
एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – हेडरी ते गटटा तसेच गटटा ते कोठी या अत्यंत महत्त्वाच्या ग्रामीण रस्त्याच्या कामास अखेर सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वर्षानुवर्षे विद्यार्थी, महिला, रुग्ण, वृद्ध नागरिक तसेच दैनिक दुचाकी चालक व बस चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. अपघात, वेळेवर दवाखान्यात पोहोचता न येणे तसेच शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल हे या रस्त्याचे रोजचे वास्तव बनले होते.
या गंभीर प्रश्नावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकपा) सातत्याने जनआंदोलन, निवेदने व प्रशासनाला इशारे देत संघर्ष केला. नागपूर येथील मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आंदोलन करण्यासाठी भाकप कार्यकर्ते नागपूरकडे जाण्याच्या तयारीत असतानाच, काही दिवस आधी मुख्यमंत्री यांच्या पी.ए. यांनी नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालयात भाकप प्रतिनिधींशी बैठक घेतली. या बैठकीनंतर दोन स्वतंत्र पत्र पाठवून बांधकाम विभागामार्फत हेडरी–गटटा व गटटा–कोठी हे दोन्ही रस्तेची ही मंजुरी भाकपच्या मागणीमुळेच मिळाल्याचे लेखी पत्र जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांना देण्यात आले होते. त्यानंतर आता प्रत्यक्षात सदर रस्त्याचे काम सुरू झाले असून, भाकपा कार्यकर्ते कॉ. सुरज जककुलवार व कॉ. विशाल पूजजलवार यांच्या हस्ते पूजा करून कामाचा शुभारंभ करण्यात आला.

या वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याचे काम सुरू झाल्याने शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवास, महिलांना बाजारपेठ व आरोग्यसेवांपर्यंत सोपा मार्ग, रुग्णांना वेळेवर उपचार, वृद्ध नागरिकांना दिलासा तसेच दुचाकी व बस चालकांना सुरक्षित व सुलभ वाहतूक मिळणार आहे.
भाकपने स्पष्ट इशारा दिला आहे की, सदर कामात दिरंगाई, आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल. जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष केल्याशिवाय विकास होत नाही, हे या रस्त्याच्या कामाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.















