prabodhini news logo
Home गडचिरोली वडसा–अर्जुनी मोरगाव राज्य महामार्गावरील खड्ड्यांबाबत आमदार मसराम यांची कडक भूमिका

वडसा–अर्जुनी मोरगाव राज्य महामार्गावरील खड्ड्यांबाबत आमदार मसराम यांची कडक भूमिका

0
64

तत्काळ दुरुस्तीचे आदेश

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज नेटवर्क – वडसा ते अर्जुनी मोरगाव या अत्यंत महत्त्वाच्या राज्य महामार्गाची सध्या दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत तसेच अनेक भागात रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. मात्र खराब रस्त्यामुळे वाहनधारक, प्रवासी, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपघातांची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेत आमदार रामदास मसराम यांनी आज संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांना बोलावून घेतले व रस्त्याच्या खराब स्थितीबाबत जाब विचारला.

यावेळी आमदार मसराम यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले की, नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. रस्त्यावर पडलेले खड्डे व उखडलेला भाग यामुळे अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असे स्पष्ट करत त्यांनी तत्काळ दुरुस्तीची कामे सुरू करण्याच्या सक्त सूचना दिल्या.

“हा मार्ग ग्रामीण भागाला जिल्हा व तालुक्याच्या मुख्य ठिकाणांशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा राज्य महामार्ग आहे. या रस्त्यावरून शेतमाल वाहतूक, रुग्णवाहिका, शालेय वाहने तसेच सामान्य नागरिकांची ये-जा सातत्याने सुरू असते. त्यामुळे रस्त्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता अबाधित ठेवणे प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे आमदार मसराम यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या नव्हे तर टिकाऊ व दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले. केवळ खड्डे बुजवून काम थांबवू नये, तर संपूर्ण रस्त्याची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी मजबुतीकरण व पुनर्बांधणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आमदार मसराम यांच्या या तत्पर हस्तक्षेपामुळे व कडक भूमिकेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून लवकरच रस्त्याची दुरुस्ती होऊन वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मूलभूत सुविधांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत राहू, असे आश्वासनही आमदार मसराम यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here