
अशी एक सांजवेळ
रंग उजळून आली
तुझ्या भेटीसाठी कान्हा
राधा कासावीस झाली।।१।।
सूर बासुरीचे आता
कानी घुमातच होते
हळुवार पाय माझे
ताल धरतच जाते।।२। ।
नकळत ओढ तुझी
आता लागलीया मनी
यावे बहार घेऊन
यावे तू माझ्या जीवनी।।३।।
तू माझ्या आणि मी तुझ्या
रहावे जन्मोजन्मी संगती
तुझ्या नि माझ्या प्रेमाची
जपुया छान प्रेमळ नाती।।४।
अशा रम्य सांजवेळी
तुझा हात हाती राहू दे
तुझ्या नि माझ्या प्रेमाचे
सर्व जग गोडवे गाऊ दे।।५।।
नाहीच तुटणार कधीही
तुझी आणि माझी साथ
रहावे आपले गोड नाते
बाहर यावा असा जीवनात।।६।
रुसले जरी कधी मी ही
मला समजून घेशील
आल्या लाख अडचणी तरी
फक्त मला साथ देशील।।७।।
पडेल सुखाचे चांदणे
चंद्र सुध्दा येईल खाली
तुझ्या नि माझ्या प्रेमाला
रम्य सांजवेळ साक्ष झाली।।८।।
आज पौर्णिमेच्या दिनी
प्रीत गंध फुलून आला
तुझ्या नि माझ्या प्रेमाचा
असा शेवट गोड झाला।।९।।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर















