
शब्द फुले लेखनात, एखाद्या मध्यवर्ती कल्पनेभोवती शब्दांची मांडणी करण्याकरिता याचा वापर होतो. तो वापर फुलाभोवतीच्या पाकळ्याप्रमाणे होत असतो. केंद्रस्थानी एक मुख्य शब्द किंवा विषय असतो. त्याच्या सभोवतालच्या पाकळ्यामध्ये संबंधित शब्द असू शकते. शब्द समानार्थी समान अर्थाने, काही शब्द विशेषणे लावून वर्णन करणारे असतात. केंद्रस्थानी ‘आनंद’ हा शब्द असेल तर तर पाकळ्या मध्ये विविध शब्द असू शकतात. जसे हर्ष, हर्षित, उत्साह, समाधान, प्रसन्न, सुख, प्रफुल्ल अशा प्रकारे अनेक शब्द फुलाच्या पाकळ्यासारखे फुलांमध्ये फुलते. शब्दपुष्प अनेकदा लिखाणात बोलतांना वापरावे लागते. ते कवी लेखकांना, व्यक्तींना शब्दसंग्रह वाढविण्यासाठी उपयोगी पडते. कल्पनेवर विचार विनिमय करण्यासाठी लेखन सुधारण्यासाठी, विशेषकरून वर्णनात्मक लेखन सुधारण्यासाठी, शब्दांमधील संबंध समजून घेण्यासाठी शब्दफुले उपयोगी पडतात.
*शब्दांमधील क्रांती*
‘क्रांती’ येथे सुद्धा शब्द फुल वापरण्यात येते. येथे मध्यवर्ती संकल्पना क्रांती आहे. ‘क्रांती’ हा मध्यभागी शब्द आहे. क्रांती या शब्दाच्या संबंधित पाकळ्या जसे बदल, स्वातंत्र्य, बंड, उठाव, निषेध, स्वावलंबन, चळवळ, सुधारणा, उलथापालथ, फेरफार, प्रगती, परिवर्तन अशा क्रांतीच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत, त्या संबंधित शब्दांशी जोडलेल्या असतात.
कोणत्याही कवितेतून त्या कविचे अंतरंग (हृदय) दुसऱ्या व्यक्तीला स्पष्टपणे ओळखता येते. त्याच्या हृदयाची स्पंदने वाचकांना जाणवू लागतात. तसेच कवीच्या मनातील सुख-दुःखाचे हेलकावे समाज पारदर्शकपणे पाहू शकतो. म्हणूनच साहित्याच्या सर्व प्रकारात कविता या वांङमय प्रकाराला वरचे स्थान प्राप्त झाले आहे. कारण कविता म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी पद्धती आहे.
मराठीत ‘कविता’ या शब्दाचे समानार्थी शब्द पाकळ्या काव्य, पद्य, कवन, गाणे आणि पद्यरचना हे आहेत. कविता या शब्दासाठी मराठीत आणखी समानार्थी शब्द शायरी, रसकाव्य, कवन, तसेच अभंग, ओवी, चारोळी, गझल, हे शब्द मुख्यत्वे साहित्यामध्ये कविता या शब्दाला पर्यायी म्हणून वापरले जातात.
माझा एक कविता संग्रह लवकरच प्रसिद्ध होत आहे. त्याचे नाव आहे ‘शब्दांमधील क्रांती’ कविता संग्रह लिहितांना प्रतिभेबरोबरच कल्पनाशक्तीची जोड लागली. तसे ध्येय समोर होते, म्हणून कविता संग्रह तयार करता आला. लहानपणापासून आपण एक वाक्य ऐकतो ‘बोलतांना नेहमी शब्द जपून तोलून मापून बोलायचं.’ आपल्या बोलण्याचा कोणाला त्रास झाला तर त्याला तलवारीच्या घावापेक्षाही त्या शब्दांचा त्रास होतो. आज आपल्या देशात धार्मिक असहिष्णुता वाढतच चाललीय, देशातील विविधता, बहुसंस्कृतितता नाकारण्याचा प्रयत्न होत आहे. धर्म, संस्कृती यांच्यातल्या विविधतेने समृध्द असलेला देश ही आपली ओळख पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि म्हणूनच काय बोलावं याच बरोबर काय लिहावं, काय वाचावं यावरही बंधनं येताना दिसायला लागलीत. ‘बोलण्याची शक्ती’ हे निसर्गाने फक्त मानवालाच दिलेलं वरदान आहे. आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे.
