
शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – वाशिम : महाराष्ट्र शासनाकडून, लोककलेवर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या, वयोवृद्ध ज्येष्ठ लोककलावंताकरीता, शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून “राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजना” सुरू केलेली असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी लोककलावंतानी ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की, सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील लोककलावंतांना दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जाते.या योजनेमार्फत दरमहा डी. बी. टी. (थेट हस्तांतरण प्रणाली)द्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यात मानधन जमा केले जाते.
परंतु भविष्यात या योजनेचा लाभ कायमच मिळत रहावा. यासाठी शासनाकडे दरवर्षी हयात प्रमाणपत्र म्हणजे जीवन प्रमाणपत्र सादर करणे अत्यावश्यक असते.त्यामुळे चालू 2024-2025 या वर्षापासून सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून डिजीटल पद्धतीचा अवलंब सुरू करण्यात आलेला असून त्यासाठी त्यांनी ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र पद्धती सुरू केलेली आहे.शिवाय त्यासाठी त्यांनी सोबत सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा क्यू आर कोड दिला असून लाभार्थी लोककलावंताना हा क्यू आर कोड आप आपल्या स्मार्ट मोबाईल मध्ये स्कॅन करून सांस्कृतिक कार्य संचलनालयाचे ॲप घेऊन त्याद्वारे आपले स्वतःचे “जीवन प्रमाणपत्र” हयात दाखला सादर करता येतो. किंवा ज्यांचेकडे स्मार्ट मोबाईल नसेल किंवा ज्यांचेकडे फोनच नाही अशा सर्व लोककलावंतानी आपल्या गावातील सेतू (ग्राहक केन्द्रावर) जाऊन,सोबतचा क्यू आर कोड त्यांना दाखवून आपले जीवन प्रमाणपत्र सादर करावे. असे आवाहन महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लोककलावंत तथा कारंजा (लाड) येथील विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी लोककलावंताना केले आहे.












