prabodhini news logo
Home कारंजा प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – कारूण्यमुर्ती रमाई

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – कारूण्यमुर्ती रमाई

0
136

शोषित पिडीत दिनदुबळ्या बहुजन समाजाचा आवाज म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब यांचे नाव ज्याप्रमाणे उठताबसता प्रत्येकाच्या ओठांवर असते त्याचप्रमाणे त्यांना साथ देणाऱ्या व सुखदु:खात संघर्ष काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या त्यांच्या अर्धांगिनी रमाई, रमाई म्हणजे बाबासाहेब यांचा आधारस्तंभ…
त्यांना आयुष्य तसं खुप कमी लाभलं पण जिवन संघर्ष खुप मोठा आहे,प्रज्ञासुर्यासंगे रमाई विषमतेच्या ज्वलंत निखाऱ्यावर चालताना कधी डगमगल्या नाही,किंवा माघार घेतली नाही रमाईच्या उदात्त मनाचा ठाव घेणे मोठ्या मोठ्याना जमले नाही,रमाईच्या मनाचा मोठेपणा म्हणजे, बाबासाहेब यांना स्फुर्ती देणारी अमृत वेली रमाई म्हटले तरी वावगे ठरणार नाही. रमाईचा जिवन संघर्ष हा कायम समाजमनात कोरून आहे. त्यांच त्यागमुर्ती रमाई यांच्या जिवन संघर्षावर मी माझ्या शब्दात…
ज्ञान सागराची जिवनसंगिणी “रमाई” मांडणार आहे*.
विषमतेच्या धगधगत्या निखाऱ्यावर ज्वलंत विचार पेरणारे बाबासाहेब आणि त्या विचारांना प्रेरणा स्फुर्ती देणारी रमाई, बाबासाहेब यांच्या अर्धागिनी त्यागस्विनी रामू उर्फ रमाई
बाबासाहेबासारखे पुस्तकी ज्ञान रमाईला नसले तरी प्रपंच संसाराचे आंतरिक ज्ञान ओतप्रोत भरलेली व समाजमनात एक उद्धार व्यक्ती महत्त्व निर्माण केलेली कारुण्याची त्याग मुर्ती म्हणजे रमाई…
वैचारिकतेचा वसा घेऊन भीमाला ज्ञानार्जनासाठी प्रोत्साहन
देणारी रमाई स्वतःसाठी कधी जगलीच नाही,आयुष्यभर
दु:ख यातनेचा महापुर जणू त्यांच्या वाट्याला आला, चंदनाचा पारस होऊन आयुष्यभर झिजत राहीली .
वारंवार मरणाच्या दु:खाने हृदयावर झालेल्या जखमेवर उद्धार झालेल्या व्यक्तीमत्वाचे बीजारोपण केले .संर्घर्षावर दयाशिल कारूण्याचा मळा फुलवला व प्रज्ञासुर्या भोवती स्फुर्ती सामर्थ्याचे तेजोवलय निर्माण केले ती रमाई, विध्वतेच्या शिखराची पायाभरणी करून अंधारात खितपत पडलेल्या समाजाला आशेचे नवे किरण दाखवून दिनदु;खित बहुजनांच्या पिढ्यानपिढ्या रंजलेल्या समाजाच्या जिवणाचे सोने केलेल्या महान युगपुरुषाची अर्धांगिनी रमाई.
स्वमनातील इच्छा अपेक्षा मारून,वैचारिकतेची प्रगल्भता
सुदृढ करून जिवनसंगिनी रूपाने बाबासाहेबांच्या शिक्षण ज्ञानाला उत्तेजन, प्रोत्साहन ,स्फूर्ती देणाऱ्या रमाई, दाग दागिने अलंकार कपड्याना महत्त्व न देता,त्याग संघर्ष श्रम , सातत्य,करूणा,शालीनता, विनम्रता, उद्धारता सात्विकता, पावित्र्य, या सत्वशिल अलंकाराने नटण्याची नैसर्गिक देण असलेली रमाई म्हणजे माया, जिव्हाळा, वात्सल्याचा निर्मळ झरा, आजही फोटोतील रमाईच्या निरागस विनम्र चेहऱ्याकडे पाहीले की त्यांच्या डोळ्यांत कारूण्याचा सागर दरवळताना दिसते. व महान तत्वज्ञानी महापुरुषांच्या पत्नीचं सौभाग्य याच गुणामुळे रमाईला लाभलं असाव हे सहजासहजी त्यांच व्यक्ती महत्व सांगून जाते.
