prabodhini news logo
Home ठळक बातम्या अस्मितेचा महामेरू: बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त मिरा-भाईंदरमध्ये समाजसेवेचा महायज्ञ

अस्मितेचा महामेरू: बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त मिरा-भाईंदरमध्ये समाजसेवेचा महायज्ञ

0
152

मिरा-भाईंदरमध्ये उभारला जाणार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा – मंत्री प्रताप सरनाईक

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
mojissports@gmail.com
8104170564

मिरा-भाईंदर – २२ जानेवारी २०२६ : ज्यांच्या एका गर्जनेने महाराष्ट्र हादरायचा, मराठी माणसाच्या शिरात स्वाभिमान जागवणारे आणि हिंदुत्वाला नवी धार देणारे वंदनीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष २३ जानेवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधत मिरा-भाईंदर शहरात भव्य समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री मा.ना. श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी जाहीर केला आहे.
बाळासाहेब ठाकरे हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर ते कोट्यवधी मराठी माणसांचे आधारवड होते. “मराठी माणूस” आणि “हिंदुत्व” या संकल्पनांना त्यांनी वैचारिक अधिष्ठान दिले. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त केवळ उत्सव न साजरा करता, “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या त्यांच्या विचारधारेनुसार मिरा-भाईंदर शहरात महिनाभर समाजसेवेचा महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे.
२४ प्रभागांत समाजोपयोगी उपक्रमांची मालिका
शिवसेना पक्षामार्फत आणि मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांत
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी
भव्य रक्तदान शिबिरे
गरजू नागरिकांना मोफत चष्मा वाटप
दिव्यांगांना मोफत व्हीलचेअर
विविध शासकीय दाखल्यांसाठी मोफत दाखले वाटप शिबिर
महिलांसाठी विशेष कल्याणकारी कार्यक्रम
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यशाळा
डिजिटल साक्षरता अभियान
शहरभर वृक्षारोपण मोहीम
असे उपक्रम मिरा-भाईंदरमधील सर्व २४ प्रभागांत राबविले जाणार आहेत.
मिरा-भाईंदरमध्ये बाळासाहेबांचा भव्य पुतळा उभारण्याचा संकल्प
दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील रिगल सिनेमा परिसरातील पुतळ्याच्या धर्तीवर, भाईंदर पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन परिसरात भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, यासाठी महानगरपालिकेला रीतसर निवेदन देण्यात आले असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. हा पुतळा केवळ शिल्प न राहता, येणाऱ्या पिढ्यांसाठी राष्ट्रवाद आणि मराठी स्वाभिमानाची प्रेरणा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“बाळासाहेब माझ्या अस्तित्वाचा मूलाधार” – प्रताप सरनाईक
यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले,
“बाळासाहेब हे माझ्यासाठी केवळ नेते नव्हते, तर माझ्या अस्तित्वाचा मूलाधार होते. त्यांच्या विचारांमुळेच मी घडलो. २३ जानेवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान मिरा-भाईंदर शहरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातील. मिरा-भाईंदरमध्ये उभारला जाणारा त्यांचा पुतळा प्रत्येक अन्यायग्रस्त मराठी माणसाला लढण्याची उमेद देईल. साहेबांचे ऋण कधी फेडता येणार नाही, मात्र त्यांच्या नावाने होणारी जनसेवाच खरी आदरांजली आहे.”
मिरा-भाईंदरच्या इतिहासात हे जन्मशताब्दी वर्ष सुवर्णाक्षरांनी कोरले जावे, यासाठी सर्व शिवप्रेमींनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here