prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोखे बंधन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोखे बंधन

0
107

या अनंत विश्वात
असतं एक अनोखं नातं.
या नात्याला सीमा नसते,
पवित्र निरागस अनोखं नातं.

नसते ओळख, नसते नाव,
नसते वय अन् नसतो भाव,
कोण कुठे अन् कसे गवसले.
नकळे कसे हे अवचित घडले.

कधीही परस्पर भेट नसली,
बोली भाषा जाण ही नसली,
येणे जाणे सारेच उणे.
नकळे कसले अवचित स्मरणे.

मनाच्या स्वच्छ गाभार्यात
तेवत राही प्रशांत जोत,
प्रसन्न मंगल भाव लहरी
तरंगती नितस्मीत वदनावरी.

मनी सदैव असते हुरहुर,
समीप असावे वाटे क्षणभर,
सुरम्य चंचल वायू लहरी
कुजबुजती मन पटलावरी.

हृदयद्वयाचे कधी न मीलन,
स्मृती गंधाचे तरिही सिंचन,
अनंत कल्पना मनी गूंफून,
स्वतःत रमते करते रंजन.

असे कसे हे अनोखे बंधन,
कसे मनात झाले विलिन,
नकळे त्याला हवे काय असते,
पाश अनोखा अनोखे बंधन.

असो असलं अनामिक नातं,
ह्या जगताते निर्मळ नातं,
रुजो सकलांच्या अधरावरी,
सुमधूर कोमल संगीत लहरी.

निर्मला ज्ञानेश्वर बोरकर
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here