उद्धार व्यक्तीमत्वाची खान असलेल्या रमाईने, स्वतःच्या इच्छा ,मन भावनेचा कधीही विचार केला नाही तुम्ही समाजासाठी जे करता त्यात मी आनंदी सुखी आहे मला त्या पेक्षा काही नको अशी मोठ्या मनाने, साहसाने सांगणारी आशावादी किरणाची लहर घेवून बहरणारी रमाई ,डिग्री
पदव्या घेवून विध्वतेचे धडे गिरवणाऱ्या विद्वानाला स्त्रि जीवनाचे रहस्य शोधण्यास व पेचात पाडण्या इतपत रमाईचं बालपण ते संसार, घरप्रपंच, नातेवाईककांचा गोतवंडा, बाबासाहेब परदेशात असताना कुणाची साथ नसताना मनाची होणारी घालमेल व श्रम सातत्याने हाल अपेष्टेला धैर्याने दिलेला धिर, व सर्व कष्ट तडजोडीनीशी व अडीअडचणीवर मात करून बाबासाहेबाविषयी जपलेला मनाचा मोठेपणा व सातत्य त्यांच्या विचारातून दिसून येते.
बाबासाहेबांनी शिकून मोठं व्हाव व समाजासाठी काहीतरी करावं या उदात्त हेतूने पती पासून दूर असल्याचा विरह मनात ठेवून कुठलीही तक्रार न करता तन मनाने जपलेल विश्वासाचं नातं, घरात एकामागे एक होणारी मरण हाणी त्यातही खचून न जाता कुठून एकवटत असेल हे बळ,यावर विचार करण्याजोग बरेच प्रसंग आहे. ते आठवले की मग तो प्रसंग, लग्न झाल्यानंतर काही दिवसातच बाबासाहेब बडोद्याला जातानाचा असो, का शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा असो, बाबासाहेबांच्या स्वागतासाठी शाहू महाराजांच्या फेट्याचे लुगडे नेसणे, कींवा बाबासाहेबांच्या शिक्षणात अडथळा यायला नको म्हणून पोटच्या लेकराच्या मरणाचे दु:ख असो किंवा यशवंत विषयी आरोग्य समस्या घर प्रपंच चालवताना होणारी मनाची तगमग असे बरेच प्रसंग आहे.
त्यातून होणारी रमाईच्या जिवाची घालमेल व अडीअडचणीवर मात करण्याची प्रबळ इच्छा शक्ती हे सर्व शक्य होतं का…? बालपणी रमाईच्या आईने रमाईवर रूजविलेले संस्कार, बालमणात रूजलेला आईवडीलाचा जिवन जगण्याचा संघर्ष व न समजण्याच्या आतच आईवडीलाची हरवलेली माया त्यातच बहीण भावाचा सांभाळ, व अगदी कमी वयात झालेलं लग्न त्यात घर संसाराची जबाबदारी दिवसाला अठरा विस तास अभ्यास करणारा पती,व कुठेही कमी न पडता नात्याची सांभाळलेली धुरा तरीही सर्व गोष्टीत समजंस पणा दाखवून मनाचा सांभाळलेला मोठेपणा. हे सर्व कसं शक्य झालं असेल बरं.. रमाईला ज्ञानाच्या ज्ञान सागराची अथांग असलेली खोली रमाईने कुठल्या पारदर्शकतेतून निरिक्षण परिक्षण केले असावे. मनात असलेल्या दु:ख, विरह,वेदनेला आपलसं करून धैर्य धाडसाने लढण्याची शक्ती कशी एकवटली असावी रमाईने हे सर्व समजून घेणे इतकं साधं सोपं आहे का..?
बाबासाहेब परदेशात गेल्यावर नात्याच्या बंधनात गुरफटून असताना कोणाच्या मदतीशिवाय रमाईने संसार चालवताना दु:ख, वेदना, विरह, संसाराची चिंता,पतीवर कुटुंब संसाराचा तान पडू नये ,त्रास होऊ नये म्हणून स्वताला कष्टात झोकणे, अर्ध्या चतकोर भाकरीवर घराचा उदरनिर्वाह
सांभाळणे त्यात होणाऱ्या मरण यातनाचा प्रवास ! कित्येक
रात्र अश्रूने भरलेल्या काढल्या असतील याचा आपण विचार करू शकतो का…..? बाबासाहेब यांनी समाजा-विषयी जे जे रमाईला समजावून सांगितले ते रमाईने आत्मसात केले व
बाबासाहेब समाजासाठी बाहेर संघर्ष करत होते तर रमाई
प्रपंचाचा गाढा चालवताना आत्मशुध्दीच्या परिपक्वतेतून
समाजाची समस्या रमाईच्या नजरेतून सुटलेली दिसत नाही
म्हणूनच आज रमाई संघर्ष, त्याग, कारुण्य, सात्विकता,
सहिष्णुतेची मुर्ती म्हणून जनमनात, मनामनात कोरली गेली, म्हणूनच बाबासाहेब आठवले की रमाईची स्मृती कळत नकळत जागी होते.
बाबासाहेब रमाई याचं जिवन म्हणजे अंधारातील स्वंयप्रकाशीत दिप ज्योतीची कहाणी असंच काहीसं बाबासाहेब आणि रमाई याचं नातं विलक्षण व अतुलनीय असं बाबासाहेब परदेशात गेल्यावर घर संसाराचा गाढा चालवताना सोसाव्या लागणाऱ्या कष्टाची झळ बाबासाहेब यांच्या पश्चात वेचलेल्या गोवऱ्या, दादर ते पोयबावडी पर्यंत सरपणासाठी केलेली वणवण ,व त्यातही पतीचा जपलेला स्वाभिमान इंधन,काडी गोवऱ्या आणताना कुणाला दिसू नये म्हणून अंधार पडल्यावर घरी येणे , त्याच बरोबर घरच्यांची मने जपणे. शेजारणीचे टोमणे,हिनवणे त्यातही
सात्विक पणाने अविचारावर मात करणे व स्वतः ला जपणे
किती हे उद्धार व्यक्ती महत्व कुणी मदतीचा हात पुढे केला तरी मनाच्या मोठेपणाचे कौतुक करत पण सहजासहजी ते स्विकारणे त्यांना पटत नव्हते.
काळाराम मंदिरात प्रवेश व महाड चवदार तळ्याला स्पर्श म्हणजे धर्म मार्तंडाने सोडलेले एक प्रकारे विषमतेचे चक्रीवादळ त्यात वारंवार बाबासाहेब यांना येणाऱ्या धमक्या,पत्रे,शिव्यांची लाखोटी,पण बाबासाहेब खंबीर पणे धर्ममार्तंडाना तोंड देण्यासाठी उभे पण रमाई चा जिव इकडे टांगणीला लागलेला. अशा कठीण परिस्थितीत त्या माउलीच्या जिवाची काय अवस्था असावी हे त्या वेळच्या विषमतावादी विचार सारणी वरून आपल्या लक्षात येते.
बरेच जन म्हणतात. जन्मा एवढे सुख नाही व मरणाऐवढी
हाणी नाही, परंतु रमाईच्या जिवनात एकामागोमाग एक
येणारे मरण जणू त्यांचा अंत पाहते की काय…..?
त्यांच्या आयुष्यात सुख आणी दु:ख जणू एकाच पंगतीला बसलेली आढळतात.त्यांच्या सहन क्षमतेची परिक्षा घेण्या जणू काळ उभा असावा …असे कित्येक प्रसंग नजरेसमोर आल्या शिवाय रहात नाही.
मनात विचारांचा काहूर माजते, वाटते खरोखरच हे आजच्या स्त्रीला शक्य आहे का….? रमाईच जिवन चरित्र वाचलं की त्यांचा त्याग संघर्ष उध्दार भावनेने ओतप्रोत भरलेलं मन स्त्री जातीला खूप काही शिकवून जाते व जगण्याचं बळ देते,
महान पुरुषाच्या जिवनात एक सुखद गोष्ट आहे . त्यांच्या जिवन साथीच्या रूपात खुप सहज आणि चांगली साथीदार लाभली, रमाबाई सारख्या थोर आणि आज्ञाधारक रमाबाईची साथ मिळाली . बाबासाहेब परदेशात असताना रमाबाई यांचे झालेले हाल एका मागून एक मरण त्यात त्याची तब्येत ढासळली होती. म्हणून यशवंत व राजरत्न या दोन्ही मुलाबरोबर त्यांना हवा बदलासाठी धारवाडला पाठविण्यात आले पण सर्वात धाकटा मुलगा राजरत्न यांचेही निधन झाले. धारवाडला रमाबाई गेल्या असता वस्तीगृहाच्या आवारात लहान मुल खेळायला यायची व वस्तीगृह वराळे काका सांभाळायचे. एके दिवशी मुले खेळायला आले नाही. तेव्हा रमाबाई ने वराळे काका यांना विचारले आज मुले का आले नाही. त्यावर वराळे काका म्हणाले …..
“दोन दिवस झाले ती मुलं उपाशी आहेत ” कारण वस्तीगृहा-
ला जे अन्नाचे अनुदान येते ते मिळाले नाही. ते मिळायला
अजून तिन दिवस लागतील. “अजून तिन दिवस ही मुलं
उपाशी राहतील” हे सांगताना वराळे काकाचा कंठ दाटून येते. त्यावेळी रमाबाई लगेच आपल्या खोलीमध्ये गेल्या त्यांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले.त्यांनी अश्रू भरल्या डोळ्यानी आपल्या कपाटातून दागिन्यांचा डब्बा घेऊन येतात.व हातातील बांगड्या काढत म्हणतात हे दागिने आणि बांगड्या घेवून जा गहान ठेवा किंवा विका व मुलासाठी जेवणाची सोय करा. मी मुलांना तीन दिवस उपाशी पाहू शकणार नाही. तेव्हा वराळे काका बांगड्या व दागिने घेऊन जातात व मुलासाठी खाण्याची सोय करतात मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागते. हे पाहून रमाबाई यांना खुप आनंद होते. त्यानंतर ही मुलं रमाबाई यांना “रमाआई” म्हणू लागले त्या क्षणापासून रमाबाईच्या त्या रमाई झाल्या. या देशातील उपेक्षितांच्या आई झाल्या.
बाबासाहेबांनी १६ ऑगस्ट १९२६ रोजी बाबासाहेब यांचे मित्र दत्तोबा पवार यांना लिहिलेले पत्र खुप वेदनादायक आहे. त्यात वडिलाचे आपल्या संतान वियोगाचे दु:ख स्पष्टपणे दिसून येते.
