
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – ताडगुडा : आदिवासी शोषण, अन्याय आणि दडपशाहीविरोधातील ऐतिहासिक भूमकाल उठावाच्या स्मरणार्थ भारतीय कम्युनिस्ट पार्टीने ताडगुडा येथे आक्रमक राजकीय भूमिका जाहीर करत पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले. जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या हस्ते हे कार्यालय उद्घाटित झाले.
या वेळी कॉ. सुरज जककुलवार (जिल्हा सदस्य), कॉ. रमेश कवडो (किसान सभा तालुका अध्यक्ष), कॉ. सततु हेडो (किसान सभा उपाध्यक्ष), कॉ. विलास नरोटी (ताडगुडा पक्ष कार्यालय प्रमुख), कॉ. रवी अलोने (प्रचार प्रमुख) यांच्यासह अनेक भाकप कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॉ. सचिन मोतकुरवार यांनी भाषणात थेट शब्दांत सांगितले की, सत्ताधाऱ्यांच्या कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांमुळे आदिवासी, शेतकरी व कष्टकरी जनता उद्ध्वस्त होत आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही भूमकालचा वारसा केवळ स्मरणापुरता नसून तो आजच्या संघर्षाला दिशा देणारा आहे, असे त्यांनी ठामपणे मांडले.
यावेळी उपस्थित जनतेला स्पष्ट आवाहन करण्यात आले की, आपल्या जमिनीचे प्रश्न, रोजगार, पाणी, रेशन, घरकुल, वनहक्क यांसारख्या सर्व अडीअडचणी पक्ष कार्यालयात लेखी स्वरूपात द्याव्यात केवळ अर्ज देऊन नव्हे तर पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये व आंदोलनांमध्ये रस्त्यावर उतरून लढा द्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी “भूमकालचा वारसा जिवंत ठेवू”, “शोषणाविरोधात लढा तेज करू” आणि “संघर्ष जारी रहेगा या निर्धार करण्यात आले.















