prabodhini news logo
Home कोरची जिद्दीने गडचिरोलीच्या दुर्गम वसतिगृह गृहपाल ते क्लास वन अधिकारी: नावजी सरकुंडेंचा प्रेरणादायी...

जिद्दीने गडचिरोलीच्या दुर्गम वसतिगृह गृहपाल ते क्लास वन अधिकारी: नावजी सरकुंडेंचा प्रेरणादायी प्रवास

0
228

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – कोरची : हलाखीची ओढग्रस्त परिस्थिती, शिपाईपासून सुरू झालेली नोकरी आणि गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात गृहपाल म्हणून जबाबदारी – यापैकी कोणत्याही अडथळ्याने त्यांची जिद्द ढळू दिली नाही. हिंगोली जिल्ह्यातील सुकळी (वीर) येथील आदिवासी तरुण नावजी दत्ता सरकुंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत घवघवीत यश मिळवून ‘सहाय्यक आयुक्त’ (वर्ग-१) पदी निवड होवून आदिवासी समाजासाठी एक उज्ज्वल आदर्श निर्माण केला आहे.

संघर्षमय बालपण आणि शिक्षणाची पायाभूत

सुकळी येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले नावजी सरकुंडे हे आंध जमातीतील आदिवासी आहेत. जिल्हा परिषद शाळा सुकळी येथे प्राथमिक शिक्षण आणि शासकीय आदिवासी आश्रमशाळा, जमगव्हाण (हिंगोली) येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून बी.एस.डब्ल्यू. आणि एम.एस.डब्ल्यू. पदवी मिळवली. घरची आर्थिक अडचण असल्याने शिक्षण सोडून नोकरीचा मार्ग त्यांनी अवलंबला.

शिपाईपासून गृहपाल: नोकरी आणि अभ्यासाची जिद्द

नांदेड न्यायालयात शिपाई म्हणून कारकिर्द सुरू केल्यानंतरही त्यांनी स्वप्न सोडले नाही. आदिवासी विकास विभागाची परीक्षा उत्तीर्ण होऊन नागपूर विभागात गृहपाल म्हणून रुजू झाले आणि गडचिरोलीच्या कोरची येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात नियुक्ती मिळाली. इथे वीज, इंटरनेट आणि अभ्यास साहित्याची कमतरता असतानाही नोकरी सांभाळून MPSC ची तयारी केली. २०२३ च्या ‘प्रकल्प अधिकारी/सहाय्यक आयुक्त’ परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवून आता ते मागासवर्गीय विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत.

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत

या यशाची बातमी कळताच शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, कोरची येथे विशेष सत्कार सोहळा झाला. मुख्याध्यापक भैयालाल कुरसंगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सरकुंडे यांनी विद्यार्थ्यांना उदबोधन दिले, “कठीण परिस्थितीतही शिक्षणाची कास धरून सतत मेहनत करा. हीच यशाची गुरुकिल्ली आहे.” मुख्याध्यापक कुरसंगे म्हणाले, “दुर्गम भागात नोकरी करत स्पर्धा परीक्षेची तयारी करणे हे मोठे आव्हान आहे. सरकुंडे सरांनी आदिवासी युवकांसाठी आदर्श उभा केला आहे.”

कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुषमा आंबोणे यांनी तर आभार मनोज आचार्य यांनी मानले. नावजी सरकुंडेंचा हा प्रवास केवळ कोरची-गडचिरोलीपर्यंतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
यावेळी शाळेतील हरेश कामडी,अरुण कायंदे, धनश्री परतेती,भैयालाल कुरसंगे, गुरुराज मेंढे, कुणाल गोवर्धन,कृष्णा गावडे, संतोष सहारे,अमित मेश्राम, गीता राऊत, सुषमा आंबोणे, प्रिती खंडाते,नैना यंगलवार,भूमेश शेंडे, मयूर दोनाडकर,प्रथमेश पाटोळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here