ते पत्रात म्हणतात.. आम्ही चार सुंदर रूपवान मुलं दफन केली आहेत, त्यातील तीन मुलगे आणि एक मुलगी होते. जर ते जिवंत असते तर भविष्य त्यांचे असते. त्यांच्या मुत्युचा विचार करून अंतकरण दुखावते आम्ही फक्त आजीवन जगत आहोत. ज्या प्रकारे डोक्यावरून ढग निघून जातात तसेच आमचे जिवन जात आहे. मुलांच्या मुत्युमुळे जिवनातील आनंद निघून गेला आणि जसे बायबल मध्ये लिहिले आहे “तु पृथ्वीचा आनंद आहेस” तर हे पृथ्वी त्याग असेल तर पृथ्वी आनंदित कशी असेल? “माझ्या परिक्त जिवनात मला पुन्हा पुन्हा असेच वाटते, पुत्रांच्या मुत्युमुळे माझे जिवन अगदी काटेरी झुडपेने भरलेल्या बागेप्रमाने झाले आहे. आता माझे मन इतके भरले आहे की मी अधिक लिहू शकत नाही. चारही मुलाच्या मुत्युचे कारण पैशाचा अभाव होता बाबासाहेब हे स्वतंत्र जिवन मिळविण्यासाठी काम शोधत होते. त्यामुळे घराची आर्थिक अवस्था खुपच वाईट होती.जेव्हा पोट भरत नव्हते तेव्हा मुलाच्या आजार उपचारासाठी पैसे कोठे मिळतील फक्त बाबासाहेबाचा थोरला मुलगा बचावला, बाबासाहेब नेहमी अभ्यासात व्यस्त आणि गुंतलेले असायचे, रमाई त्यांच्या कामात अडथळा येऊ नये याची काळजी घेत असायच्या रमाईने नेहमी पतीच्या आरोग्याची व सोयीची काळजी घेतली, बाबासाहेब वाचन करताना नेहमी आतून दार लावून घ्यायचे, रमाई बऱ्याच वेळा दार ठोठवायच्या पण जेव्हा बाबासाहेब दार उघडत नसत तेव्हा दमूर रमाई उपाशी पोटी झोपायच्या नवरा उपाशीपोटी असताना आपण जेवण करणे त्यांना मान्य नव्हते, रमाई एक आदर्श व कर्तव्यदक्ष स्त्री होत्या त्यांनी आपल्या पतीची व कुटुंबाची सेवाधर्म मानला होता कोणतीही आप्पती असो कोणाचीही मदत घेणं त्यांना कधीच पटले नाही.असे अनेक प्रसंग होते ओळखीच्यानी त्यांना मदतीचा हात पुढे केला पण रमाई ने घेण्यास नकार दिला रमाई समाधानी, सहकार्याची सहिष्णुतेची मुर्ती होत्या. रमाई ची तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती. तरीही त्यांना बाबासाहेबांच्या तब्येतीची चिंता सतावत होती, रमाईसाठी बाबासाहेबानी चांगल्या डॉक्टरची औषधाची व्यवस्था केली होती, तरीही बाबासाहेबानी रमाई – सोबत काही काळ घालवावा असे सांगण्यात येत होतेतेव्हा बाबासाहेब म्हणतात.. देशात सात कोटी लोक जे त्यांच्या पेक्षा शतकानुशतके आजारी आहेत, अनाथ आणि असाह्य आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही , मी या सात कोटी अस्पृश्यांसाठी काळजीत आहे.
याची रामुला जानिव असावी असे सांगून बाबासाहेबांचा गळा दाटून येतो. बाबासाहेब परदेशात असताना रात्रीच्या वेळी रमाईला पत्र लिहितांना इकडे रमाईचे हाल होताना बघून तर कधी लेकराच्या मरणाने अनेक वेळा बाबासाहेब अश्रूना वाट मोकळी करून देताना आढळतात.
रमाई हसत मुखाने बाबासाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे. उभी होती.दिपस्तंभाची ज्योत बनून शेवटच्या क्षणापर्यंत रमाई तेवत होती .धैर्य ,साहस, त्याग,संघर्षाचा स्तोत बनून ज्ञानाच्या ज्ञानसागरात रमाई सामावत राहीली व विध्वतेच्या महामेरूला ज्ञानाच्या शिखराची उंची गाठताना फक्त अर्धांगीनीच नव्हे तर महामेरूची सावली बनून जगातील सर्वश्रेष्ठ संविधान लिहिण्याचे बाबासाहेब यांना बळ दिले. आणि कोट्यावधी बहुजन शोषित पिडीत,रंजल्या गाजल्या साठी बाबासाहेब याच्या पावलासंगे पाऊल चालून शालीनता विनम्रतेचं लेणं लेवून सात्विक मन जपलेली क्रातीसुर्याची जिवनसंगिणी समाजमनाची साधीभोळी रमाई त्यागमुर्ती रमाई झाली.

नंदा भगत
कारंजा लाड, वाशिम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here