prabodhini news logo
Home चंद्रपूर प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – वेळ

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – वेळ

0
117

वेळ ही अशी शक्ती आहे जी न दिसता सगळं बदलून टाकते. ती न कुणासाठी थांबते, न कुणाची वाट पाहते. आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर ती पुढे सरकत राहते. कधी ती आपल्याला हसवत आयुष्यात रंग भरते, तर कधी अश्रूंच्या ओघात आपल्याला अधिक परिपक्व करते.
आपण अनेकदा वेळेची किंमत असताना तिच्याकडे दुर्लक्ष करतो. “उद्या करू”, “पुढे पाहू” असे म्हणत आजचा क्षण हातातून निसटून जातो. पण जेव्हा तो क्षण कायमचा मागे पडतो, तेव्हा त्याची जाणीव मनाला टोचते. वेळ परत येत नाही, पण तिच्या आठवणी मनात खोलवर रुजतात—कधी समाधान देतात, कधी पश्चात्ताप.
वेळ माणसांची खरी ओळख करून देते. सुखाच्या क्षणी आजूबाजूला गर्दी असते, पण अडचणीच्या वेळी सोबत करणारे मोजकेच असतात. कोण आपल्यासाठी थांबतं, कोण निघून जातं, हे वेळच दाखवते. त्यामुळे वेळ कठोर वाटते, पण ती नेहमी प्रामाणिक असते.
वेळ जखमा भरून काढते असं म्हणतात, पण खरं तर ती आपल्याला त्या जखमांसोबत जगायला शिकवते. दु:ख हळूहळू बोथट होतं, अनुभव शहाणपण देतात आणि माणूस आतून अधिक मजबूत बनतो. वेळ प्रत्येकाला काहीतरी शिकवते—संयम, समजूतदारपणा आणि स्वीकार.
जर आपण वेळेचा सन्मान केला, तर ती आपल्याला योग्य मार्गावर नेते. आजचा क्षण मनापासून जगला, काम आणि नाती प्रामाणिकपणे जपली, तर उद्या मागे वळून पाहताना मन शांत असतं. कारण आयुष्य म्हणजे केवळ जगलेली वर्षे नाहीत, तर वेळेत जपलेली माणसं आणि क्षण आहेत.
वेळ बदल घडवते; पण त्या बदलात आपण काय बनतो, हे आपल्या हातात असतं. म्हणुन म्हटल्या जातं..
“न हि कालात् परं बलम्”

सौ अर्चना सातपुते, चंद्रपुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here