
कुमुद फुलझेले महिला जिल्हा प्रतिनिधी, नागपूर : त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त शिवराज नगर येथील बुद्ध विहार येथे “काव्य गर्जना” या भव्य कविसंमेलनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. सामाजिक जाणीव, परिवर्तनाचा संदेश आणि साहित्यिक अभिव्यक्ती यांचा सुंदर संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला.
जाई पूर्णा पंचभाई असोसिएशन, नागपूर तसेच अॅड. संघमित्रा बाभरे, करुणा मून आणि प्रितीबाला बोरकर यांच्या संयुक्त विद्यमाने या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.
कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी वैशालीताई बोरकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून गजलकार साहित्यिक प्रसेनजीत गायकवाड आणि डॉ. प्रा. मनोहर नाईक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. संघमित्रा बाभरे यांनी केले. प्रारंभी बुद्ध वंदनेने सुरुवात झाली.त्यानंतर दीपक पंचभाई यांनी बहारदार व ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची रंगत वाढवली.
या कविसंमेलनात दीपक पंचभाई, करुणा मून, अॅड. संघमित्रा बाभरे, प्रितीबाला बोरकर, लिलाधर गायकवाड, संजय गोडघाटे, रंगराज गोस्वामी, अॅड. सुधाकर आटे, सरिता सातारडे, दीपाली दीप, सुषमा कलमकर, प्रतिभा सहारे, ज्योत्स्ना बन्सोड आणि चरणदास वैरागडे यांनी सामाजिक, प्रबोधनात्मक व वास्तववादी विषयांवर प्रभावी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रमुख अतिथी प्रसेनजीत गायकवाड आणि डॉ. प्रा. मनोहर नाईक यांनीही स्वतःच्या काव्यसादरीकरणातून साहित्याचे महत्त्व पटवून देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी नवोदित कवींना प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल करुणा मून यांनी आभार प्रदर्शन केले. बुद्ध विहार समितीच्या प्रमिलाताई आकोडे, सर्व सदस्य व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच दानशूर विमलताई घनमोडे यांच्या वतीने सर्व उपस्थितांसाठी भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली.
एकूणच, “काव्यगर्जना” कविसंमेलन हे केवळ काव्याचे व्यासपीठ न राहता सामाजिक जागृती, एकात्मता आणि प्रेरणेचा उत्सव ठरला. उपस्थितांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले.















