
अमरावती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – अमरावती महानगरपालिकेच्या १७ व्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी यांची, तर उपमहापौरपदी सचिन भेंडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीपेक्षाही सभागृहात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः एमआयएमच्या (MIM) नगरसेविकेने चक्क भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान सदस्यांना हात उंचावून मतदान करण्यास सांगण्यात आले. भाजप आणि मित्रपक्षांच्या सदस्यांनी हात उंचावले असतानाच, एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी श्रीचंद तेजवानी यांच्या बाजूने मतदान केले. केवळ महापौरच नव्हे, तर उपमहापौर पदासाठीही त्यांनी सचिन भेंडे यांना मतदान केले.
सोशल मीडियावर टीकेची झोड; ‘मिलीभगत’ची चर्चा
भाजप आणि एमआयएम या दोन परस्परविरोधी विचारधारा असलेल्या पक्षांमध्ये झालेल्या या छुप्या युतीमुळे अमरावतीकर नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. सोशल मीडियावर या घटनेचे मिम्स व्हायरल होत असून, पक्षाची विचारधारा नेमकी कुठे गेली? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सत्तेसाठी ही ‘मिलीभगत’ आहे का, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.
नागरिकांच्या विश्वासाला तडा देऊन स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे, अशी टीका संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.












