
सावित्रीबाई फुले (1831-1897) या एक महान भारतीय समाजसुधारक, शिक्षिका आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला हक्क आणि सामाजिक समानतेच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाते.
सुरुवातीचे जीवन
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव सत्यवती नेवसे होते. त्यांचे लग्न लहानपणीच ज्योतिराव फुले यांच्याशी झाले होते. ज्यांनी त्यांना शिक्षण घेण्यास आणि शिक्षित होण्यास प्रोत्साहित केले होते. त्याकाळी सनातनी व्यवस्था स्वतःला उच्चवर्णीय समजणारे लोक महिलांच्या शिक्षणाला विरोध करत होते.
शिक्षणात योगदान
1 जानेवारी 1848 मध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून काम केले. त्या मुलींच्या शाळेच्या भारतातील प्रथम शिक्षिका बनल्या. त्यांनी अनेक मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. समाजाकडून विरोध, अपमान आणि त्रास सहन करूनही त्यांनी धैर्याने आपले काम सुरु ठेवले. आज महिलांना जे शिक्षण, नोकऱ्या आणि स्वातंत्र्य मिळत आहे ते सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या चळवळींनी आपल्या प्राणांची आहुती देऊन मिळवले आहे. अशा त्यागाचे आराध्य दैवत असलेल्या सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. ते दिवस किती कठीण गेले असेल, त्याची आजही कल्पना करता येत नाही,
सामाजिक सुधारणा
सावित्रीबाईंनी महिला, दलित, पिडीत, शोषित, गरिबांच्या उन्नतीसाठी काम केले. त्यांनी जातीय भेदभाव, बालविवाह आणि अस्पृश्यतेच्या प्रथेविरुद्ध लढा दिला. त्यांनी विधवांना आधार दिला आणि गर्भवती विधवांसाठी आश्रयस्थाने उभारून स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यास मदत केली. त्या काळात मुलींच्या शिक्षणावर सामाजिक बंधने होती, त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी केवळ स्वत:चा अभ्यास केला नाही, तर इतर मुलींच्या शिक्षणाचीही व्यवस्था केली, तीही पुण्यासारख्या शहरात. सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांच्यासोबत फार मोठे समाज कार्य केले आहे.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
सावित्रीबाईंचा एकच मंत्र होता, अज्ञान नाहीसे करून ज्ञानाचा दिवा लावणे, सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, हाच मानवाच्या प्रगतीचा पाया आहे. त्यांनी विधवा विवाहाची परंपरा सुरू केली. बाल-हत्या प्रतिबंधासाठी गृहाची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये विधवा आपल्या मुलांना जन्म देऊ शकत होत्या. आणि जर ती बाळाला सोबत ठेवू शकत नसल्या तर त्या त्यांना तेथेही सोडू शकत होत्या. या अनाथाश्रमाची संपूर्ण व्यवस्था सावित्रीबाई फुले स्वत: सांभाळत असत, आणि मुलांचे आईप्रमाणे पालनपोषण करत. आज हजारो वर्ष ज्यांना त्यांच्या अधिकारा पासून वंचित ठेवले त्या सर्व महिलांना सावित्रीबाई फुलेंच्या त्याग सामर्थ्या मुळे प्राप्त झाले. आज जे आयएएस, आयपीएस, आयआरएस, डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील प्राध्यापक, सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि जे कोणी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे त्या प्रत्येक महिलांची ती आई आहे. अशी आई आणि त्या आईची व्याख्या करणं जगातल्या कोणत्याही विद्वानाच्या आवाक्या बाहेरचा विषय आहे.
संघर्ष
1848 मध्ये पुण्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाईनी प्रथम मुलींची शाळा काढली, तत्कालीन देशातील ही पहिलीच शाळा होती. त्या काळी सनातनी उच्च वर्णीयांनी शिक्षणाला विरोध केला. परंतु अनेक संघर्ष करत हा शिक्षणाचा उपक्रम सावित्रीबाईंनी चालुच ठेवला. अनेक आघात होवूनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. शाळेत जाताना तिला नेहमी दोन साड्या सोबत ठेवाव्या लागत होत्या कारण जातीवादी तिच्यावर शेण टाकून ते खराब करायचे, कारण मनुवाद्यांचा असा विश्वास होता की सावित्रीबाई मुलींना शिकवून त्यांचा धर्म भ्रष्ट करत आहेत. मुलींचे शिक्षण त्यांच्या धर्मा विरुद्ध आहे. तरीही निर्भीड आणि धैर्यवान माता सावित्रीबाई फुले थांबल्या नाहीत आणि 1848 मध्ये फातिमा शेख यांच्यासमवेत देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या वेळी ही सर्व कामे करने आज वाटते तितके सोपे नव्हते. सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणी आणि समाजाच्या तीव्र विरोधाला न जुमानता महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना शिक्षित आणि रूढीवादी विचारांपासून मुक्त करण्यासाठी आपले जीवन वाहिले.
सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी जे कार्य केले ते नि:संशय क्रांतिकारी कार्य होते. त्यांच्या संघर्षामुळे त्यांनी स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. भारताच्या या महान नायिकेचा असा विश्वास होता की मानवता प्राप्त करण्याचा आणि पशुवाद संपवण्याचा एकमेव मार्ग शिक्षण आहे. महात्मा फुले सोबत सुरुवाती पासूनच सावित्रीबाईंचे जीवन संघर्षमय गेले आहे. त्या काळी मनुस्मुर्तीचा आधार घेवून स्त्रीचे स्वातंत्र्य नष्ट केले होते. महात्मा फुले प्रथम शिक्षणाकडे आकर्षित झाले. ते स्वतः शिकुन त्यांनी सावित्रीबाईंना शिकवले. सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित, पिडीत, जनतेला शोषणातून मुक्त करण्यासाठी आणि अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी वाहून घेतले. भारतातील शोषित-पीडित आणि वंचित महिलांची स्थिती सुधारण्याच्या कार्यात त्यांचे प्रमुख स्थान आहे.
महत्व
सावित्रीबाई फुले यांना धैर्य, समानता, शिक्षणाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. त्यांचे जीवन लोकांना न्याय आणि सामाजिक बदलासाठी प्रेरणा देत राहील. आज स्त्रियांना मोफत शिक्षण, आरक्षण, सन्मान, समान वेतन, समान नागरिकत्व, अनेक सोयी सवलती देवून त्यांचा सर्वांगीण विकास घडवुन आणण्याचा प्रयत्न करने गरजेचे आहे. त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्त्री मुक्ती चळवळी राबविण्यात याव्यात. विधवा, निराधार स्त्रियांना मानाचे जीवन जगता यावे म्हणुन आर्थिक मदत मिळण्या करिता, स्त्रियाना डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, प्रशासकिय अधिकारी होण्यासाठी, आमदार, खासदार, विविध क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळविने आवश्यक आहे. नवसमाजाचा पाया निर्माण करने आवश्यक आहे. अनेक जातीत, पोटजातीत समाज विखुरला आहे. आज नेतृत्व करायला पुढे कोणी धजावत नाही. सावित्रीबाई फुले व भारतीय संविधाना मुळे पंतप्रधान, राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रिया पोहचल्या असल्या तरी आज त्यांच्यात राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण करून त्यांच्या सर्वागीण विकासाकरिता त्यांना देश विकासात सहभागी करून घेण्यासाठी नविन सावित्रीबाई फुलेची आवश्यकता आहे. आर्थिक विकासा बरोबरच सामाजिक विकास झाला पाहिजे. मानसिकतेवर परिणाम झाला पाहिजे. वैचारिक क्रांती झाली पाहिजे. देशाचा विकास महिलांची प्रगती किती यावर अवलंबून आहे.
शेवटचे दिवस
जगात दुःख आहे, दु:खाचा समुद्रच आहेत. आपला सुर्योदय आपणच झाले पाहीजे. आपणच आपला मार्ग झाले पाहीजे, त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहीजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच केला पाहीजे हे सावित्रीबाई कडून शिकण्यासारखे आहे. आपणाला दुनिया नाही. आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहीजे. ही गुणवत्ता सावित्रीबाईत होती. विश्वगुरू तथागत गौतम बुद्ध यांनी सर्वप्रथम शूद्र आणि महिलांच्या सन्मानासाठी आंदोलन केले. भगवान बुद्धाच्या काळात पडदा पद्धत नव्हती. प्रियदर्शी सम्राट अशोकाने समता आणि मानवतावादी विचारसरणीचा जगभरात प्रसार केला, आपली मुलगी संघमित्रा हिला त्या काळात श्रीलंकेला पाठविले तेव्हा तीला घुंगट नव्हता. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणून त्यांनी महिलांना पुरुषाच्या बरोबरीनचे समान अधिकार दिले. प्राचीन काळी भारतातील स्त्रियांचा सामाजिक दर्जा फार उच्च होता. तो अर्वाचीन काळी खाली घसरला. ज्यावेळी जगातील कोणत्याही देशात स्त्रियांना इतका मानसन्मान मिळत नव्हता, त्यावेळी भारतातील स्त्रियांना तो मिळत होता. त्यांची नंतर जी अवनती झाली, ती मनुवादाच्या धार्मिक कायद्यामुळे. भारतातील स्त्रियांचा अधःपात घडवून आणण्यास सर्वस्वी मनुवादी कायदे जबाबदार आहेत हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सावित्रीबाईनी साहित्याच्या माध्यमाचा उपयोग केला.
ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. 10 मार्च 1897 मध्ये प्लेगच्या प्रादुर्भावादरम्यान रुग्णांची काळजी घेत असतांना त्यांचेही प्लेग या आजाराने निधन झाले.
आयुष्यात निडरपणे आणि निःस्वार्थ बुद्धीने लोकांची सेवा करत जगणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, कवयित्री, क्रांतीज्योती, ज्ञानज्योती माता सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण















