
कर्जत प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – कर्जत शहराचे नामकरण ‘श्री संत गोदड महाराज नगरी’ करावे, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कर्जत नगरपंचायतीसमोर सोमवारी (२ फेब्रुवारी) जोरदार ‘ढोल-ताशा बजाव’ आंदोलन करण्यात आले. वंचितचे प्रदेश प्रवक्ते जामखेडचे नगरसेवक अॅड. डॉ. अरुण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
आंदोलनातील प्रमुख मागण्या-
– कर्जत शहराचे अधिकृत नाव ‘श्री संत गोदड महाराज नगरी’ करणे.
– प्रभाग क्रमांक ९ ला ‘दलित वस्ती’ घोषित करून तेथे नागरी सुविधा पुरवणे.
– शहा गार्डन शेजारील अपूर्ण अवस्थेत असलेल्या अभ्यासिका केंद्राचे बांधकाम तातडीने पूर्ण करणे.
– नवीन उपनगरांमधील खुल्या जागांमध्ये (Open Space) बौद्ध विहार, मंदिर आणि मशीद यांसाठी जागा राखीव ठेवणे.
– सिद्धार्थनगरसह सरकारी कार्यालयांमधील शौचालयांची स्वच्छता करण्यासाठी कायमस्वरूपी कामगारांची नियुक्ती करणे.
निवेदन देऊन दहा दिवस उलटले तरी मुख्याधिकारी अक्षय जायभाय आंदोलनावेळी गैरहजर राहिल्याने अॅड. अरुण जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला. जबाबदार अधिकार्यांनी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब आहे. याप्रकरणी मानवी हक्क आयोग आणि अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रार करणार, असा इशारा जाधव यांनी भाषणातून दिला.
या आंदोलनाला रासपाचे तालुकाध्यक्ष सोनू भिसे, शिवसेना (उबाठा) गटाचे अमोल क्षीरसागर, आणि रिपाइं गटाचे युवा नेते विशाल काकडे यांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला. तसेच जिल्हा सल्लागार चांगदेव सरोदे, तुकाराम पवार, अनिल समुद्र, आणि शब्बीर पठाण यांचीही भाषणे झाली.
नगरपंचायतीच्या कार्यालयीन अधीक्षक प्रियांका म्हेत्रे यांनी आंदोलकांशी चर्चा करून सर्व मागण्यांबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
यावेळी दत्ता भालेराव, लखन पारसे, विकास समुद्र, देवा खरात, सचिन धावडे, सोमनाथ गोरे, शितल काळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.















