
हे सागरा जरा शांत होना
अरे दिवस रात्र जागलेला भीम
आता कुठे शांत झोपला आहे
पण त्याच्या झोपेतही स्वप्न आहे
उद्याच्या,समता,न्याय,स्वातंत्र्याचे
आधुनिक भारताच्या निर्मितीचे
ते स्वप्न जरा पूर्ण होऊ दे ना
हे सागरा जरा शांत होना
हे सागरा जास्त ढवळू नकोस
कारण भिमाने इथल्या जुलमी
व्यवस्थेलाच ढवळून काढत
नष्ट केले क्रूर जातीयवादाचे विष
आणि इथल्या जनसागराला शुद्ध करीत
ओतला त्यांच्यात स्वाभिमानी निळा रंग
तो रंग आता पुन्हा दिसू देना
हे सागरा जरा शांत होना
हे सागरा जास्त फेसाळू नकोस
कारण भीमाने मनुवाद्यांना पळवत
काढला त्यांच्या तोंडातून
विषमतावादी विचारांचा फेस
आणि पाजले त्यांना
समतेचे चवदार पाणी
त्या चवदार पाण्याला पुन्हा वाहू देना
हे सागरा जरा शांत होना
हे सागरा घे त्या ज्ञानसागराचे चुंबन
कर त्याच्या त्याग समर्पणाला वंदन
आणि सांग विश्वातील सर्व सागरांना
की आपण खवळलो तर त्सुनामी येते
पण तो प्रज्ञासागर खवळला तर
शतकानू शतकांची गुलामी जाते
हा संदेश प्रशांत सागरालाही सांगना
हे सागरा जरा शांत हो ना
प्रा.प्रशांत तुळशीदास खैरे














