हा दिवस संपूर्ण भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. महापरिनिर्वाण ज्याचा अर्थ महान मुक्तीचा दिवस असा होतो. महापरिनिर्वाण भगवान बुद्धाशी संबंधित शब्द आहे. विनम्र अभिवादन म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचा सन्मान, त्यांचे स्मरण, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आदरयुक्त अभिव्यक्ती. या दिवशी लोक मुंबईतील चैत्यभूमीला भेट देतात. कार्यक्रम आयोजित करतात आणि त्यांच्या कार्यावर चिंतन करतात. हा प्रकार आदरयुक्त होण्याचा आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दूरदर्शी नेते होते. ज्यांच्या जीवनाने राष्ट्राच्या नैतिक आणि सामाजिक पायाला आकार दिला. महापरिनिर्वाण दिवस त्यांनी जगलेल्या न्याय, समानता, स्वातंत्र्य, आणि मानवी प्रतिष्ठेसाठी लढलेल्या आदर्शाची आठवण करून देतो.
डॉ बाबासाहेब आंबेडकर भेदभावाच्या पार्श्वभूमीवरून आधुनिक भारतातील सर्वात प्रभावशाली विचारवंत होते. त्यांचा जीवन प्रवास केवळ वैयक्तिक विजय नव्हता तर शतकानुशतके मूलभूत हक्कापासून वंचित असलेल्या लाखो लोकांसाठी आशेचा किरण होता. अतुलनीय बुद्धिमत्तेने त्यांनी अत्याचारी जातीव्यवस्थेला आव्हान दिले, परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, या देशाच्या इतिहासातील हा एक अत्यंत दु:खद दिवस आहे. या दिवशी देशातील सामान्य जनतेचा मुक्तीदाता आम्हाला पोरके करून निघून गेला. या दिवशी आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करण्यासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने जनता चैत्यभूमीवर येते. हा दुःखाचा दिवस असल्याने सर्वांनी शांतता राखावी. सर्वांनी गांभीर्याचे पालन करावे. हा दिवस दु:खाचा आहे, म्हणून या दिवसाच्या गांभीर्याला गालबोट लागेल असे वागू नये. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन म्हणून ‘कोणी कसेही वागो’ आम्ही मात्र संविधानाचे पालन करून आदर्श नागरिक म्हणून जगणार व या देशाला नवी दिशा देणार.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम केले, जिथे प्रत्येक नागरिक स्वाभिमानाने जगू शकेल. भारतीय संविधानाचे मुख्य प्रमुख शिल्पकार म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला एक अशी चौकट दिली जी जीवन मूलभूत हक्काची हमी देते. वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण करते आणि लोकशाही मूल्याचे समर्थन करते. कायदा, अर्थशास्त्र, सामाजिक विज्ञानाच्या त्यांच्या सखोल ज्ञानामुळे संविधान एक जिवंत दस्तऐवज बनले, जे असुरक्षितांचे रक्षण करण्यास आणि उपेक्षितांना अधिकार मिळवून देण्यास सक्षम आहे. या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करणे, आदरांजली अर्पण करणे म्हणजे त्यांच्या आदर्शांना कायम ठेवण्याची प्रतिज्ञा करणे आहे. असे करणे म्हणजे असमानतेवर प्रश्न उपस्थित करण्याचे, भेदभावाचा प्रतिकार करण्याचे, सर्वांना समान संधी मिळेल असे समाजासाठी काम करणे होय. त्यांना आदरांजली त्यांनी केलेल्या न्याय्य भारताच्या उभारणीसाठीच्या वचनबद्धतेत आहे. त्यांचा हा वारसा अखंड आपणाला मार्गदर्शन करीत राहील. आपणाला हक्क आणि कर्तव्याचे भान ठेवायचे आहे. बाबासाहेबांनी आम्हाला खऱ्या अर्थाने माणूसपण दिलं. आजवरच्या इतिहासात आतापर्यंत कित्येक महात्मे जन्माला आले आणि आपल्या अनमोल कार्याने अजरामर झाले. एका कनिष्ठ जातीत जन्माला येऊनही खऱ्या अर्थाने विश्वरत्न म्हणून त्यांचा उल्लेख होतो, बाबासाहेब असं एकमेव व्यक्तिमव कि ज्यांचे पूर्ण विश्वात पुतळे उभारले गेले आहेत. माणसाला कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे ठरवण्याचा अधिकार नसला तरी मिळालेल्या जन्माचे आपल्या कार्याने सोने करणे महत्त्वाचे असते. आपल्या अनुयायांना त्यांनी अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखविला. स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी आपल्या पदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब आणि आपल्या फायद्यासाठी काहीही तडजोड करणारे आताचे राजकारणी पाहिले तर किव करावीशी वाटते. आजच्या काळात भोवताली जी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसात माणूस राहिलेला नाही. धार्मिक वातावरण गढूळ झाले आहे. अशा वेळी या सगळ्याला बदलायचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे घराघरात संविधान पोहचले पाहिजे. आता पुन्हा गरज आहे एका नव्या प्रजा सूर्याची, जो बाबासाहेबांची ज्ञानपरंपरा समर्थपणे राबविल. आज प्रज्ञासूर्य दुसरे कोणी होण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा आपणच बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालुया.
