prabodhini news logo
Home गडचिरोली भटपारच्या ग्रामस्थांचा वनवास संपणार; ६ दिवसांच्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून रस्त्यासाठी लेखी आश्वासन

भटपारच्या ग्रामस्थांचा वनवास संपणार; ६ दिवसांच्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून रस्त्यासाठी लेखी आश्वासन

0
11

भामरागड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दुर्गम भटपार गावातील रस्त्याच्या प्रलंबित प्रश्नासाठी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (भाकपा) बेमुदत आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. प्रशासनाने आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी रस्त्याबाबत लेखी पत्र दिल्यानंतर सहाव्या दिवशी या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.
सलग सहा दिवस चालला लढा
भटपार गाव स्वातंत्र्याच्या अनेक वर्षांनंतरही मुख्य प्रवाहापासून तुटलेले होते. पक्क्या रस्त्याअभावी ग्रामस्थांचे जगणे असह्य झाले होते. या अन्यायाविरुद्ध १५ एप्रिल २०२६ पासून भाकपाने जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी बेमुदत आंदोलन पुकारले होते. रणरणत्या उन्हातही भटपारचे ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम होते. आंदोलनाचा वाढता दबाव पाहून जिल्हा प्रशासनाने अखेर नमते घेतले.
तहसीलदारांच्या हस्ते पत्र सुपूर्द
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाला मंजुरी दिल्याचे लेखी पत्र प्रशासनास प्राप्त झाले. भामरागडचे तहसीलदार यांनी स्वतः आंदोलनस्थळी भेट देऊन हे पत्र भाकपा पदाधिकारी व नागरिकांना सुपूर्द केले. या आश्वासनानंतर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, प्रशासनाविरोधातील संताप आता समाधानात बदलला आहे.
लोकशाही मूल्यांचा विजय
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी भामरागड पोलीस स्टेशन, स्थानिक प्रशासन, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकारांचे मोलाचे सहकार्य लाभले. या यशामुळे लोकशाही मार्गाने दिलेल्या लढ्यावर ग्रामस्थांचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे.
यांचे लाभले नेतृत्व
या ऐतिहासिक आंदोलनाचे नेतृत्व भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, कॉ. सुरज जककुलवार यांनी केले. या आंदोलनात भटपार येथील अबालवृद्ध, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने ग्रामस्थांनी भाकपाचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here