
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – गडचांदूर : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला तयारी करताना जाहिरात आली म्हणून अर्ज केला आणि अर्ज केला म्हणून परीक्षा देत आहोत. अशाने यशस्वी होता येत नाही तर दैनंदिन वेळापत्रक बनवणे व त्याचे काटेकोरपणे पालन करणे महत्त्वाचे आहे. तद्वतच अभ्यासक्रम नीट समजून मागील प्रश्नपत्रिका सोडवा,
दररोज चालू घडामोडी अवश्य वाचा,मॉक टेस्ट द्या व विश्लेषण करा. अभ्यासात सातत्य आणि पुनरावृत्ती महत्त्वाची
असल्याचे प्रतिपादन टाटा समूह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे कार्यरत मा. प्रदीप चामले यांनी केले. ते युगचेतना ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचालित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंती प्रित्यर्थ आयोजित युवाचेतना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. पुढे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना मा. प्रदीपजी चामले यांनी
प्रयत्न, सातत्य व आशा” ही प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय या तत्त्वांच्या आधारे विद्यार्थ्यांमध्ये परिश्रमशीलता व शिस्त विकसित करत आहे.सातत्यपूर्ण अध्ययन प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्याची प्रक्रिया मात्र गतिमान झाली पाहिजे.
प्रतिकूल परिस्थितीतही आशावादी दृष्टिकोन राखण्याचे संस्कार या माध्यमातून दिले जातात ही गोष्ट महत्त्वाची आहे. गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दृढ केला जातो.या मूल्यांच्या बळावर हे महाविद्यालय प्रशासकीय सेवेसाठी सक्षम व जबाबदार अधिकारी घडविण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत ते स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी मात्र प्रचंड परिश्रम घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कष्टाची तयारी ठेवा असा उपदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना केला. यावेळी मा.अरविंद मुसणे महाविद्यालयाचे प्राचार्य,सर्व प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. दुर्गावती खुबाळकर यांनी तर उपस्थिताचे आभार यश ताकसांडे यांनी मानले.















