prabodhini news logo
Home अकोला विनयभंग व ॲट्रॉसिटी प्रकरणात आरोपी गोपाल दांदळे याचा अटकपूर्व जामीन फेटाळला..

विनयभंग व ॲट्रॉसिटी प्रकरणात आरोपी गोपाल दांदळे याचा अटकपूर्व जामीन फेटाळला..

0
130

जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

अकोला प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंग व अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमाअंतर्गत गुन्ह्यात आरोपी गोपाल @ गोपालकृष्ण रामकृष्ण दांदळे याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश-१, अकोला यांनी दिलेल्या आदेशानुसार, सदर प्रकरणात अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी लागू होत असल्याने अटकपूर्व जामिनास कायदेशीर अडथळा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी झालेल्या सुनावणीत आरोपीतर्फे अ‍ॅड. डी. आर. खुराणिया यांनी युक्तिवाद केला. राज्य शासनातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. आर. एम. अकोटकर तसेच सहायक वकील अ‍ॅड. एस. ए. देशमुख यांनी न्यायालयात बाजू मांडली.
21 जानेवारी रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद केले की, फिर्यादी महिला व आरोपी यांच्यात पूर्वपरिचय असून, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार कार्यालयीन ठिकाणी विनयभंग, मानसिक त्रास तसेच जातीय अपमानाचे आरोप करण्यात आले आहेत. पूरक जबाब व साक्षीदारांच्या म्हणण्यावरून प्रथमदर्शनी अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील घटक दिसून येत असल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे.
तपास अद्याप प्रारंभिक टप्प्यात असून, पुढील चौकशीसाठी आरोपीची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. तसेच अटकपूर्व संरक्षण दिल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
या सर्व बाबींचा विचार करता, सदर प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर करणे योग्य नसल्याचे मत नोंदवत न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे. या आदेशामुळे तपास यंत्रणेला पुढील कारवाईसंदर्भात मार्ग मोकळा झाला असून, प्रकरणातील पुढील न्यायालयीन कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here