prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – माता रमाई आंबेडकर

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – माता रमाई आंबेडकर

0
85

अंधार जाळणा-या महासूर्याची
रमाई अविरत गार सावली;
दुःखाच्या उंबरठ्यावर राहून,
बनली सा-या शोषितांची माऊली. (१ )

नकळत्या वयातच हरवली
माय नावाची प्रेमळ छत्रछाया;
बापही गेला अर्ध्या वर सोडून,
दुःखेच गिळून झिजविली काया. (२ )

गरीबीच्या बिकट महायुद्धात
लढविलं आयुष्याच्या रणांगण;
कित्येक दुःखे पराभूत करून,
साकारलं उजेडाचं तारांगण. (३ )

रमाई सतत जळत राहिली
महासूर्याची ती तेजोमय वात;
काळ्या अंधारात शोधिला उजेड,
टाकूनिया व्यथा वेदनांची कात. (४ )

दुःखाचं काळीज हातात घेऊन
संसार सुखाचा कराया निघाली;
रक्तबंबाळ झालं आयुष्य सारं,
वाहिल्या सतत त्यागाच्या पखाली. (५ )

भीमराव बनले युगनायक
त्यागमुर्ती रमाईचे उपकार;
तिच्या त्यागमयी जीवनातूनच,
दूर सारला साराच अंधःकार. (६ )

रवि ताकसांडे
गडचांदुर जि. चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here