prabodhini news logo
Home धुळे प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा जीवन प्रवास

0
209

रंजल्या गांजल्यांची सेवा करावी मुक्या प्राण्यांवर दया करावी, बाप हो देव यांच्यात राहतो. बाप हो देव देवळात राहत नाहीं. देव आपल्या मनात राहतो. देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट राहते…. *गोपाला.,.,गोपाला… देवकी नंदन गोपाला* या आपल्या आवडत्या भजनाने समाजाला जागृत करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे राष्ट्रसंत म्हणजेच संत गाडगेबाबा…

संत गाडगेबाबा यांचा जन्म शेंडगाव ता. दर्यापूर जि. अमरावती येथे दि. २३ फेब्रुवारी १८७६ साली गरीब घरात झाला. परिस्थिती मुळे शिक्षण घेता आले नाही. त्यांचे नाव डेबूजी झिंगाराजी जानोरकर. वयाच्या १६ व्या वर्षी म्हणजे १८९२ साली लग्न झाले. त्यांना चार (४)मुली झाल्या परंतु संसारात मन काही रमले नाही. आणि १ फेब्रुवारी १९०५ रोजी गृहत्याग केला आणि अखंड प्रवास हा…. समाज जागृती व समाज सुधारक म्हणून जीवन व्यतीत केले.

डेबूजी हे सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधळी वजा फाटके तुटके कपडे आणि हातात एक फुटके *गाडगे* असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच त्यांना ” *गाडगेबाबा* ” म्हणू लागले.

दुःख मिळाल्याने ज्याचं मन *उदविग्न* होत नाहीं,

सुख मिळावं असा ज्याला *लोभ* नाहीं

राग भय इर्षा यांच्या पलीकडे जो पोहचला आहे अशा *स्थितप्रज्ञ्* माणसाला *संत* म्हणावे..

गाडगेबाबा कृतीशील संत होते. ” *आधी केले मग सांगितले* . ” चिंध्या पांघरूण सोन्या सारखा विचार देणारा संत म्हणजेच *गाडगेबाबा* …

*संत* गाडगेबाबा डेबूजी झिंगराजी जानोरकर यांचा जीवन प्रवास हा लोकशिक्षणातून समाज सुधारणेचा होता ज्यात त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड व जातीभेद दूर करण्यासाठी, शिक्षणाचा प्रसार, व्यसन मुक्ती, ऋण काढून लग्न किंवा संण साजरे करू नये. याबाबत जनजागृती करण्यासाठी कीर्तने, स्वच्छता कार्य केले. आयुष्यभर गोरगरीब , अनाथ, व गरजू साठी शाळा, धर्मशाळा, वसतिगृहे बांधून सेवाभाव जपला.

संत गाडगेबाबा हे निरक्षर होते औपचारिक शिक्षण त्यांना मिळाले नसले तरी पण ते ज्ञानाने परिपूर्ण होते.त्यांनी स्व- अभ्यास, अनुभव आणि कीर्तनातून शिक्षण घेतले.

समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देणेसाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य वेचले. म्हणून ते *लोकक्षिक्षक* देखील होते.

त्यांनी काळ्यापाटीवर रेघोटया ओढून आणि अनुभव जन्य शिक्षणातून अक्षरे गिरविली. भ्रमंती आणि जीवनातील अनुभवातून ते खुप काही शिकले..

शिक्षणाविषयीं त्यांचा दृष्टिकोन व्यापक होता.
• शिक्षणानेच समाज प्रगती करू शकतो असे त्यांचे ठाम मत होते.
• पुस्तकी ज्ञाना पेक्षा व्यावहारिक जीवनपयोगी आणि नैतिक शिक्षणावर त्यांचा भर होता.
• शिक्षणातूनच अज्ञान, अंधश्रद्धा आणि दाभीकपणा दूर होतो, अशी त्यांची शिकवण होती.

