
थांब जरा ना वेळ
थांबव तुझा खेळ
कुठे तरी घालू दे ना
आपल्या कर्माचा मेळ।।
खरंच वेळ किती महत्वाची आहे. प्रत्येक काम आपण वेळतच केले पाहिजे. जसे की लहानपणीचे खेळ मोठेपणी करायला लागलो तर चांगले वाटत नाही. वेळ जीवनात कधी आनंद देते तर कधी दुःख देत असते. वेळ ही आपल्या हातात आहे तोपर्यंत आपण वेळेचा उपयोग करून घेतला पाहिजे. वेळ जीवनातून पाऱ्यासारखी निसटून जात असते. म्हणून आपण योग्य वेळी त्या वेळचा उपयोग करून घेतला पाहिजे. वेळ बदलत असते. ती काळाची सख्खी मैत्रीण असते. काळ आणि वेळ याचा अचूक संयोग घालता आला पाहिजे. ज्याला काळ आणि वेळचे महत्व कळाले तोच व्यक्ती जीवनात यशस्वी होतो. म्हणून माणसाने वेळेनुसार राहिले पाहिजे पण चांगली प्रेमाची माणसं मात्र जपता आली पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे. त्या जीवनात आपली आवडती प्रेमाची व्यक्ती असेल तर अजून आनंद मिळतो. म्हणून जीवनात वेळेला आणि आवडत्या व्यक्तीला तिचा चांगल्या कामाला नेहमीच महत्व दिले पाहिजे. कारण वेळ चांगली असेल तर सर्व काही चांगले घडते आणि वेळ वाईट असेल तर सर्व काही वाईट घडते. चांगल्या वेळेत सर्वजण साथ देतात पण वाईट वेळेत मात्र सर्वजण सोडून जातात .मग त्या व्यक्तीला आपण कितीही जीव लावा ती व्यक्ती बदलते आपल्याला सोडून जाते मनात खूप वेदना होतात पण त्या कुणाला दाखवता येत नाही की आपल्याला सांगताही येत नाही. फक्त त्या वेदना सहन करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नसते. म्हणून माणसा चांगल्या व्यक्तीला नेहमीच जपत राहा कारण वेळ बदलते तशी व्यक्तीही बदलत असते. असे म्हणतात की. घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरत असतात. म्हणून वेळेबरोबर आपण आपल्या जीवनातील व्यक्तीला पण जपले पाहिजे. कारण वेळ निघून जाते पण जीवनात आलेली व्यक्ती आपल्या सुख आणि दुःखात कायम आपल्या सोबत राहते.
साथ तुझी असताना
मला काही कमी नाही
तुझ्या प्रेमाच्या संगतीने
जीवन माझे सुंदर होई।।
म्हणून जीवनात वेळेला आणि आपल्या व्यक्तीला तेवढेच महत्व दिले पाहिजे. कारण कधी कधी वाईट वेळ येते पण वाईट वेळेतच आपली प्रेमाची व्यक्तीच साथ देते
म्हणून नेहमीच चांगल्या व्यक्तीला जपा तिच्यामुळे वाईट वेळ कधीच येणार नाही.
झाले गेले विसरून सारे
पुन्हा ऊभे राहिले पाहिजे
चांगली -वाईट वेळ येतच असते
आनंदाने जीवन जगले पाहिजे।।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे,लातूर















