
सावित्रीबाई यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी नेवाशे पाटलाच्या घरी झाला. ९ वर्षाच्या असताना १८४० मध्ये त्यांचा विवाह जोतीराव फुले यांच्या सोबत झाला.रूढी परंपरेच्या जोखडात बंदिस्त असणाऱ्या त्या काळात सावित्रीबाई पतीच्या शब्दावर विश्वास ठेवून दाराचा उंबरठा ओलांडून पतीने सांगितलेल्या वाटेवर ठामपणे चालू लागल्या. त्या वाटेवर स्वकतृत्वाची लखलखीत मुद्रा उमटवली त्यांनी निवडलेला मार्ग पुढे अनेकीसाठी राजमार्ग झाला.
लहान पणापासून जोतीराव यांना जातीयतेचे चटके बसले होते. अस्पृश्याचे हाल पाहून जोतीराव यांचे मन पिळवटून निघत असे, अशा अमानुष कर्मकांड, जातीयतारूढी परंपरे विरूद्ध जोतीरावाचे मन पेटून उठे जोतीरावाच्या मनातील पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे काम सावित्रीबाई फुलेने केले. खऱ्या अर्थाने जोतीरावाची क्रांतीज्योत सावित्रीबाई झाली , महाराष्ट्रातील आरंभी टप्प्यात सावित्रीबाईनी जोतीराव फुले यांच्यासह मोठी कामगिरी पार पाडली. त्यांनी बालविवाह, विधवा पुनर्विवाह, भ्रूणहत्या, स्त्री चळवळ जातीभेद, अस्पृश्यता, कुप्रथेेविरुद्ध आवाज उठविला, १८५१ मध्ये महिला सेवा मंडळ स्थापन करून महिलाचे हक्क आणि त्यांचे सक्षमीकरण यावर भर दिला.
स्त्रीयांमधील आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे हे सावित्रीबाई जोतीराव फुले यांनी ओळखले होते.
विधवा स्त्रियांना मदत करण्यासाठी आणि अवांछित गर्भातून जन्माला येणाऱ्या मुलांच्या हत्या थांबवण्यासाठी “बालहत्या प्रतिबंधक गृह” १८५३मध्ये सुरू केले.जे भारतातील पहिले अनाथाश्रम होते. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सामाजिक समता व शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाई जेव्हा मुलांना शिकवण्यासाठी शाळेत जायच्या तेव्हा रस्त्याने जाताना चिखल, शेण, दगड मारायचे तेव्हा सावित्रीबाई शाळेत जाताना एक अतिरिक्त साडी सोबत ठेवायच्या जेणेकरून चिखलफेक झाल्यावर साडी बदलून त्या पुन्हा शाळेत जाऊ शकतील.
त्याकाळी स्त्रीयांना शिक्षण देणे गुन्हा मानल्या जायचे.
ज्या काळात पायात चप्पल घालणे जोडवी घालण्यास मनाई होती मुलीनी ज्ञान घेतल्यास वैधव्य येतं असं सांगण्यात येत होतं त्या काळात सावित्रीबाई जोतीराव यांनी चतृवर्णीयांचा
विरोध अपमान स्विकारून शाळेचा आरंभ केला.मनुवादी रूढींना व चतृवर्णी धर्मीयांना चपराक दिली. सार्वजनिक विहिरीवर अस्पृश्यांना पाणी भरू दिल्या जात नव्हते. तेव्हा जोतीराव सावित्रीबाई यांनी घरचा पाण्याचा हौद खुला करून दिला. हे कृत्य त्या काळात खूप धाडसाचे होते.
यातून सावित्रीबाई यांचा मानवतावादी दृष्टीकोन दिसतो.
कारण ते सामाजिक रूढी आणि परंपरेच्या विरोधात होते.
जोतीराव यांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वता एकनिष्ठ
राहून सर्व त्रास सहन करून आपल्या कार्यावर सावित्रीबाई ठाम राहिल्या व मुलीच्या शिक्षणासाठी संघर्ष करत राहिल्या.
त्यांनी आंतरजातीय विवाहांना पाठिंबा दिला. सावित्रीबाई यांची “काव्यफुले” “बावनकशी””सुबोध रत्नाकर ” यासारख्या काव्यसंग्रहातून शिक्षणाचे व सामाजिक बदलाची गरज मांडली. पित्याच्या मुत्यु नंतर श्राद्ध घालायचे नाही असे जोतीराव फुले यांनी ठरवले या संकल्पाला सावित्रीबाईनी साथ दिली.जाती बहिष्काराची तमा न बाळगता अपंग अनाथांना स्वहस्ते जेवन बनवून वाढले. त्या आगळ्यावेगळ्या श्राध्दाची कहाणी अशी आहे. 1868 साली जोतीराव यांच्या वडीलांच निधन झाले , मुलाचे सुधारकी विचार न पटल्यामुळे व ज्ञाती बहिष्काराच्या सावटामुळे जोतीराव व सावित्रीबाई वेगळे राहात होते. तरीही पिता पुत्राचा एकमेकावर विलक्षण जिव होता. अंत्यसंस्कार झाल्यावर जोतीराव सावित्रीबाई यांना म्हणाले ” आता दिवस कार्य करण्यास नातेवाईक मागे लागतील मला वडिलांच्या नावे अन्न वस्तू दिल्या ते पटते, पण त्या ज्याच्याकडे नाही त्यांना द्यावेसे वाटते.