आज जर बाबासाहेब नसते तर कित्येक जीव त्याच अंधारात कैद राहिले असते. दलित पिडीत शोषित आजही उच्चवर्णीयांची शिवीगाळ सहन करीत राहीले असते. मंदिरात प्रवेश नसता. शिक्षणाचा हक्क नसता. शाळेत बसता आले नसते. जन्माच्या आधारावर मृत जनावराच्या कत्तलीची कामे करावी लागली असती, परंतु बाबासाहेब आले आणि चारहजार वर्षाचा इतिहास संविधानाच्या माध्यमातून चाळीस वर्षात बदलून टाकला. कोट्यवधी माणसाला माणुसकीची जाणीव करून दिली. तुम्ही माणसे आहात, सन्मान हा तुमचा अधिकार आहे. स्वाभिमान हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. आज आपण शिक्षण घेतो, मतदान करतो, नोकरीत सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून काम करतो, कारण बाबासाहेबांनी हे हक्क रात्रदिवस लढून आपल्यासाठी कमावून ठेवले आहेत. म्हणून समाज समता, न्याय आणि संविधानानेच पुढे जातो.
6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे प्रचंड वादळ शांत झाले. आयुष्यभर उन्हात उभे राहून तमाम जनतेला मायेची सावली देणारा बाबा कोट्यवधी दलीत, पीडित, शोषितांना पोरके करून निघून गेला. पण जातांना भारताला राज्यघटना, अशोक चक्र, समानतेवर आधारित धम्म देऊन गेला. जगण्याला अर्थ देऊन गेला. म्हणून आजच्या दिवशी आपण सर्व शांततेने कार्यक्रम पार पाडावे परिसर स्वच्छ व टापटीप ठेवावा. या वर्षी प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने नगरविकास व ग्राम विकास विभागाला आदेश दिले आहेत. सदर आदेश पत्र घेऊन आंबेडकरी जनतेने 6 डिसेंबर निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी, स्वच्छता, फुलांची व्यवस्था करावी, शासनाचे हे दोन्ही पत्र त्या सर्व सुविधांसाठी त्या त्या संबंधित विभागात स्वतःच्या गावात ग्रामपंचायत, नगर पंचायत, तालुका अधिकारी, तहसील, नगर पालिका, नगर परिषद, महानगरपालिका अधिकाऱ्यांना या पत्रांचा संदर्भ घेऊन व अर्ज देऊन स्वच्छता व रंगरंगोटी करून घ्यावी.
6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील शेवटचा दिवस होता, त्यांचे शरीर थकलेले होते, पण मनाला एकच काळजी, माझ कोणतही काम अपूर्ण राहू नये. त्या शेवटच्या दिवशी सुद्धा लिखाण चालूच होते, बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ पूर्ण करण्याची जिद्द होती. शरीर साथ देत नव्हते तरी ते लिहित राहिले, बाबासाहेबांना माहित होते की त्यांच्या नंतर त्यांच्या समाजाला मार्गदर्शन करणारे हेच पुस्तक असेल. कधी कधी माणूस स्वतःच ओळखू शकतो की त्यांचा प्रवास संपू शकतो. शेवटच्या दिवशी 5 डिसेंबरला बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना पुर्ण केली. जणू बाबासाहेबांनी मनात म्हटले असेल की मी आता माझे काम पूर्ण केले आहे, आणि शेवटी बाबासाहेबांनी 6 डिसेंबर 1956 ला जगाचा निरोप घेतला. परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन देशाच्या इतिहासातील हा एक अत्यंत दु:खद दिवस आहे. या दिवशी देशातील सामान्य जनतेचा मुक्तीदाता आम्हाला पोरके करून निघून गेला. या दिवशी आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करण्यासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने जनता चैत्यभूमीवर येतात. या जनतेने चैत्यभूमीवर येताना , प्रत्यक्ष चैत्यभूमीवर व चैत्यभूमीवरून घरी जाताना काही पथ्ये पाळणे अगत्याचे आहे. शांतता पाळणे जनतेने आपल्या आचरणातून सर्व भारतीयांना दाखवायचे आहे. सणउत्सवांच्या नावाने चालणाऱ्या धांगडधिंगाण्यास सामान्य जनता विटली आहे. तसाच धांगडधिंगाणा परिवर्तनवादी घालू लागले तर ते ‘पर्याय’ देऊ शकणार नाहीत, म्हणून परिवर्तनवादी जनतेचा ‘जनसंपर्क’ हा सामान्य जनतेला आश्वासक व प्रेरणादायी वाटला पाहिजे. यांसाठी आवश्यक ती सर्व काळजी घेणे, हे सर्वस्वी परिवर्तनवाद्यांच्या हातात आहे. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन म्हणून ‘कोणी कसेही वागो’, आम्ही मात्र संविधानाचे पालन करून आदर्श नागरिक म्हणून जगणार व या देशाला नवी दिशा देणार’ असा दृढनिश्चय करूया. संपूर्ण मानवजातीच्या जीवनातील सर्वात दुःखद दिवस, सामाजिक व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी आणि मानवतेची स्थापना करण्यासाठी सर्वात मोठ्या दान, त्याग आणि आत्मत्यागाच्या दिवशी आज पांढरे कपडे घाला, सामूहिक वंदना घ्या. या दुःखद दिवशी शांतपणे, गंभीरपणे आपली आदरांजली वाहा. या आदरांजलीत बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण करावे लागेल. दृढ संकल्प करावे लागेल. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला समर्पित करावे लागेल. हीच खरी आदराची भावना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञ राहून आणि त्यांच्या पवित्र स्मृतीचे स्मरण करून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी परिणाम साध्य करण्यासाठी वचनबद्ध राहूया. महामानव भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण














