
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – बस मध्ये सदैव “तिकीट ,तिकीट” म्हणणारा एक वाहक, जेव्हां रंगमंचावर “नटसम्राट” होऊन ‘कुणी घर देता का घर’ म्हणतो आणि साक्षात गणपतराव बेलवलकर प्रेक्षकांसमोर उभा करतो, तेव्हां सर्वांच्यांच नजरा उंचावतात . नुकतीच राज्य परिवहन महामंडळाच्या 53 व्या नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी अकोला येथील प्रमिला ताई ओक सभागृह येथे पार पडली. या नाट्य स्पर्धेत छत्रपती संभाजी नगर विभागाच्या वतीने वि. वा. शिरवाडकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेली, नटसम्राट हे अजरामर नाटक सादर केले. या नाटकात नटसम्राट यांची अत्यंत धीर गंभीर अलंकारिक व पल्लेदार संवाद असलेली आव्हानात्मक अशी भूमिका कोणा उच्च शिक्षित अधिकाऱ्याने नव्हे तर चक्क रमेश सोनवणे ह्या साध्या वाहकाने सादर केली .कुठलाही सांस्कृतिक व कला शिक्षणाचा वारसा किंवा अभिनय कलेची परंपरा घरात नसताना एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीने ही नटसम्राट अजरामर भूमिका अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अभिनय प्रकाराच्या सर्वांगांना स्पर्श करीत रमेश सोनवणे या वाहकाने ही भूमिका अत्यंत प्रामाणिक आणि चोखपणे पार पाडली हे नवलच म्हणायचे..! रात्रंदिवस एसटी बस मध्ये प्रवास करीत वाहकांची भूमिका नेटाने व नियमाने पार पाडणारा रमेश सोनवणे जेव्हा नट म्हणून नटसम्राटाची भूमिका चौखपणे पार पाडतो तेव्हां खूप कौतुक वाटते असे मत सर्व प्रेक्षकांनी व्यक्त केले .या भूमिकेबद्दल त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तसेच नटसम्राट या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले व उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून द्वितीय क्रमांकाचे बक्षीसही रमेश सोनवणे यांना मिळाले. या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे छत्रपती संभाजी नगर विभागाचे विभाग नियंत्रक प्रमोदजी नेहुल ,तसेच नाशिक विभागाचे विभाग नियंत्रक सचिनजी क्षीरसागर, विनायक आंबट, कामगार अधिकारी, अनिता कोकाटे सांख्यिकी अधिकारी, यांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.