शिक्षणाचे महत्व ओळखून त्यांनी स्वतः ३१ शिक्षण संस्था सुरू केल्या आणि लाखो लोकांना अंधश्रद्धा, अज्ञान दूर करुन स्वच्छतेची व चारित्र्याची शिकवण दिली म्हणून ते ” *चालते-बोलते ” विद्यापीठ मानले जातात.

कीर्तनातून ते लोकांना स्वच्छतेचे महत्व आणि चरित्र्याचे महत्व, अंधश्रद्धा निर्मूलन करणे कामी ” देव दगडात नसून, माणसात आहे* हा विचार त्यांनी लोकांच्या मनावर ठसवला.

संत गाडगेबाबा यांनी समाजाला दिलेले दशसूत्री संदेश

* भुकेल्याना = अन्न
* तहानलेल्याना = पाणी
* उघड्या नागड्याना = वस्त्र
* गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
* बेघरांना = आसरा
* दुःखी व निराशाना = हिंमत
* गरीब तरुण तरुणीचे = लग्न
* बेकारांना = रोजगार
* अंध पंगू रोगी यांना = औषधोपचार
* पशु पक्षी मुक्या प्राण्यांना = अभय
हाच आजचा रोकडा धर्म आहे.
हिच खरी भक्ती व देवपूजा आहे.

एका निरक्षर व्यक्तीने शिक्षण आणि सामाजिक सुधारणेसाठी केलेले कार्य हे अतुलनीय आहे.. म्हणूनच आधुनिक संत म्हणून ओळखले जातात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांच्या विचार व कार्यात साम्य होते.. गाडगेबाबा यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर गुरु मानत. डॉ बाबासाहेब यांच्या निधनाने गाडगेबाबा खुप खचले व रडले होते. व अवघ्या १५ दिवसात २० डिसेंबर १९५६ रोजी संत गाडगेबाबा यांचे वळगाव जि अमरावती येथे पेढी नदीच्या काठावर त्यांचे निधन झाले..

कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना आधुनिक *तुकाराम* म्हणत…

“सिंहाला पाहावे वनात,
हत्तीला पाहावे रानात
तर गाडगेबाबा यांना पाहावे कीर्तनात… असे आचार्य अत्रे म्हणतं…

आपल्या कीर्तनातून त्यांनी…
देव माणसात
स्वच्छता
शिक्षण
अंधश्रद्धा निर्मूलन
व्यसनमुक्ती
सामाजिक समानता
सामाजिक न्याय
कर्ज टाळणे.
इत्यादी वैज्ञानिक दृष्टिकोन व दूरदृष्टी चे क्रांतिकारी प्रभावी समाज प्रभोधन केले..

घर परिसर स्वछता च्या महत्वा सोबत *मनाची* स्वच्छता ही महत्वाची हे समाजाला आपल्या पटवून दिले.

महाराष्ट्र शासनाने त्यांच्या या कार्याला तेवत ठेवत.
२०००- २००१ या वर्षांपासून “संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान”
हे ग्रामीण भागातील आरोग्य सुधारण्यासाठी, स्वच्छतेची सवय लावण्यासाठी आणि लोकसहभागातून गावे स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले एक अभियान आहे. ज्यामध्ये वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, पाणी आणि शौचालयांचा वापर यावर भर दिला जातो आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना (ग्रामपंचायत )बक्षीशे दिली जातात. या अभियानाला *” स्वच्छ भारत मिशन “* (ग्रामीण) २ ऑक्टोबर २०१४ अंतर्गत बळ दिले आहे. ज्यामुळे संपूर्ण ग्रामीण भागात महाराष्ट्र हगणदारी मुक्त होण्यास मदत झाली आहे.

त्यांचे महान कार्य शासन व सुजाण नागरिक जोमाने पुढे घेऊन जात आहेत… त्यांचा हा *संत* जीवन प्रवास खऱ्या अर्थाने आजही अविरत… अखंड चालू आहे…. चालत राहील

तीर्थी धोंडापाणी
देव रोकडा सज्जनी
अश्या या देव माणसाला कोटी कोटी प्रणाम

सुनंदा निकम, धुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here