तेव्हा तुमचे मत सांगा, जोतीराव आपल्या पत्नीला अहो
जाहो म्हणायचे, व सावित्रीबाई जोतीराव यांना शेटजी
म्हणत. त्यावर सावित्रीबाई म्हणाल्या” इथल्या घरात
राजाराम भाऊजी पिंडदान करू असेच म्हणतील. तेव्हा
तुमच्या मनात काय असेल ते आपण आपल्या घरी जाऊन
करू,” त्यावर “चला तर मग दोघेही घरी आले “सावित्रीबाईनी अपंग अनाथांना जेवन द्यायचे सुचवले तसेच
शाळेतील मुलामुलींना पाट्या पुस्तके देण्याचे ठरवले.
दुसऱ्या दिवशी पहाटेच शेजारणीच्या मदतीने स्वयंपाकास
सुरवात केली व जोतीराव आमंत्रणे देण्यास गेले एकाकडून
दुसऱ्याला असे हळूहळू कळत गेले व अनाथ पंगू लोकानी
अंगण भरू लागले. ज्यांना चालता येत नव्हते त्यांना
कोणीतरी आणून सोडायचे . माझ्या वडिलांनी मला
लहानाचे मोठे केले त्यांना सर्वाना जेवू घालणे प्रिय होते
म्हणून त्यांच्या आठवणी साठी आज भोजन समारंभ करत
आहे, अशी प्रस्तावना करत सर्वाना स्वहस्ते सावित्रीबाई व
जोतीराव यांनी गोडधोड आग्रह करून भोजन वाढले . व
पाट्या पुस्तकाचे वाटप केले ती अदभुत पंगत व वस्तू वाटप
पाहून पुणेकर थक्क झाले. या प्रकारे अन्नदान व वस्तू वाटप
श्राध्द कर्म त्या आधी कोणी बघीतले नव्हते. अशा प्रकारे
प्रत्येक कार्यात जोतीरावसंगे सावित्रीबाई सहभागी होत असत.ज्या प्रकारे जोतीराव सावित्रीबाई यांच्याजवळ
केलेल्या कार्याचा व करणाऱ्या कार्याचा लेखाजोखा मांडत
त्याच प्रकारे सावित्रीबाई जोतीराव घरी नसताना केलेल्या
कार्याचा लेखाजोखा पत्राद्वारे पतीला मांडताना दिसतात.
किंवा त्यांना आलेले अनुभव सांगताना दिसतात.
समाज परिवर्तनाचा मार्ग त्यांनी आत्मविश्वासाने पार केला
त्यांच्या कार्यामुळे भारतातील स्त्रीयांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांचा जन्मदिन (३ जानेवारी) बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांचे कार्य स्त्री शिक्षणाचे आणि सामाजिक न्यायाचे एक क्रांतिकारक पर्व होते.
ज्याचा प्रभाव आजही दिसून येतो.
सावित्रीबाई यांनी समाजातील अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळावा समानतेवर आधारित समाज निर्मिती व्हावी यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले , जोतीराव
फुले यांच्या निधनानंतर ही त्यांनी सत्यशोधक समाजाचे
कार्य पुढे चालू ठेवले. प्लेगची पुण्यात साथ पसरली तेव्हा
समाजातील अनेक लोक या आजारी लोकांपासून दूर पळत
असताना सावित्रीबाई यांनी प्लेगग्रस्थ रूग्नाची कणखरपणे सेवा करण्याचा निर्णय घेतला त्यांनी स्वतः रूग्नाना
खांद्यावर घेऊन रुग्णालयात दाखल केले. अशा प्रकारे बहूजन अस्पृश्य समाजाच्या शिक्षण व न्याय हितासाठी आयुष्यभर त्याग व संघर्ष करत राहील्या.त्या मुख्याध्यापिका बरोबर एक उत्तम कवियत्री व समाजसेविका होत्या.
शिक्षण, समानता आणि मानवता या मुल्यावर आधारित
समाज निर्मितीसाठी त्यांचे जीवन प्रत्येक पिढीला प्रेरणादायी
आहे. आणि सावित्रीबाई यांची जयंती मार्ग दर्शक दीपस्तंभ
ठरते. सावित्रीबाई फुले यांचे कार्य विचार आजही समर्पक
ज्ञानाचे प्रेरणास्थान आहे.
आज सावित्रीमाई यांची जयंती त्यानिमित्त शतशः प्रणाम
नंदा भगत
कारंजा लाड, वाशिम