“शब्दांमधील क्रांतीने” समाजात मोठे परिवर्तन घडते. यात नवीन विचारांची निर्मिती, जुन्या धारणांना आव्हान देणे, सामाजिक राजकीय बदलांना दिशा देणे, भाषेचा वापर करून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, अशा प्रकारे माझ्या कवितेचा उद्देश आहे.. म्हणून शब्द हे केवळ संवादाचे माध्यम न राहता समाजात देशात बदल घडविणारे शक्तिशाली साधन झाले पाहिजे. विचारांची क्रांती, सम्यक क्रांती, विषमता दूर करण्यासाठी सामाजिक क्रांती, राजकीय उलथापालथे साठी लोकांना संघटित करण्यासाठी शब्दांचा वापर होतो.
“शब्दांमधील क्रांती” हा एक व्याक्यांश आहे. एक रूपकात्मक किंवा काव्यात्मक अभिव्यक्ती आहे. ज्याचा संदर्भानुसार अनेक अर्थपूर्ण प्रकारे अर्थ लावला जाऊ शकतो. हा माझा प्रथम एक काव्यसंग्रह एक विसरलेल्या किंवा कालबाह्य झालेल्या माझ्या शब्दांचे पुनरुज्जीवन आहे.
ट्रकच्या मागे एक वाक्य लिहिलेलं असते… ‘समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नही मिलता’ अर्थ काहीही असो पण वेळ फार महत्वाची आहे म्हणून माझ्या “शब्दामधील क्रांती” या कविता संग्रहात अनेक कविता “वेळ आणि काळ” या विषयावर आहेत, कठिण काळात जो मदत करतो तोच खरा मित्र असतो. जीवनात मी वेळेला फार महत्व दिले आहे, कठिण काळात मला अनेकांची मदत झाली आहे. माझ्या काही कविता काळात कसा मार्ग निघेल, कठीण काळात मदत करणारे साथी याचे सुंदर वर्णन कवितेत केले आहे.
स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको, अशी माझी भावना आहे. हा एक प्रकारे त्याग असतो, अशी भावना ज्याच्याजवळ असते, तो माणूस प्रगतीच्या वाटेवर असतो. जो त्याग करतो त्याची उन्नती कोणी थांबवू शकत नाही. आमचा त्याग आंबेडकरी चळवळीसाठी आहे. त्यासाठी संसारत्याग करायची आवश्यकता नाही. महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्याचे काम कवितेच्या माध्यमातून केले आहे. कवितेत सकारात्मक विचार आहेत. प्रतिगामी व्यवस्थेविरुद्ध विद्रोह आहे. पण क्रांतीची भाषा मऊ आहे. काव्यविश्वात रमतांना समाधान वाटते. मला हा मिळालेला आनंद मी माझ्यापुरता मर्यादित न ठेवता सर्वांना वाटून देत आहे. कवितेत राजकारण, समाजकारण या विषयांनी सुद्धा ठाव घेतलेला आहे. राजकारण समाजकारण आम्ही नाकारले नाही पण ते कसे ? हे कविता वाचल्यावरच कळणार आहे.
मी ग्रहणशील आहे, लिहितो जास्त आणि त्यातून माझ्या कवितेचा जन्म झाला. पुष्कळ काही बोलल्याने माणूस धम्मधर होत नसतो, थोडके का असेना थोडक्यात बोलून त्याचा अर्थ समजून, आचरणात आणतो, कृतीत उतरवतो तो धम्मधर होत असतो. मला जे बोलायचे आहे, ते लिखित स्वरूपात कविता संग्रहातून व्यक्त केले आहे, ही माझी ‘शब्दांमधील क्रांती’ आहे. प्रत्येक कवितेतून काहीतरी शिकण्यासारखे आहे.
सगळ्याच गोष्टी शब्दात
सांगता आल्या नाही l
माझी अपेक्षा समजून
घ्यायच्या असतात काही l
कधीच म्हणू नये दिवस
आपले खराब आहेत l
ठणकावून सांगावे काट्यांनी
वेढलेला मी गुलाब आहे l
एखाद्या गोष्टीची जाणीव
जाणीव शब्द जरी छोटा l
त्याच्यात अर्थ भरलेला
माणुसकी जपण्याचा मोठा l
नात्यात संबंध टिकण्या
महत्वाचे शब्द समज l
माणसाचा सर्वात मोठा
शत्रू म्हणजे गैरसमज l
निसर्गाच काम असत
माणसांची भेट घडवणं l
तुमच्या शब्दावर आहे
नाती किती काळ टिकवणं l
मी कवितेतून कवी आणि वाचकांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या ‘शब्दांमधील क्रांती’ कविता संग्रहात सामाजिक अन्यायातून कविता सुचल्या आहेत. आपल्या भोवतालच्या जगातील चांगल्या वाईट गोष्टी कवितेत मांडल्या आहेत. मनात साचलेला भाव कवितेत उतरवला आहे. आनंद, दुःख, संताप कागदावर नमूद केला आहे. मी आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. हा माझा प्रवास एक शोध आहे. मी कवितेमधून समाजाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण















