
मीरा-भाईंदर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत गंभीर स्वरूपाच्या अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
मतदार यादी तयार करताना काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने नावांची भर व वजाबाकी झाल्याचा आरोप समोर आला आहे. काही राजकीय हस्तक्षेपामुळे ही प्रक्रिया प्रभावित झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी, अतिरिक्त आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत संशयास्पद हालचाली झाल्याचा आरोप आहे. या संदर्भात महापालिका मुख्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश देण्यात आले असून, ठराविक कालावधीत कार्यालयात उपस्थित असलेल्या व्यक्तींची चौकशी करण्यात येणार आहे.
या चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी किंवा संबंधित व्यक्तींवर कठोर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. चौकशी प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष व पारदर्शक राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे मीरा-भाईंदर शहरातील राजकीय वातावरण तापले असून, मतदार यादीच्या पारदर्शकतेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आता या प्रकरणात पुढे कोणावर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















