
स्वच्छता मिशनचे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा
आपला महाराष्ट्र संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यांनी आपल्या कार्याने महाराष्ट्राला संपन्न आणि समृध्द केले, समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, बुवाबाजी, असमानता दुर करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. त्यापैकी असेच एक वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा होय. गाडगेबाबांनी स्वछतेचे महत्त्व गावोगावी झाडू घेवुन गाव झाडून पटवून दिले. ज्या गावात त्यांचे किर्तन व्हायचे ते गाव प्रथम ते झाडत असत. रात्री आपल्या कीर्तनातून ते समाज प्रबोधनाचा विचार मांडत असत.
राष्ट्रसंत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील एक महान संत, समाजसुधारक आणि विचारवंत होते. ज्यांनी आपले जीवन समाजसेवेसाठी समर्पित केले. ते राष्ट्रसंत होते, ज्याचा अर्थ ‘राष्ट्राचे संत’ असा होतो. कारण त्यांचे कार्य केवळ एका समुदायाच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या भल्यासाठी होते. त्यांच्या मुख्य कल्पनेत आणि शिकवणीत असे दिसते की खरा धर्म म्हणजे लोकांची सेवा करणे होय. स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही सुरुवात गाडगेबाबांनी स्वतःपासून सुरू केली. त्यांनी स्वतः गावे, मंदिरे, आणि रस्ते झाडून स्वच्छ केले. गरीब आणि मागासलेल्या समुदायाला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. जातीभेद आणि अंधश्रद्धेला विरोध केला. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती. गरीब, आजारपण आणि गरजूंना मदत करणे हे त्यांच्या तत्वज्ञानाचे केंद्रबिंदू होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी मजबूत संदेश दिला. त्यांच्या प्रबोधनात अनेक प्रकारचे उदाहरणे देऊन ते लोकांना जागरूक करत होते. गावोगाव प्रवास करून
समाजात सामाजिक जाणीव करून दिली. अनेक शाळा, वसतिगृहे, शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेला प्रेरणा दिली, त्या संस्था स्थापन करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा जन्म विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. लहानपणी गाडगेबाबांना कोणतेही काम नीटनेटके करण्याची सवय होती. लहानणापासूनच त्यांना स्वछतेची आवड होती. समाजात अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य, दुःख होते. समाज व्यसनाच्या आहारी गेला होता. अशा समाजाला सुधारण्यासाठी त्यांनी प्रभावी माध्यम कीर्तनाचा उपयोग केला आहे. समाजात रोगराई पसरली की औषधोपचार करा. देवाला नवस करू नका. देवाला कोंबड्या बकऱ्याचा बळी देऊ नका. त्यांच्या हातात नेहमी गाडगे असायचे त्यामुळेच त्यांना लोक गाडगेबाबा म्हणू लागले. त्यांचे मुळ पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जाणोरकर असे होते. गाडगेबाबांनी स्वतःसाठी कुठलाही संचय केला नाही. गावोगावी फिरून त्यांनी कीर्तनच्या माध्यमातून समाज जागृती केली. महाराष्ट्रात पंढरपूर, नाशिक, देहू, आळंदी या ठिकाणी गाडगेबाबांनी कष्ट करून, मदत मागून धर्माशाळा बांधल्या. काही नद्यावर घाट बांधले, पाणपोया सुरु केल्या.
संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट 14 जुलै 1941 मध्ये संत गाडगेबाबा यांची प्रकृती ठीक नव्हती तेव्हा झाली. बाबासाहेब मुंबईत होते. ही माहिती एका सहका-याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत पोहोचवली. बाबासाहेब तेव्हा कायदेमंत्री होते. त्याच दिवशी सायंकाळी कामानिमित्त त्यांना दिल्लीला जायचे होते. पण गाडगेबाबांच्या प्रकृतीची बातमी ऐकताच त्यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले. दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामी या बातमी घेऊन येणा-या सहका-यासोबत हॉस्पिटलमध्ये पाहोचले. गाडगेबाबा कधीही कुणाकडून काही स्वीकारत नसत. पण त्यांनी बाबासाहेबांकडून घोंगड्या स्वीकारल्या. गाडगेबाबा तेव्हा म्हणाले होते, ‘डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे.’ डॉ. बाबासाहेब म्हणाले, ‘बाबा’ माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे.’ या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर तर गाडगेबाबा खूपच आनंदी होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्यावर ते लोकांना मदतीचे आवाहन करायचे. ते बाबासाहेब माझे गुरू होऊ शकतात असे बोलायचे, मी न शिकलेला माणूस, रस्त्यावर उतरून लोकांना चांगल सांगणारा पण डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी कायद्याचा आधार देणारा माणूस अशी पोहोच पावती ते द्यायचे.
संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश
1) भुकेलेल्यांना अन्न
2) तहानलेल्यांना पाणी
3) उघड्या नागडयांना वस्त्र
4) बेघरांना आश्रय
5) अंधू, पंगू, रोगी यांना औषधोपचार करण्यासाठी मदत करा.
6) बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी मदत करा.
7) पशु, पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय द्या.
8) गरीब तरुण तरुणीचे लग्न लावून द्या.
9) दुःखी, निराश लोकांना हिंमत द्या.
10) गोरगरिबांना शिक्षण द्या, शिक्षणासाठी
मदत करा. हाच खरा रोकडा धर्म आहे. हीच
खरी देवभक्ती व पूजा आहे असे गाडगेबाबा
म्हणत असत.
गाडगेबाबांनी आयुष्यभर कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केलं. 14 नोव्हेंबर 1956 रोजी पंढरपूर येथे झालेले त्यांचे कीर्तन अखेरचे ठरले. 6 डिसेंबर 1956 ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा संत गाडगे महाराजांचे अश्रू त्यावेळी सर्वांना दिसले. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाची बातमी कळताच गाडगेबाबांना अश्रू अनावर झाले. गाडगेबाबा रडत होते. ते म्हणाले परिवर्तनवादी चळवळीतील सर्व जाती धर्माच्या लोकांना मोठा संदेश देणारे बाबा आम्हाला सोडून गेले. आम्ही पोरके झालो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर अवघ्या 14 दिवसानंतर 20 डिसेंबर 1956 रोजी गाडगेबाबांचे देहावसान झाले. अमरावती येथे वलगावला पेढी नदीच्या पुलाजवळ त्यांची समाधी बांधण्यात आली. दरवर्षी 20 डिसेंबरला बाबांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते.
धर्म सांगायचा नसतो, जगायचा असतो, धर्म ग्रंथात नसतो, जीवनात असतो, मी तुम्हाला सर्व धर्माचे सार सांगतो, भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागडयांना वस्त्र, बेघरांना आश्रय, बेरोजगारांना रोजगार, अंधू, पंगू, रोगी यांना औषधोपचार, मुक्या प्राण्यांना अभय, कर्ज काढू नका, कष्टाशिवाय भाकर खाऊ नका, निरंतर उद्योग करा. दगडात देव नसून माणसात देव आहे असे सांगणारे, माणसाला माणुसकीची शिकवण देणारे, स्वत: एकही वर्ग न शिकता शिक्षणाचे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्व समजावून, जीवनभर लोकांना त्याचे महत्व समजावून सांगणारे चालते बोलते विद्यापीठ तसेच भारत स्वच्छता मिशनचे एकमेव जनक महान संत कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिना निमित त्यांना विनम्र अभिवादन.
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण















