prabodhini news logo
Home आरोग्य बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जपत मिरा-भाईंदरमध्ये ‘महाआरोग्य’ व ‘लोकसेवा’चा महायज्ञ

बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जपत मिरा-भाईंदरमध्ये ‘महाआरोग्य’ व ‘लोकसेवा’चा महायज्ञ

0
164

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
mojissports@gmail.com
8104170564

मिरा-भाईंदर १३ फेब्रुवारी २०२६.बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून, सामान्य माणसाच्या जीवनाला दिशा देणारे विचारधन होते. “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” हा त्यांचा मंत्र प्रत्यक्षात उतरवत, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मिरा-भाईंदर शहरात शिवसेनेच्या वतीने भव्य जनसेवा उपक्रम राबवण्यात येत आहे.
प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मिरा-भाईंदर शहर शाखांच्या वतीने २३ जानेवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण शहरात ‘महाआरोग्य व मोफत दाखले वाटप शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. राजकारणापलीकडे जाऊन सर्वसामान्यांच्या आरोग्याची व दैनंदिन अडचणींची काळजी घेणारा हा उपक्रम नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.
मिरा-भाईंदर शहरातील २४ प्रभागांमध्ये दररोज हे शिबिर आयोजित करण्यात येत असून, यामध्ये हृदयरोग, कर्करोग, एन्जिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, संधिवात, थायरॉईड व दमा यांसारख्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला दिला जात आहे. तसेच डोळ्यांची तपासणी करून गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येत आहे.
सामान्य नागरिकांना शासकीय कागदपत्रांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी या शिबिरात आधारकार्ड, रेशनकार्ड, डोमिसाईल, उत्पन्न दाखला, ई-श्रम कार्ड यांसह विविध महत्त्वाचे दाखले एकाच छताखाली मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे “आपलं काम हक्काने होतंय” ही भावना नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
उच्चशिक्षित डॉक्टरांची टीम आणि अहोरात्र मेहनत घेणारे शिवसैनिक यामुळे हा उपक्रम केवळ कार्यक्रम न राहता लोकचळवळीचे स्वरूप घेत आहे. मिरा-भाईंदरच्या कानाकोपऱ्यातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच बाळासाहेब ठाकरे यांना दिलेली खरी आदरांजली ठरत आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनी या महाआरोग्य व लोकसेवा शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here