
हे त्यागमूर्ती रमाई
सकल दलितांची आई
तव त्यागाला सीमा नाही
हे माऊली रमाई
तुझ्या सोज्वळ वदनात
तुझ्या वत्सल नयनात
सारया जनतेचे कारूण्य
साठलेले अंतरात
तुझ्या विशाल हृदयात
कोमल दुर्बल कायेत
निष्ठा कष्टाची जपून
तव प्रेरणा आभाळागत
तुझ्या इवल्या बाळांना
नाही मिळाले दूध त्यांना
त्यांच्या मृत कायेलाही नव्हते
झाकाया कफन दिला पदर फाडून
परदेशी बाबा गेले
जपलेस सदैव त्यांना
किती संकटे झेलून
दिले धैर्य सदोदित त्यांना
ना हात पसरला कधी
ठेविले ठिगळ झाकून
तू अलौकिक धैर्याने
राहिली अश्रु पिऊन
सारा संसार सांभाळून
स्वतः उपाशी राहून
स्वाभिमान बाळगून
गोवऱ्या शेणी वेचून
बाबांच्या ध्येयासाठी
रात्रंदिवस खपून
तव अतर्क्य उंची पाहून
अचंबित धरा आणि गगन
हे त्यागमूर्ती रमाई
माझे विनम्र वंदन तव ठायी
माझे विनम्र वंदन तव ठायी
निर्मला ज्ञानेश्वर बोरकर
नागपूर















