
परसलगोंदी येथे खुल्या जागेत खरेदी सुरू करण्याची मागणी — २६ फेब्रुवारीपासून बेमुद्दत धरणे
अहेरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. २० फेब्रुवारी २०२६ : परसलगोंदी व हेडरी गावांतील धान खरेदी केंद्रांवरील गोडाऊन पूर्ण भरल्याने शेतकऱ्यांचे धान खरेदीपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः परसलगोंदी येथे तात्काळ खुल्या जागेत (ओपन प्लॉटवर) धान खरेदी सुरू करण्यात यावी, अशी ठाम मागणी ऑल इंडिया किसान सभा अहेरी विधानसभा क्षेत्राने केली आहे.
शासनाच्या किमान आधारभूत किंमत (MSP) धोरणानुसार पात्र व नोंदणीकृत प्रत्येक शेतकऱ्याचे संपूर्ण धान खरेदी करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र गोडाऊनमध्ये जागा नसल्याचे कारण पुढे करून खरेदी थांबविण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. किसान सभेने स्पष्ट केले आहे की, गोडाऊन अपुरे पडत असल्यास पर्यायी व्यवस्था करून — विशेषतः परसलगोंदी येथे खुल्या जागेत — खरेदी प्रक्रिया अखंडितपणे सुरू ठेवणे बंधनकारक आहे.
दोन दिवसांच्या आत परसलगोंदी येथे खुल्या जागेत खरेदी सुरू करण्याचे लेखी आदेश न दिल्यास दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व शेतकरी ट्रॅक्टर व बैलबंडीने धान अहेरी येथील उपप्रादेशिक कार्यालयात आणून कार्यालयासमोर टाकत बेमुद्दत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.
यावेळी किसान सभेचे अध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“MSP ही शेतकऱ्यांची हक्काची किंमत आहे, दान नाही. गोडाऊन भरल्याचे कारण देऊन खरेदी थांबविणे आम्हाला मान्य नाही. परसलगोंदी येथे तात्काळ खुल्या जागेत खरेदी सुरू झाली पाहिजे. अन्यथा शेतकरी आपल्या हक्कासाठी २६ फेब्रुवारीपासून रस्त्यावर उतरतील आणि संघर्ष अधिक तीव्र करतील.”
कॉ. सूरज जककुलवार (सचिव), कॉ. रितेश जोई (तालुका सहसचिव) तसेच इतर सदस्य व शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देण्याचा निर्धार करत किसान सभेने प्रशासनाला तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.















